घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून...

घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून...

उन्हाळ्याची सुरुवात झाली की पाण्याच्या प्रश्नाचं यंदा काय होणार, हा विचार डोक्यात घोंघावू लागतो. खरंतर होळीपासूनच ही सुरुवात होते. धूळवड – रंगपंचमी खेळताना आता रंगांहून पाणी अधिक नाचवलं जातं. मोठाल्या कॉलन्या ‘रेनडान्स’च्या कल्पनेने हुरळून जातात. प्रत्यक्ष पावसात ही माणसं कधी भिजणार नाहीत, ते त्यांना अडाणीपणाचं वाटतं; पण हे टँकरभर पाणी विकत घेऊन, टँकरला थेट पाईप लावून छिद्रं पाडलेल्या नळांच्या मंडपाखाली उभं राहून खुज्या धारा अंगावर घेत आयटम सॉंगवर चित्कारत नाचणं हे मात्र सभ्यतेचं लक्षण! उथळपणा करायचा असला की लोक असे ‘आधुनिक’ होतात; एरवी संस्कृतीचे दाखले देतात. भटकंती करताना जाणवतं की हे सार्वत्रिक आहे.

Ghumkaddi 1 ( मडकी घडवणारी आदिवासी भागातील स्त्री )

जिथं जाते तिथलं पीक-पाणी, घरं-कुटुंबं, कला-साहित्य, समस्या-अडचणी इत्यादी गोष्टी जाणून घेत, लोकांशी संवाद साधत फिरणं मला ठरावीक पर्यटनस्थळांना भोज्ज्या करून येण्यापेक्षा अधिक मानवतं. म्युझियम्सपेक्षा घरागावात वापरात असलेल्या वस्तू व वास्तू पाहणं जास्त भावतं. जलस्थळं हा त्यातला एक प्रिय भाग. उत्तराखंडमध्ये भटकताना म्हणूनच अनेक लहान गावांमधली जलमंदिरं मी आवर्जून पाहिली. त्यांच्या कहाण्यादेखील ऐकल्या.

Ghumkaddi 2

त्यातली एक गोष्ट होती बाडिया नावाच्या राजाची. बौख नाग टिब्बा या स्थळी घडलेली ही कथा. या पर्वतावर रोज एक गाय यायची आणि बेकल नामक झुडुपावर दुधाचा अभिषेक करून निघून जायची. ही गाय साधीसुधी नसून तिच्यात दुष्ट शक्ती आहेत, असं बाडिया राजाला वाटलं. त्यानं फर्मान काढलं की, “त्या गायीला शोधून काढा आणि ती राक्षसी शक्तींनी ग्रासलेली असेल तर तुम्हालाही त्रास देईल; त्यामुळे जिवंत आणता आली नाही, तर ठार मारून आणा.”

सैनिकांनी गायीला गंभीर जखमी केलं आणि मृतवत अवस्थेत तिला दरबारात हजर केलं.

आपण निर्दोष असताना राजानं आपल्याला अकारण मारलं, हे जाणवून गाय संतापली. मरता मरता तिनं बाडिया राजाला शाप दिला की, “जितक्या झटपट तू मला काहीएक चौकशी न करता मारलंस, तितक्याच झटपट तुझं कुल, तुझं घराणं नष्ट होईल. तुझ्या वंशजांचं नामोनिशाणदेखील इथं राहणार नाही. तुला लोक लक्षात ठेवतील, ते ‘अशी चूक पुन्हा कुणी करू नये’ याचं नकारात्मक उदाहरण म्हणून!”

बाडिया राजाला आपली चूक समजली, पण वेळ निघून गेली होती. त्याचा कुलनाश झाला. त्याच्या राजवाड्याचे अवशेष देखील शिल्लक राहिले नाही. बेकल झुडूप वाढत जाऊन त्याचं मोठं झाड बनलं. त्याच वृक्षाच्या लाकडाचा उपयोग करून लोकांनी त्याखाली एक मंदिर बनवायचं ठरवलं. मंदिरासाठी खोदकाम करताना त्या जागी शुभ्र, स्वच्छ पाण्याचा झरा फुटला आणि जमिनीखाली दोन नाग मूर्ती सापडल्या. हा ‘वासुकीनाथ’ मानला गेला. लोकांनी झऱ्यासाठी चांगलं मुख बांधलं. मंदिर पूर्ण केलं आणि मूर्तींची प्रतिस्थापना केली. या मूर्तींच्या प्रतिकृतींची गावातल्या घराघरात पूजा केली जाऊ लागली. या झऱ्याचं पाणी लोक पिण्यासाठी नेऊ लागले. मंदिर असल्याने कुणीही चपला घालून पाण्याजवळ जायचं नाही आणि एकूणच स्वच्छता राखली जाईल याची काळजी घ्यायची हे अलिखित नियम बनले. तीनेक हजार लोकसंख्येच्या गावाला सहज पुरेल, इतकं पाणी वर्षानुवर्षं हा ‘पवित्र’ मानला जाणारा झरा कधीही न सुकता, न आटता देत राहिला.

Ghumkaddi 3

अशा पद्धतीच्या जलस्थानांना इथं ‘नौला’ म्हणतात. महाराष्ट्रात गोमुख दिसतं, तशी दगडी कोरीव नागमुखं आणि त्यातून वाहणारं स्वच्छ, गार, मधुर चवीचं पाणी! गावात एखादं लग्न झालं की, नवं जोडपं इथं पूजा करायला येतं. वंशवृद्धीसाठी आशीर्वाद मागतं. बाशिंग उतरवतात. शंखनाद केला जातो. नवरी नवऱ्याला झाडाच्या एका फांदीने मारून आता तो संसारी बनला असल्याची आणि उनाडक्या थांबवण्याची आठवण करून देते. यावेळी तिच्या नणंदा चेष्टामस्करी करतात. नवरी पाण्याची घागर भरून सासरघरी नेते आणि संसाराची सुरुवात करते. अशा घरगुती कार्याक्रमांखेरीज दरवर्षी इथं जत्रा भरते. शेकडो लोक जमतात. गावाचा माहौल बदलून जातो.

Ghumkaddi 4

बहुतेक नौले एखाद्या मोठ्या वृक्षाच्या छायेत, वनराईत असतात. एखादी साधी पायवाट गावातून नौल्यापर्यंत जाते. जिथं झाडं नसतात आणि उन्हानं झरा आटेल अशी धास्ती वाटते, तिथं नौले उघड्यावर ठेवले जात नाहीत. त्यांच्या भोवती मंदिर बांधलं जातं आणि त्यात रक्षक नागदेवतेच्या प्रतिमाही स्थापन केल्या जातात. काही जागी यक्षप्रतिमा असतात.

आता जंगलतोड वाढत गेल्यापासून अनेक झरे आटू लागले. पावसाचं पाणी साठवून ठेवणारी जी नैसर्गिक तळी, डबकी होती, ती मातीनं भरली. कारण मातीला धरून ठेवणारी झाडंच राहिली नाहीत, तर एक-दोन मोठ्या सरी कोसळल्या की ती वाहून जाणारच आणि पाणवठे गाळाने भरून नष्ट होणारच. लाकडी मंदिरं जुनाट ठरून धार्मिक दुकानाचं स्वरूप धारण करत कोरीवकाम केलेल्या दगडांची, सिमेंटकॉंक्रीटची बांधली जाऊ लागली. नौल्याचं पाणी भरण्यासाठी जातीपाती विचारल्या जाऊ लागल्या. काही मंदिरांमधून स्त्रियांना प्रवेश नाकारला जाऊ लागला. नौलदेवीची मंदिरं उभारली जाऊ लागली, पण नौल्यांचं जतन बंद झालं. धार्मिक स्थळं एकमेकांशी अस्वच्छतेसाठी स्पर्धा करू लागली. पाण्याची पूजा उरली नाहीच, उलट नद्या-तळी-समुद्र सारंच ‘निर्माल्य’ टाकण्यासाठी वापरलं जाऊ लागलं. पाणी वाचवणं, पाणी सुरक्षित ठेवणं, पाणी स्वच्छ ठेवणं, पाणी जपून वापरणं या गोष्टी केवळ शासकीय घोषणांमध्ये शिल्लक उरल्या. पाणी एक विकत घेण्याची वस्तू बनलं, जीवनावश्यक गरज नव्हे!

पाण्याविषयीची श्रद्धा तर संपलीच, आस्थाही उरली नाही.

Ghumkaddi 5

( पंत्युरा नौला )

मला सगळ्यांत प्रिय वाटलेला नौला कवी सुमित्रानंद पंत यांच्या जन्मगावीचा... पंत्युरा नौला! अल्मोडापासून जवळ स्यूनाराकोट या गावात आहे. याच्या गाभाऱ्यात पाण्याचं कुंड आहे. प्रवेशद्वारावर नवग्रहांचं दर्शन घडतं. भिंतींवर सुंदर कोरीवकाम केलेलं आहे. मंदिरात असतात तशा शिल्पांच्या कोरीव पट्ट्या आहेत. गाभाऱ्याच्या भिंतींवर विष्णूच्या दशावताराचं शिल्पांकन केलेलं आहे. आतून वर नजर टाकली तर छतावर देखील देवदेवता कोरलेले दिसतात. बाहेर चारी बाजूंनी अर्धमंडप आहेत. बाहेरच्या भिंतीही शिल्पांनी सजलेल्या आहेतच. बृहस्पती पंत नामक व्यक्तीने हे जलमंदिर उभारलं असं सांगितलं जाते. कवी सुमित्रानंद पंत कदाचित याच घराण्यात जन्मलेले असावेत. कवीचं गाव अजून काय वेगळं दिसायला हवं?

‘घुमक्कडीमधील याआधीचे ब्लॉग :


घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं...


घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!


घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…


घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस


घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा


घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो


घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय


घुमक्कडी (25): साकाचं बेट


घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ


घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय


घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!


घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो


घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू


घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!


घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं


घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ


घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे


घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे


घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!


घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे


घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!


घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!


घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 


घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी


घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये


घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण


घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना


घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!


घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी


घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना


घुमक्कडी : (2) सीतेची तहान


घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई


 

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV