घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस

घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस

वेळवंडी नदीत कर्महरेश्वर नावाचं एक मंदिर आहे. ते पांडवांनी एका रात्रीत उभारलं अशी दंतकथा सांगितली जाते. मोठमोठे चिरे, दगड, खडक असले की आपल्याकडे त्या अजस्त्रतेचा भीमाशी संबंध जोडला जातो. ईशान्येतला भीमाचा सारीपाट असो, मध्यप्रदेशातलं भीमबेटका असो... कैक जागा आहेत. या मंदिराच्या भिंती दगडाच्या; बाकी बांधकाम चुनखडक, भाजक्या विटांचं. वर्षातून जेमतेम दोन महिने इथं दर्शन घेता येतं, बाकी काळ ते पाण्याखाली असतं. या मंदिरात नामस्मरण खास ऐकावं, सुरेख एको ऐकू येतो. अजूनएक भीमाच्या गोष्टीशी निगडित जागा म्हणजे कीचकदरा उर्फ आताचे चिखलदरा. तिथल्या एको पॉईंटचं नावच ‘पंचबोल’ असं आहे. भीमानं कीचकाला मारून इथल्या दरीत फेकून दिलं आणि जवळच्या धबधब्याखाली अंघोळ करून मोकळा झाला. या जागी ‘हाक’ मारली तर ती उलटून पाच वेळा ऐकायला येते.

1

अजून एक जागा आहे... विजापूरच्या गोल घुमटात सर्पिलाकार जिन्यातून मनोरा चढून वर जायचं. त्या अजस्त्र घुमटात उच्चारलेल्या शब्दाचा प्रतिध्वनी तर तब्बल सात वेळा ऐकू येतो. माथेरानला लुईझा पॉईंट पाहून शार्लोट लेकच्या दिशेने जाताना असाच एक एको पॉईंट लागतो. इथं एका अजस्त्र कातळाच्या नैसर्गिक भिंतीवर आदळून आवाज परत येतो. आपल्याकडे लोक कधीकधी इतका येडेपणा करतात की, अडाणीपणाला तोड नाही असं वाटावं. एको पॉईंटवर फटाके वाजवणे हा त्यातलाच एक आचरट प्रकार.

ध्वनी या शब्दातून आपल्याकडे प्रतिध्वनी हा शब्द आला, त्याला ‘स्वतंत्र’ अस्तित्व नाही. पण एको हा ग्रीक शब्द मात्र स्वतंत्र आहे. खरंतर ते एका बडबड्या दासीचं नाव आहे. ग्रीक पुराणकथा वाचताना मला ही ‘एको’ची गोष्ट सापडली.

गोष्ट विश्वाच्या उत्पत्तीपासून सुरू होते.

आधी सगळीकडे नुसता केऑस होता. मग जीआ म्हणजेच पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वी आणि आकाशाच्या मिलनातून टायटन्स नामक सहा पुरुष आणि सहा स्त्रिया निर्माण झाल्या. मग कपाळावर एक डोळा असलेले तीन वादळदेव जन्मले. शंभर हात आणि पन्नास मस्तकं असलेले तीन राक्षस जन्मले. टायटन्सपैकी क्रोनस व रिया या भाऊबहिणीने विवाह केला. त्यांना हेस्टिआ, डीमीटर व हेरा या मुली आणि हेडीझ, पोसायडन व झ्यूस हे मुलगे झाले. मोठी युद्धं जिंकून झ्यूस सर्वशक्तिमान देव बनला. त्याचा वंश, त्यातून अनेकविध कामं सोपवलेले देव अशा बऱ्याच रोचक कथा आहेत. झ्यूसला आपल्या बहिणीशी – हेराशी लग्न करायचं होतं. हेराची मात्र तशी इच्छा नव्हती. झ्यूसने हेराला फसवून तिच्याशी लग्न केलं. मग मूळची आकाशदेवता असलेली हेरा विवाह आणि मातृत्वाची देवता बनली. लग्नानंतर तिचं काम बदलून गेलं. झ्यूस आणि हेरा यांना हीफेस्टस ( अग्नी ) हा लंगडा मुलगा, एरीझ हा युद्धदेव बनलेला मुलगा अशी दोन मुलं झाली. हेरा स्वभावाने अत्यंत मत्सरी होती. तिनं झ्यूसच्या इतर बायका आणि मुलांच्या आयुष्यात अनेक अडथळे आणले. एको या हेराची दासी होती.

2

एकदा झ्यूसने तिला फितवलं आणि आपण पऱ्यांसोबत प्रणयक्रीडा करीत असताना हेराचं लक्ष दुसऱ्या कशाततरी गुंतवण्याचं काम तिच्याकडे सोपवलं. झ्यूसला नकार देण्याची हिंमत कोण करणार? अशावेळी एको हेराला मनोरंजक गोष्टी सांगून, मधुर गाणी ऐकवून, तिला आपल्या गप्पांमध्ये गुंतवून ठेवू लागली. एकोच्या बोलण्यात गुंगल्यामुळे हेराचं झ्यूस काय भानगडी करतोय इकडे लक्ष जात नसे. पण एकेदिवशी एकोचं भांडं फुटलं. झ्यूसच्या नादाने तिनं आपली दासी असून देखील आपल्यालाच दगा दिला हे हेराच्या लक्षात आलं. तिनं संतापून एकोला शाप दिला की, यापुढे तू मुकी बनशील. तुला स्वत:चं तर काहीच कधी बोलता – सांगता येणार नाही आणि दुसऱ्याच्या बोलण्यातील फक्त शेवटच्या वर्णाचा प्रतिध्वनी तुझ्या तोंडून उमटू शकेल!

तेव्हापासून मधुर आवाजाची एको मुकी बनली.

3

एके दिवशी तिनं नार्सिससला तळ्याजवळ बसून आपलं प्रतिबिंब न्याहाळताना पाहिलं. ती त्याच्या प्रेमात पडली. पण तिला आवाजाच्या अभावी तिला आपलं प्रेम त्याच्याकडे नीट व्यक्तच करता येईना. कुणीतरी बोललं तरच ती त्यातला शेवटचा ध्वनी निर्माण करू शकत होती. जंगलात लांडगा गुरगुरला, त्याचा प्रतिध्वनी तिने उच्चारला.

वैतागलेल्या नार्सिससने विचारलं, “कोण आहे?”

एको म्हणाली, “आहे?”

“समोर ये” तो म्हणाला.

“ये...” ती समोर येत म्हणाली.

“काय वाह्यातपणा आहे हा? इथून जा...” तो चिडून म्हणाला.

“जा...” ती म्हणाली आणि पाणावल्या डोळ्यांनी तिथून निघून गेली.

प्रेमभंगामुळे निराश झालेली एको डोंगरदर्यांमधून फिरत राहिली आणि अखेर एकेदिवशी मरण पावली. एकोचा मृत्यू तर झाला, पण तिचा ‘प्रतिध्वनी’ मात्र मागे शिल्लक राहिला. अनेक पोकळ्या आणि भिंतींमधून तो आपल्यापर्यंत आजही पोहोचत असतो.

नार्सिससला एकोला झिडकारण्याची शिक्षा भोगावी लागली. स्वत:च्याच प्रतिमेच्या प्रेमात पडण्याची ती शिक्षा होती. तो तळ्याजवळच येऊन राहू लागला आणि सतत स्वत:चं प्रतिबिंब पाहू लागला. तो स्वत:च्या इतका प्रेमात पडला की प्रतिबिंबापासून त्याला दूर राहवेना. काही न खातापिता तिथंच अखंड बसून राहिल्याने त्याला ग्लानी आली आणि अखेर तोही मरण पावला. त्याचं एका सुंदर फुलात रूपांतर झालं. आपण नर्गिस या नावाने त्या फुलांना ओळखतो.

4

एकोची अजून एक गोष्ट आहे. पॅन हा वायुदेव तिच्या प्रेमात पडला, पण एकोने त्याला नकार दिला. त्याने आपली ताकद वापरून धनगरांना पिसाळून टाकलं. पिसाळलेल्या धनगरांनी एकोचे तुकडे करून वाऱ्यावर उधळून दिले. एको पृथ्वीमातेची लाडकी होती; तिने एकोचे शक्य तितके तुकडे गोळा करून ठेवले; पण ती तिला पूर्ववत जिवंत करू शकली नाही. त्यामुळे आपल्याला काही ध्वनी तेवढे ऐकू येतात.

‘घुमक्कडी’ ब्लॉग मालिकेतील याआधीचे सर्व ब्लॉग :

घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा

घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (25): साकाचं बेट
घुमक्कडी (२४) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी 23. लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (२१) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (१९) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (१८) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (१७) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

 घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…  

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV