घुमक्कडी : (१९) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

By: | Last Updated: > Wednesday, 14 December 2016 12:00 PM
kavita mahajans ghumakkadi 19th blog

हिवाळा आणि अग्नी दोन्हीही सोबतच आठवतात. घरातल्या मध्यमवर्गीय सुबक, सुरक्षित जगातून बाहेर पडून आदिवासी भागांत कामं सुरु केली तेव्हा सर्वच ऋतू वेगळे जाणवायला लागले आणि वेगळे कळायलाही लागले. पाऊसकाळात चार-पाच महिने पुराने वेढलेली जंगलं आणि तुटलेले संपर्क अनुभवले. साठवलेलं खाणं पुरवून खाताना ध्यानात आलं की चुलीतली आग चोवीस तास जागी ठेवली जाते. एका घरापासून दुसरं घर इतकं दूर की आग मिळवणं मुश्कील. माणसाला अग्नीचा शोध लागून किती शतकं उलटली, अग्नी किती तऱ्हांनी कोंडला – राखला – वापरला माणसांनी… तरी अजूनही समाजातले काही घटक त्या प्राचीन काळातच जगताहेत. इतका महत्त्वाचा असल्याने अग्नीच्या पावसाइतक्याच भरपूर उत्पत्तीकथा, लोककथा आहेत.

 

Ghumakkadi 19 drawing 1-

ईशान्येकडील मोकलूम या आदिवासी जमातीतली एक छान कथा आहे. कोणे एके काळी अग्नी आभाळात होता. रंगदेवाच्या ताब्यात. माकडाने तो रंगदेवाकडून मागून आणला आणि एका झाडावर अग्नीला सुरक्षित ठेवले. पण त्याला गाजावाजा केल्यावाचून राहवेना. त्याने ढोल, तुताऱ्या वाजवून घोष सुरु केला की,”जे तुमच्याकडे नाही ते माझ्याकडे आहे!”

 

बाकी प्राण्यांना काही विशेष फरक पडला नाही, पण स्वत:ला सगळ्यांहून श्रेष्ठ मानणारी माणसं मात्र यामुळे खवळली. बारकाईने पाहिल्यावर त्यांच्या ध्यानात आलं की माकडाजवळ एक विलक्षण चीज आहे, ती चमकतेय आणि तिच्यातून प्रकाश फैलावतोय. ती इतकी आकर्षक दिसत होती की ती आपल्याला मिळावी म्हणून माणसांनी माकडावर दगडांनी हल्ला केला. दगडांचा मारा चुकवण्यासाठी माकड अग्नी घेऊन पार झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसलं. आता शक्तीने नव्हे, तर युक्तीने काम करायला हवं होतं. माणसांनी एक मुंग्यांचं घर शोधून, काढून आणलं आणि ते झाडाच्या खोडावर आपटलं. घर मोडल्याने संतापलेल्या, सैरभैर झालेल्या मुंग्या झाडावर चढल्या. शेंड्यावर लपून बसलेल्या माकडानेच हे कृत्य केलंय असं वाटून त्या माकडाच्या अंगाखांद्यावर चढून त्याला कचाकचा चावल्या. मुंग्या झटकून टाकायला माकड तिथल्या तिथं उड्या मारत हातवारे करू लागलं आणि त्या धांदलीत त्याच्या हातून अग्नी खाली पडला. तेव्हापासून अग्नी माणसांच्या ताब्यात आहे.

 

Ghumakkadi 19 drawing 2

(मुंग्यांचे घर)

 

आफ्रिकेतल्या एका लोककथेत अग्नी मुळात वाघाच्या ताब्यात होता आणि बाकी प्राण्यापक्ष्यांना फूस लावून माणसांनी तो पळवला अशी एक गोष्ट आहे. वाघाला त्यामुळे भाजलेले, स्वादिष्ट पदार्थ खाता येईनासे झाले आणि म्हणून तो संतापून नरमांसभक्षक बनला.
वांचू जमातीच्या कथेत मात्र माणसाला अग्नीचा शोध लागल्याची हकीकत आहे. एक माणूस जंगलात एक झाड घर बांधण्यासाठी म्हणून तोडत होता. झाडावरच्या पक्ष्याने त्याला विरोध करायला सुरुवात केली. टोचा मारून तो माणसाला हैराण करू लागला. त्यामुळे चिडून माणसाने एक दगड उचलून पक्ष्यावर मारला. पण पक्षी उडून गेल्याने त्याचा नेम चुकला आणि दगड एका मोठ्या खडकावर जाऊन आदळला. त्या घर्षणाने एक ठिणगी चमकली. ती पाहून त्याला कुतूहल वाटलं आणि त्याने दुसरा दगड फेकून मारला. त्यातून अजून एक ठिणगी उडाली आणि एका वाळलेल्या झुडुपावर पडली. झुडुपाला आग लागली आणि ती पाहून पक्षी घाबरून उडून पळाले. त्याने केलेली शिकार जवळच ठेवली होती, तो प्राणी भाजला गेला. इतके काळ कच्चं मांस खाणाऱ्या माणसाने पहिल्यांदाच भाजलेले चवदार मांस खाल्ले. मग ही जादू त्याने बाकी माणसांना सांगितली.

 

अग्नीचा उपयोग तिथून माणसांनी अनेक गोष्टींसाठी केला. चुलीवर अन्न भाजणे – शिजवणे होऊ लागले; मांस धुरावून ठेवणे ही तर एक निराळी खासियत बनली. अरुणाचल प्रदेशात धुरावलेले डुकराचे मांस, धुरावलेले मासे घरोघर दिसतात; खायला मिळतात. पाकसिद्धीसह, वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांमधून प्रकाश मिळवणे, शेकोट्या पेटवून हिवाळ्यात उब मिळवणे हे अग्नीचे मुख्य फायदे होते. शेतीत राब घातल्याने पिकं चांगली येतात हे ध्यानात आल्याने शेतीसाठीही अग्नी उपयोगाचा ठरला. यातून अग्नीविषयी श्रद्धा, आदर निर्माण होऊन पूजाही सुरु झाल्या आणि अग्नीने धार्मिक कृत्यांमध्येही आपले स्थान निर्माण केले. नंतरच्या काळात प्रेतं दफन करण्याऐवजी दहन केले जाऊ लागले आणि अग्नी माणसाचा शेवटचा सोबतीही बनला. अग्नीची उपद्रवक्षमताही माहीत झालेली होतीच, त्यामुळे नरकाच्या ज्या विविध कल्पना केल्या गेल्या त्यातही अग्नीला स्थान मिळालं. ऋषींच्या आश्रमांना त्रास देणारे शत्रू आणि आश्रमातली कर्तव्ये नीट पार न पाडणारे लोक मृत्युनंतर अग्निज्वाला या नरकात जाऊन पडतात अशी एक कथा आहे. या उलट थंडीच्या कडाक्यात अग्निदान करणारे, म्हणजे धर्मशाळा, देवळे, मठ अशा जागी राहणाऱ्या गरीब लोकांसाठी, संन्याशांसाठी अग्नी सतत पेटता राहील यासाठी लाकूडफाट्याची व्यवस्था करणारे लोक साठ हजार वर्षं स्वर्गात राहता येईल इतकं पुण्य कमावतात अशी अजून एक माहिती मिळते.

 

Ghumakkadi 19 drawing 3

 

इतर देवतांप्रमाणे अग्नीचे मानवरूप फारसे कल्पिले गेले नाही, तो मूळ निळ्याकेशरी ज्वालांच्या स्वरूपातच पूजला जात राहिला. मात्र वेदात त्याचे मानवी रुपातले वर्णन आहे. तीक्ष्ण दाढा आणि सोनेरी दातांचा अग्नी चार शिंगे, तीन पाय, दोन मस्तके आणि सात हात असलेला; मोठ्याने डरकाळ्या फोडणारा आहे असे म्हटलेय. तेजस्वी रथातून जाणारा अग्नी आकाशाला स्पर्श करू शकतो. तो जातो त्या रथाची चाके आणि ज्या मार्गांवरून जातो ते मार्ग काळे पडतात, असंही वर्णन ऋग्वेदात येतं. कधी त्याला गृहपती म्हटलं जातं, तर कधी घरातला पहिला अतिथी मानलं जातं. वडील, भाऊ आणि मित्र ही तिन्ही नाती त्याच्याशी जोडली जातात. त्यामुळे बाकी देवांप्रमाणे तो दूरस्थ न वाटता घरातला, आपलाच वाटतो. ब्रह्मदेवाच्या क्रोधातून तो जन्मला अशीही एक कथा आहे. स्वाहा आणि स्वधा या दोघी त्याच्या बायका. त्यांचीही एक गोष्ट आहेच.

 

अग्नीच्या पुराणकाळातल्याही काही कथा आहेत. आणि अग्नीदिव्य ही अजून एक मोठी गंभीर गोष्ट त्याच्याशी जोडली गेलेली आहे. त्यांचाही शोध घेऊच. माळावर, शेतात शेकोटी पेटवून उबदार घोंगडीत गुरफटून बसल्यावर गोष्टी ऐकायला मिळाल्या की त्या संपू नयेत असं वाटत राहतंच ना! जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे… असं म्हणणाऱ्या सगळ्यांकडून गोष्टी पळवून आणल्या आहेत, तर त्या वाटून घेतल्या पाहिजेतच उबेसाठी!

 

(फोटो आणि चित्रं: कविता महाजन)

 

‘घुमक्कडी’ ब्लॉग मालिकेतील याआधीचे ब्लॉग :

 

घुमक्कडी : (१८) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (१७) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

 घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…  

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:kavita mahajans ghumakkadi 19th blog
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: