घुमक्कडी (52) : वाटमोड अर्थात डेडएंड!

घुमक्कडी (52) : वाटमोड अर्थात डेडएंड!

चालता चालता आकस्मिक ध्यानात येतं की, इथून पुढे वाट नाही; ती मोडलेली आहे चक्क. जंगलातून चालताना पुढे एकदम हिरव्या काळोखाची गर्द राई दिसते, तिच्यात माणसांनी घुसणं अशक्य. डोंगरदऱ्यांमधून भटकताना अवचित कडा सामोरा येतो. मागे वळ सांगणारी थेट उभी कोसळण! शहरांमध्ये फिरताना एखादी भिंत आडवी येते. शहरात अनेक जागी पाट्याही असतात डेडएंडच्या. वाटमोड हा मराठी शब्द मला डेडएंड या शब्दाहून जास्त आवडतो. त्यात संपणं वा  शेवटही सूचित केलेला नाही आणि मृत्यू तर नाहीच नाही. वाट फक्त ‘मोडली’ आहे; त्यामुळे इथून वळा, मागे फिरा वा डावीउजवीकडे जा आणि दुसऱ्या कुणा वाटेने मंझील गाठा, मुक्कामी पोहोचा! – यात सकारात्मकता आहे.

Blog 1-compressed (छायाचित्र : Chinlop Fudong Bhutia)

गेले वर्षभर मी ‘घुमक्कडी’ लिहितेय, तरी लाखो गोष्टी अजून शिल्लक आहेत... अगदी शेकडो वर्षं सांगता येतील इतक्या गोष्टी. अनेकविध स्थळांच्या, वेगवेगळ्या काळातल्या, शेकडो भाषांमधल्या  विश्वउत्पत्तीच्या कथा, सृष्टीकथा, पुराकथा, लोककथा, दंतकथा... एक ना दोन, अनेक प्रकारच्या कथा. एका आदिवासी जमातीत ‘गप’ नावाचा लोककथांचा प्रकार ऐकला होता; प्रमाण मराठीत त्याला ‘थाप’ म्हणूया. ही ‘थाप’ सांगणाऱ्या माणसाच्या कल्पनाशक्तीनुसार कितीही विस्तारत जाऊ शकायची. अतिशयोक्तीचा महामेरूच तो...

“घरात कंटाळा आला. छपरातून उडी मारली. पुढच्या क्षणाला दाट जंगलात पोहोचलो. फार तहान लागली, पण पाणी काही दिसेना. मग बोरीच्या झाडावर सरासरा चढलो. शेवटच्या फांदीवर जाऊन सगळ्यांत वरच्या काट्यावर उभा राहिलो, तर चार झाडांच्या पुढेच समुद्र होता. समुद्राच्या पाण्याचा इतका गोड वास घमघमत होता, जणू महुवाच्या पर्वताएवढ्या राशी त्यात ओतल्या आहेत. घाईने पुढे गेलो तर एक कोलंबी आडवी आली. तिचं तोंड पूर्वेकडे आणि शेपूट उत्तरेकडे. ती इतकी लांबरुंदउंच होती की आभाळातला सूर्यही दिसेना. पाणी प्यायचं तर हिला ओलांडून कसं बरं जावं? कोलंबीचा होता एक नवरा....” असं एकदा सुरू झालं की ऐकणारे हमखास गुंगायचे आणि गंभीर चेहरेदेखील हसू लागायचे.

Blog 2 (चित्रकार आलमेलकर यांचे एक प्रसिद्ध चित्र)

 

आदिवासी भागात काम करताना, फिरताना असंख्य कथागीतंही ऐकली. ती वाद्यांच्या तालावर गायली जात, ती वाद्यंही अफलातून. मधमाशांचे चार प्रकार, त्यातल्या कोती नावाच्या मधमाशीच्या पोळ्याचं मेण; अंबाडीचा आतून पोकळ असलेला वाख आणि एक परात अशा तीन चिजा घेऊन एखादं वाद्य बनू शकतं? हो... आणि त्याला ‘थालसूर’ असं नावही आहे. गोष्टींशी निगडित अशी कितीतरी रोचक माहिती मिळायची. गोष्ट गाणाऱ्याला साथ देणारे दोन बाजूंना बसलेले दोन ‘पाखेले’... जे गरज भासली की सूर उचलायचे, कोरस बनायचे. मुख्य गायक जणू एखाद्या पक्ष्याचं शरीर आणि हे साथीदार म्हणजे त्याचे दोन पंख... कल्पनाच किती सुंदर वाटते. असे कैक अनोखे शब्द देखील प्रवासात सापडतात.

भाषेच्या निर्मितीविषयी कझाकिस्तानमधली एक गोष्ट आहे, त्या गोष्टीने ‘घुमक्कडी’ची वाटमोड करूया. परत फिरून दुसऱ्या वाटेला लागलं तरी त्या आधीचं दृश्य देखणं, संस्मरणीय होतं... असं जाणवावं, अशी भावना ही या मालिकेतली शेवटची गोष्ट लिहिताना माझ्या मनात आहे.

सृष्टीनिर्मितीचा सातवा दिवस होता. सर्वात शेवटी ईश्वराने मानवाची निर्मिती केली. अजून काहीतरी राहिलं आहे... अशी रुखरुख त्याच्या मनाला लागून राहिली होती. निर्माण केलेली जंगलं, पर्वत, नद्या, समुद्र, दगड, माती, प्राणी, पक्षी, मासे, कीटक, माणसं... सगळ्यांकडे त्यानं पुन्हा एकवार नजर फिरवली. अखेर काम थांबवून त्यानं थोडी विश्रांती घ्यायचं ठरवलं. विश्रांतीनंतर पुन्हा ताजंतवानं वाटू लागलं आणि पुढच्याच क्षणी त्याच्या ध्यानात आलं की, मानवाच्या कवटीत मेंदू भरायचा राहून गेलाय. त्यानं एक मोठा जग घेतला, त्यात मेंदू तयार करून ठेवलेले होते; गॅब्रिएल नावाच्या एका देवदूताला हाक मारून जग त्याच्या ताब्यात दिला आणि सांगितलं, “मानवाच्या कवट्यांमध्ये मेंदू भरायचं काम तेवढं बाकी राहिलंय, ते आता तू करून टाक.”

गॅब्रिएलने पंख फैलावले आणि जग उचलून उडतउडत तो पृथ्वीवर माणसं ज्या स्थळी ठेवलेली होती, तिथं गेला. त्यानं काही माणसांच्या कवट्यांमध्ये मेंदू भरले आणि पुढे सरकला, तेव्हा त्याच्या ध्यानात आलं की इथं तर अवघा जनसागर आहे! इतक्या प्रचंड संख्येने माणसं दिसताहेत, त्या सगळ्यासाठी एवढे मेंदू पुरेसे ठरणार नाहीत. आता काय करावं हे त्याला सुचेना. तेवढ्यासाठी पुन्हा स्वर्गात जाऊन ईश्वराला विचारण्याचा त्याला कंटाळा आला. त्यापेक्षा आपणच काहीतरी युक्ती लढवली म्हणजे वेळही वाचेल आणि बळही वाचेल, असं वाटलं. मग त्यानं जगमधल्या मेंदूंचे चार-चार तुकडे केले आणि एकेक छोटासा तुकडा एकेका माणसाच्या कवटीत भरला. काम पटकन उरकून टाकून तो परतला.

काही काळाने ईश्वराच्या ध्यानात आलं की, माणसं दु:खी आहेत. भूक, दारिद्र्य आणि अश्रूंचं साम्राज्य सर्वदूर पसरलेलं आहे. त्यांना एकमेकांसोबत कसं राहायचं हे अजिबात कळत नाहीये. सगळे नुसते वाद घालताहेत आणि भांडताहेत.

Blog 3-compressed

गॅब्रिएलने आळसापोटी किती मोठा घोटाळा करून ठेवलाय हे त्याच्या ध्यानात आलं. यावर काहीतरी मार्ग शोधायला हवा होता. मग त्यानं सुरुवातीला ज्या माणसांना पूर्ण मेंदू मिळाले त्यांचा शोध घेऊन त्यांना एकत्र केलं. त्यांच्या मेंदूंना  एक विलक्षण सुंदर शक्ती प्रदान केली... विचार आणि कल्पना करण्याची अद्भुत शक्ती! त्यामुळे ही माणसं गोष्टी रचून सांगू लागली, लिहू-वाचू लागली, चित्रं रंगवू लागली, नृत्य करू लागली, गाणी गाऊ लागली, कीर्तनं-व्याख्यानं करत आपले विचार सर्वदूर पोहोचवू लागली.

Blog 4

ही प्रतिभाशाली व गुणवान माणसं नवनवे शोध लावू लागली. त्यांनी अनेक यंत्रं निर्माण केली, अनेक तंत्रं शोधली, विविध उपयुक्त शोध लावले. मानवजातीचं भलं कशाने होईल, याच एकमेव ध्येयाने ते पछाडले होते. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या धार्मिक विधींमध्ये गोष्टींचा समावेश झाला. मात्र या पूर्ण मेंदूच्या लोकांची संख्या पाव मेंदूच्या लोकांच्या संख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे पाव मेंदूवाले बहुसंख्य त्यांना विक्षिप्त समजून हसतात. पूर्ण मेंदूवाले त्यांच्या हसण्याकडे दुर्लक्ष करून आपली कामं करत राहतात. त्यांना माहीत आहे की, ईश्वराला केवळ त्यांच्याविषयीच विश्वास वाटतो आणि म्हणून ईश्वर त्यांच्या लिहिण्या-वाचण्या-गाण्या-नाचण्या-रंगवण्या-बोलण्यावर लक्ष ठेवून आहे!

पुन्हा भेटू नव्या वाटेवर... नवे विचार, ताज्या घडामोडी आणि नव्या गोष्टींसह!

‘घुमक्कडी’मधील याआधीचे फोटो :

घुमक्कडी (51) : रौद्रभीषण ते प्रेममधुर

घुमक्कडी (50) : पाऊस आणि वाऱ्याचं युद्ध!

घुमक्कडी (49) : उत्तराषाढाची सुफळ संपूर्ण कहाणी!

घुमक्कडी (48) : मस्तवाल मेघ आणि सावुरीचा देहगंध

घुमक्कडी (47) : पाऊस आणि अश्रू

घुमक्कडी : (46) चिमूटभर मिठाच्या समुद्राएवढ्या गोष्टी!

घुमक्कडी (45) : समुद्राचं पाणी खारं का झालं?

घुमक्कडी (44) : कोळ्याच्या जाळ्यात पृथ्वी!

घुमक्कडी (43) : बिघडलेलं दुरुस्त करणारे जादूगार बैगा

घुमक्कडी (42) : कासवकथांचे अनेक अवतार

घुमक्कडी (41) : समुद्राची निर्मिती आणि सूर्यचंद्राची वाटचाल

घुमक्कडी (40) : न्युवाची भलीबुरी लेकरं

घुमक्कडी (39) : दाट काळं धुकं आणि फान्गु

घुमक्कडी (38) : धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं

घुमक्कडी (37) : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा

घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना

घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई !

घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!

घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून…

घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं…


घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!

घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…

घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस

घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा

घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (25): साकाचं बेट

घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!

घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV