घुमक्कडी (45) : समुद्राचं पाणी खारं का झालं?

घुमक्कडी (45) : समुद्राचं पाणी खारं का झालं?

समुद्राचं पाणी खारं का झालं? आभाळात इंद्रधनुष्य कुठून येतं? वीज का कडाडते? उसात गोडी कुठून येते? तांदळाच्या दाण्याभोवती साल का असतं? एक ना दोन हजार प्रश्न. अशा अनेक प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरं आज आपल्याला माहीत आहेत. पण जेव्हा ती माहीत नव्हती, तेव्हा ‘बुद्धी चालत नाही, तिथं कल्पना धावते’ या न्यायाने लाखो कथा रचल्या गेल्या. समुद्राच्या खारेपणाचं ‘रहस्य’ सांगणाऱ्या तर अनेक लोककथा आहेत. एक आहे भारतातली आणि दुसरी आहे  जर्मनीतली. त्यांच्यात थोडं साधर्म्य आहे म्हणून एकत्र सांगतेय.

पहिली कथा आहे मध्यप्रदेशातल्या बुंदेली बोलीमधली.

दोन भाऊ होते. मोठा श्रीमंत आणि धाकटा गरीब. धाकट्याकडे एकदा अन्नाचा कणही शिल्लक राहिला नाही, म्हणून तो मोठ्याकडे थोडे तांदूळ मागायला गेला; पण त्यानं दिलं हाकलून. रडवेला होऊन परत येत असताना त्याला भेटला एक म्हातारा. त्याच्या डोक्यावर जड मोळी होती. धाकट्याला दया आली. म्हणाला, “मी पोचवून देतो तुमची मोळी.”

त्यानं म्हाताऱ्यासोबत जाऊन मोळी त्याच्या घरी ठेवली आणि म्हाताऱ्यानं त्याला बक्षीस म्हणून एक जादूचं जातं दिलं. सुलट फिरवून हवं ते मागितलं की मिळतं आणि उलट फिरवलं की मिळायचं थांबतं, असं त्या जात्याचं वैशिष्ट्य होतं. धाकट्याने घरी जाऊन आधी जात्याला डाळतांदूळ मागवले. पुरसे मिळाले की, जातं उलट फिरवलं. असं करत करत त्याने धान्य, गुरंढोरं, शेतजमीन, घर, सोनंनाणं सगळं मिळवलं; पण अतिरेकी हावरटपणा न करता मर्यादेत. तो आनंदात जगू लागला. गोरगरिबांनाही मदत करू लागला. प्रतिष्ठित बनला.

Blog 1(पावरा जमातीची एक स्त्री जात्यावर दळताना. फार देखणं नक्षीकाम केलेलं आणि सांडणाऱ्या पीठासाठी सोय केलेल्या आकाराचं असं जातं मी प्रथमच पाहिलं. छायाचित्रकार : दा. गो. काळे.)


ही बातमी थोरल्याला समजली. त्यानं धाकट्याचा पाठलाग करून गुपचूप पाहिलं की हा जातं फिरवतो आणि यानं मागितलं ते जात्यातून यायला लागतं. त्याला हाव सुटली. रात्री सगळे गाढ झोपेत असताना त्यानं ते जातं पळवलं. समुद्रावर त्यानं आपली नाव बांधून ठेवली होती. दूरदेशी जाईपर्यंत पुरतील अशा सगळ्या चीजवस्तू त्यात होत्या. जातं घेऊन तो सरळ नावेत बसला आणि निघाला. बरंच दूर गेल्यावर त्याला भूक लागली. सोबत बांधून घेतलेली शिदोरी उघडून तो जेवायला बसला आणि त्याच्या ध्यानात आलं की, बायको मीठच घालायचं विसरली. तेवढ्यात त्याला जात्याची आठवण झाली. जातं फिरवून तो म्हणाला, “मला मीठ दे.”

जात्यानं मीठ द्यायला सुरुवात केली. हे थांबवायचं कसं हे मात्र थोरल्याला माहीतच नव्हतं. तो नुसतंच पुरे पुरे म्हणून ओरडत राहिला, पण काही उपयोग झाला नाही. बघता बघता सगळी नाव मिठाने भरून गेली आणि बुडून तळाशी जाऊन बसली. समुद्राच्या तळाशी ते जातं अजून फिरतंच आहे आणि पाण्यात मिसळून पाणी खारं बनतंच आहे.

दुसरी गोष्ट जर्मनीतली.

एक मुलगा आपल्या आंधळ्या आजीसोबत राहत होता. त्याला दुसरं कुणीच नव्हतं. आजी आंधळी असली तरी तीक्ष्ण बुद्धीची होती. शाळेला सुट्टी लागल्यावर सर्व मित्रांनी जहाज घेऊन फिरून यायचं ठरवलं. ते सारे श्रीमंत होते, पण याच्याकडे मात्र काहीच नव्हतं. पण हा बरा आपला आयता नोकर होईल, म्हणून त्यांनी त्याला खोटंखोटं गोड बोलून आग्रह केला. शेवटी तो तयार झाला.

त्याचा उदास चेहरा पाहून आजीनं कारण विचारलं. तो म्हणाला,”सगळे इतकं सामान, खाद्यपदार्थ घेऊन येताहेत, पण माझ्याकडे कपड्यांच्या एका जोडीखेरीज काहीच नाहीये.”

मग आजीनं थोडा विचार केला आणि आपल्या खोलीत जाऊन एक लहानसं जातं घेऊन आली. ते जादूचं जातं कसं वापरायचं हे तिनं त्याला सांगितलं आणि बजावलं की, “याविषयी कुणालाही काही सांगायचं नाही, अन्यथा दुर्दैव ओढवून घेशील.”

मान डोलावून तो घाईने जात्याला म्हणाला,”जात्या जात्या, दळायला लाग, सोन्याच्या मोहरा द्यायला लाग.”

जात्यानं मोहरा द्यायला सुरुवात केली. पाच मोहरा मिळताच त्यानं पुढचा मंत्र म्हटला, “जात्या जात्या, थांब आता, इतकं पुष्कळ झालंय मला!”

जातं थांबलं. मग मुलानं त्या मोहरांनी प्रवासासाठीची खरेदी केली. आपल्या सामानात ते जातंही घेऊन तो जहाजावर गेला.

प्रवासात मुलं खूप दंगामस्ती करू लागली आणि त्याला हे बनव, ते आण अशा फर्माईशी करू लागली. तो शांतपणे त्यांना हवं ते पटकन आणून द्यायचा आणि बाकी वेळ एकटाच लाटांचे खेळ बघत बसायचा. जहाजाच्या कप्तानाला आणि बाकी मुलांना त्याचा संशय येऊ लागला. एकेदिवशी कप्तानाने त्याला सांगितलं, “थोड्या कोंबड्या घेऊन ये पाहू. आज मस्त रस्सा बनवू.”

त्याचा डाव मुलाच्या ध्यानात आला नाही. त्यानं मंत्र म्हणून जात्याकडे कोंबड्या मागितल्या, ते कप्तानाने चोरून पाहिलं. त्यानं खोदून खोदून विचारल्यावर आजीचं सांगणं विसरून मुलानं सगळी माहिती सांगून टाकली. हे जादूचं जातं आपल्याला मिळायला हवं, असं कप्तानाला वाटू लागलं. त्यानं अंधारात मुलाला पटकन समुद्रात ढकलून दिलं. मग जात्याकडे जाऊन आधी एखादी साधी गोष्ट मागून पहावी म्हणून त्यानं म्हटलं, “,”जात्या जात्या, दळायला लाग, शुभ्र मीठ द्यायला लाग.”

जात्यानं मीठ ओतायला सुरुवात केली. कप्तान आनंदाने इतका वेडापिसा झाला की जात्याला थांबवायचा मंत्र म्हणायचं विसरून नुसत्याच वेगवेगळ्या मागण्या करत पहिलाच मंत्र म्हणत राहिला. पण जातं काही न ऐकता नुसतं मीठच देत राहिलं. जहाज मिठाने भरून जातंय हे पाहून कप्तान संतापला आणि त्यानं जात्याचे सहा तुकडे करून समुद्रात इतस्तत: फेकले. तरीही त्या तुकड्यांमधून मीठ गळतच राहिलं आणि जहाजाने तर जलसमाधी घेऊन कप्तानासहित सगळ्या स्वार्थी मुलांना बुडवून टाकलंच होतं.

तेव्हापासून साही गोडे समुद्र खारे बनले.

Blog 2

(मृत समुद्राच्या काठावरील ही लवणशिल्पं. फ्रेंच भाषेत मिठाला ‘समुद्राची फुलं’ असं का म्हणतात, ते हे दृश्य पाहून कळतं.)


मी लहान होते, तेव्हाची एक आठवण आहे. परगावी / दूरदेशी गेलेलं माणूस लवकर परत येत नाही म्हणून काळजी लागून राहिली असेल, तर दाराजवळ  उंबऱ्याच्या दोन्ही बाजूंना थोडं थोडं मीठ टाकून ठेवत. मीठानं माणूस जिथं असेल तिथं त्याला ‘घरच्या पाण्याची तहान’ लागते आणि त्या ओढीने तो परत येतो म्हणत. आता या लेखाच्या शेवटी थोडं मीठ ठेवते, म्हणजे मिठाच्या बाकीच्या गोष्टी पुढच्या लेखात येतील लवकर.

'घुमक्कडी'मधील याआधीचे ब्लॉग :


घुमक्कडी (44) : कोळ्याच्या जाळ्यात पृथ्वी!


घुमक्कडी (43) : बिघडलेलं दुरुस्त करणारे जादूगार बैगा

घुमक्कडी (42) : कासवकथांचे अनेक अवतार


घुमक्कडी (41) : समुद्राची निर्मिती आणि सूर्यचंद्राची वाटचाल


घुमक्कडी (40) : न्युवाची भलीबुरी लेकरं


घुमक्कडी (39) : दाट काळं धुकं आणि फान्गु


घुमक्कडी (38) : धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं


घुमक्कडी (37) : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा


घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना


घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई !


घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!


घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून…


घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं…


घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!


घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…


घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस


घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा


घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो


घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय


घुमक्कडी (25): साकाचं बेट


घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ


घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय


घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!


घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो


घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू


घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!


घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं


घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ


घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे


घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे


घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!


घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे


घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!


घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!


घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 


घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी


घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये


घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण


घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना


घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!


घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी


घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना


घुमक्कडी : (2) सीतेची तहान


घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV