चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही...

चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही...

एकोणीसाव्या शतकातील पुरुषांनी लिहिलेल्या कविता वाचत होते. त्यात मृगेंद्र नामक कवीच्या एका कवितेवर थबकले. ही कविता स्त्री शिक्षणाला विरोध करणारी होती. शिक्षणाने स्त्रिया कशा बिघडतील? याची भीती या कवितेत व्यक्त केलेली होती. त्यातले मुद्दे असे होते : 1. स्त्रिया शिकू लागल्या तर, हिंदुधर्म बुडेल; 2. शिकलेल्या स्त्रिया  पतीला ठार मारतील; 3. घरोघरी व्यभिचार सुरू होईल; 4. शिकलेल्या स्त्रिया नवऱ्याला चाकर / नोकर म्हणतील आणि ‘केवळ माझी कामवासना पूर्ण करण्यासाठी तुला नेमलं आहे’ असं त्याला सांगतील; 5. त्या कुणालाच घाबरणार नाहीत; 6. त्यांच्यातील विनय नष्ट होईल; 7. त्यांच्यातील नीती नष्ट होईल; 8. त्या झगे आणि टोप्या घालू लागतील; 9. त्या दारु पिऊ लागतील; 10. त्या धर्मांतर करतील.

वाचताना आधी हसू येत होतं. काळाच्या अनेक गोष्टी अशा आधी गमतीच्याच वाटतात. मग एक साधं शिक्षण घेण्यासाठी स्त्रियांना किती प्रवास करावा लागला आहे आणि कशाकशातून जावं लागलं आहे, हे ध्यानात येऊ लागतं.

गेली काही वर्षं स्त्रीजीवनाचा इतिहास अभ्यासते आहे, त्यातून देशातल्या अनेकविध विचारांचे नमुने आणि हतबुद्ध व्हावं अशा एकेक हकीकती कळत गेल्या. मृगेंद्रच्या कवितेतील हे मुद्दे पाहता एक प्रश्न पडला की, आता काळाच्या कसोटीवर यातलं नेमकं काय काय खरं ठरलं आहे? आणि जे खरं ठरलं आहे, ते केवळ स्त्रीशिक्षणाचा परिणाम आहे का? एकेक मुद्दा पाहूया. स्त्री शिक्षणाने हिंदू धर्म बुडला वगैरे मुळीच नाही; धर्म आणि जाती दोन्ही टिकवून ठेवण्यात स्त्रियांचा हातभार मोठा आहे. पितृसत्ताक पद्धतीने स्त्रियांकडे इतकी कर्मकांडे सोपवली की, अनेक शतकांमध्ये त्या अजून साधी निरर्थक व्रतंवैकल्यं बाजूला सारु शकल्या नाहीत. शिक्षणाने त्यांना ‘सुगृहिणी’ बनवण्याचं काम केलं; पण विचारी, निर्णयक्षम, कृतिशील व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास फारच मोजक्या स्त्रियांचा झाला. दुसरा आणि तिसरा मुद्दा तर विनोदीच आहे; मुळात व्यभिचार ही कुणा एकट्या स्त्रीने करण्याची गोष्ट नाही, हे पुरुष नेहमी सोयीस्करपणे विसरतात. तरी किंवा मग पुरुषाला बहकवण्याचा गुन्हा स्त्रीचा मानून साळसूद मोकळे होतात.

तुरुंगवास भोगणाऱ्या गुन्हेगार स्त्रियांचे गुन्हे पाहिले, तर त्यात ‘पतिहत्या’ हा गुन्हा लाखांत एखादा सापडला तरी पुष्कळ; उलट असंख्य कारणांनी पत्नीची हत्या करणारे शिक्षित पुरुष मात्र अनेक आढळतील. स्त्रिया कुणाला घाबरणार नसतील, त्या आवडता व सोयीचा पोशाख घालणार असतील, तर त्याला दोष कसा मानायचा? त्यांच्यातला विनय नष्ट होणं, त्यांनी प्रश्न विचारणं, त्यांनी मान वर करुन बोलणं, नजरेला नजर भिडवणं, स्पष्टवक्ती असणं इत्यादी गोष्टी पारंपरिक वळणाच्या आणि मनानं अजून एकोणीसाव्या शतकातच राहिलेल्या पुरुषांना त्रासदायक वाटू शकतील. कदाचित; आधुनिक पुरुषांना ती एक नैसर्गिक बाब वाटेल. स्त्रीची व्यसनं हा मध्यमवर्गातल्या चर्चेचा भाग आहे; कनिष्ठ व उच्च वर्गांना बाई दारु पिते, विडीकाडी ओढते, तंबाखू खाते याचं वावडं नाही. ‘ही पुरुषांच्या प्रमाणेच आमचीही व्यक्तिगत आवडनिवड आहे आणि त्यातली जोखीम आम्हांला माहीत आहे’ असं म्हणत कोणतीही स्त्री आपले निर्णय घेऊ शकते; याचा शिक्षणाशी काहीएक संबंध नाही. धर्मांतर हा एकोणीसाव्या, विसाव्या शतकात चर्चेचा/वादाचा विषय बनलेला होता; आज कायद्याने मान्यता असल्याने तीही व्यक्तिगत निवड ठरते आणि कैक विचारी, नास्तिक स्त्रिया निधर्मी वर्तन करतानाही दिसतात.

हे सगळं आठवण्याचं कारण एक नवा अहवाल आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने ‘जागतिक लैंगिक असमानता निर्देशांक 2017’ या शीर्षकाचा एक अहवाल जारी केला असून; त्यात असं म्हटलं आहे की, स्त्री-पुरुष आर्थिक समानतेत भारताची घसरण झाली आहे. भारत 144 देशांत तो 108व्या स्थानावर आला आहे. 2016 सालच्या अहवालानुसार, भारताचं स्थान 87 वं होतं. पहिला अहवाल 2007 साली आला, तेव्हा भारत 97 व्या क्रमांकावर होता. सर्वोच्च स्थानावर आहे तो म्हणजे पहिला आइसलँड, दुसरा नॉर्वे आणि तिसरा फिनलँड. दक्षिण आशियात सर्वात वरच्या स्थानावर आहे बांगला देश; एकूण यादीत त्याचा क्रमांक 47 वा आहे. भारताहूनही खालच्या स्थानावर आहेत इराण, येमेन, सौदी अरेबिया, पाकिस्तान व सीरिया हे देश. जगभरातलं एकत्र प्रमाण पाहिलं तर ते 68 टक्के आहे. (गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडं घसरलेलंच आहे.)

शिक्षणाने ही असमानता दूर झाली नाही आणि आपण तर घसरतच या अतोनात लैंगिक असमानता असणाऱ्या देशांच्या जवळ जाऊन थांबलेलो आहोत. अहवाल दोन प्रमुख मुद्द्यांवर बेतलेला आहे : 1. आरोग्य आणि जीवनमान (यात 139 वं स्थान ); आणि 2. स्त्रियांचा आर्थिक सहभाग आणि त्यांना उपलब्ध संधी ( यात 141 वं स्थान ). भारतात कामाचे स्वरुप आणि परिश्रम या दोन्हीत समानता असूनही स्त्रीला कमी मेहनताना मिळतो, हा जुनाच निकष आजही कायम आहेच. भारतीय पुरुषांच्या तुलनेत भारतीय स्त्रियांची वार्षिक कमाई केवळ 25 टक्के आहे. कारणं तीन आहेत : एक वाढतं अनारोग्य, दोन घटतं राजकीय प्रतिनिधित्व आणि तिसरा मुद्दा आहे शिक्षणाचं घसरणारं प्रमाण.

यावर उपाय काय? शिक्षणाचा टक्का वाढवणं हा पहिला उपाय. आरोग्यसुविधा केवळ कागदोपत्री न राहता वास्तवात उतरवणं, ही दुसरी तातडीची निकड. राजकारण, व्यवस्थापन, तांत्रिक क्षेत्रं, वरिष्ठ पदं या चार जागी स्त्रियांची संख्या वाढवली पाहिजे, हा तिसरा मार्ग. शेती असो, इतर मजुरी असो, कारखाने असोत वा इतर कार्यालये... स्त्रीला समान वेतन आणि समान दर्जा मिळावा ही अजून एक दीर्घकाळ असलेली अपेक्षा. घरकामात स्त्रियांचा 65 टक्के हिस्सा आहे, पण काम म्हणून त्याला प्रतिष्ठा नाही, पगार तर नाहीच नाही.

मृगेंद्रचा काळ अजूनही संपलेला नाहीच. बालविवाह, लैंगिक अत्याचार, बलात्कार, बाळंतपणातले मृत्यू, रक्तपांढरी, कुपोषण, स्त्रीभ्रूणहत्या, लेदर करन्सी म्हणून होणारा वापर, वेश्यावृत्ती, देवदासी, हुंडा, हत्या, मानसिक हिंसा... एक ना दोन, शेकडो प्रश्नांना स्त्रिया आजही सामोऱ्या जात आहेत. या प्रश्नांत ‘नवं काय?’ म्हणून त्याविषयी लिहिणं – बोलणं देखील लोकांना कंटाळवाणं वाटू लागलं आहे. बोलणाऱ्या स्त्रियांना आक्रस्ताळ्या म्हणणं तर सोपं असतंच आणि मृगेंद्रच्या व्याख्येनुसार तर त्या बिघडलेल्याही ठरतात.

मृगेंद्रच्या पाठोपाठ उतारा म्हणून मी सावित्रीबाई फुले यांच्या कविता वाचल्या...

अज्ञान नष्ट करी, वर सर्वा लाभो, प्रार्थना ही सावित्रीची

- अशी प्रार्थना करत काव्यलेखन करणाऱ्या सावित्रीबाई फुले त्यांच्या काळातल्या वास्तवदर्शी कविता लिहिणाऱ्या एकमेव कवयित्री आहेत. खेळ की घरकाम की शाळा, असा प्रश्न पडणाऱ्या  मुलींना उद्देशून त्या सांगतात -

काम पहिलं शिकायचं आहे, दुसरं काम खेळ खेळा

जमेल तेव्हा झाडणं पुसणं,  हात लावा घरकामाला

जा आधी जा शाळेला

स्त्रीच्या शोषणाला, तिच्या दुय्यमतेला शब्द देताना त्या म्हणतात,

बाई काम करत राही, ऐतोबा हा खात राही

पशुपक्षात ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का?

आजही पुन:पुन्हा सावित्रीबाईंची आठवण काढावी आणि त्यांचं सांगणं वाचत, ते विचारांत – कृतीत आणावं हेच श्रेयस्कर...!

‘चालू वर्तमानकाळ’ सदरातील याआधीचे ब्लॉग :

चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये!

चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं

चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन

चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’  

चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं

चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर

चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड

चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे

चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं

चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं

चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या

चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…

चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…

चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत

चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!

चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब

Blog शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: kavita mahajans new blog in gender discrimination
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV