घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा

घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा

एखाद्या शब्दाचा अचूक अर्थ शोधण्यासाठी शब्दकोश उघडला जातो. मात्र तो शब्दार्थ सापडूनही तो लगेच बंद मात्र केला जात नाही. त्या शब्दाच्या शेजारपाजारच्या शब्दांचीही विचारपूस केली जाते आणि एखाद्या गावात गेलोच आहोत तर काम झाल्यावर थोडं अकारण भटकावं वाटावं तसं कोशाची पानं चाळत अधूनमधून कुठल्याही शब्दाजवळ थबकून गप्पाटप्पा होतात. तसा मला अवचित ‘लोचा’ भेटला. इथं, म्हणजे ‘मराठी-मराठी शब्दकोशा’त भेटण्याआधी तो मला येताजाताच्या संवादात कुठेही फार सहज भेटत होता. तेव्हा त्याचं कधी विशेष अप्रुप वाटलं नव्हतं. तो मराठी आहे, असंही मला कधी वाटलं नाही; हिंदी सिनेमांमधून ओळखीच्या झालेल्या बम्बय्या हिंदीतला तो आहे असाच अंदाज होता. पण सिनेमातलं ‘वाट लगा दुंगा’ जितकं मराठी, त्याहून लोचा जास्त मराठी आहे हे जाणवलं आणि घराच्या माणसाची किंमत बाहेरच्यांनी कौतुक केल्यावर समजावी व त्याच्याकडे बघण्याची नजरच बदलून जावी तसंही झालं. लोचाचा कोशातला अर्थ होता 'बनावट रेशमाचा गाळ!' रेशीम खूपदा तुटतं, धाग्याचे लहान तुकडे आणि त्यांची गुंतवळ रेशीम बनवण्याच्या कारखान्यात साचतात... तो कचरा म्हणजे लोचा!

blog 1

शब्दाची चर्चा सुरू असताना एका मित्राने सांगितलं की, मुक्तेश्वरांच्या ‘रुक्मिणी स्वयंवर’ या काव्यात, कृष्ण रुक्मिणीला घेउन गेल्यानंतर, रुक्मीने शिशुपालाला ही बातमी कळवताना लोचा हा शब्द वापरलेला आहे!

म्हणजे शब्द किती जुना असावा याचा अंदाज आला. प्रेम आणि प्रेमविवाह या शब्दांपाठोपाठ रेशमाचे बंध, रेशीमगाठी असले शब्द रोम्यांटिक कविता पाडणारे लोक वापरत असतातच; अशा संबंधांचा, नात्यांचा गुंता झाल्यावर ‘लोचा’ हा शब्द वापरणं स्वाभाविकच. तरीही कृष्णाने रुक्मिणीला पळवून नेण्याला लोचा म्हणणं याचं खूपवेळ हसू येत राहिलंच.

पाठोपाठ तुती आठवल्या, तुतीवर पाळले जाणारे रेशमाचे किडे आठवले, तलम रेशमी वस्त्रं आणि रेशमाच्या अनेक गोष्टीही आठवू लागल्या.

blog 2

blog 3

blog 4

चीनमध्ये रेशमाच्या किड्यांचं रक्षण करणारी एक अश्वमुखी देवता आहे. तिची एक गोष्ट आहे. एकदा दरोडेखोरांनी तिच्या वडिलांनाच उचलून नेलं. जो कुणी त्यांना दरोडेखोरांच्या तावडीतून सोडवून आणेल, त्याच्याशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन... असं आईने जाहीर केलं. एका घोड्याचं तिच्यावर अतोनात प्रेम होतं; त्याने विडा उचलला आणि त्यांना सोडवून घरी सुखरूप आणून सोडलं. पण घोड्याला मुलगी द्यायची या कल्पनेनेच ते बिथरले आणि उपकार विस्मरून कृतघ्नतेने त्यांनी त्या घोड्याला जीवे मारलं. वरतून त्याची कातडी सोलली आणि उन्हात वाळत घातली. ती त्या कातड्याजवळून जात असताना कातड्याने उडी मारून तिला पकडलं आणि पळवून नेलं. मग जेडने तिचं रेशमी किड्यात रूपांतर करून तिला स्वर्गात नेलं; तरी तिचं रूप अश्वमुखी बनलं.

रेशीमकिड्याची अजून एक गोष्ट सापडली. रेशीमकिडा आणि कोळी दोघेही धागे काढणारे. एके दिवशी कोळी रेशीमकिड्याला म्हणाला, “ माझ्या धाग्यांहून तुझे धागे अधिक चांगले आहेत... माझे काळेकरडे, तर तुझे शुभ्रसोनेरी, चमकदार आणि तेजस्वी. तू स्वत:तून धागे काढत कोश बनवतोस आणि आपण जणू एखादा राजा आहोत अशा भ्रमात आपल्या कोशात राहतोस. मग एखादी स्त्री येते आणि कोश गरम पाण्यात टाकून रेशीम काढून घेते. कोश नष्ट होतात आणि तुम्हीही जिवंत राहत नाहीच. एकेक करून सारे रेशीमकिडे असे नष्ट होतात. हे किती लाजिरवाणं आहे की तुम्ही इतकी सुंदर गोष्ट निर्माण करता आणि तिच्याचपायी मुर्खासारखं मरण पत्करता!”

हे ऐकताना रेशीमकिडा विचार करत होताच; तो उत्तरला, “आमची कृती आत्महत्येसारखी वाटते हे खरं आहे. पण आम्ही रेशीम विणतो, म्हणून लोक इतकी सुंदर वस्त्रं विणू शकतात, परिधान करू शकतात. त्यामुळे आमचे श्रम व्यर्थ ठरत नाहीत. तुम्ही कोळी काय करता? तुम्ही तुमच्या धाग्यांपासून जाळं विणता. छोटे गोंडस किडे अडकवून मारण्यासाठीचा पिंजराच असतो तो. तुम्ही दुसऱ्यांचं दु:ख क्षणभरही दूर करू शकत नाही, कुणाला कणभरही आनंद देऊ शकत नाही. आपलं बोलणं – वागणं क्रूर आहे असं कधीच जाणवलं नाही का रे तुला? तुला बळी घेण्याचा आनंद माहीत आहे, पण सौंदर्याच्या प्रेमासाठी मरून जाण्यातली भावना तुला कधी कळणार? पोट भरण्याहून दुसरी सुखं तुला कधीच कळली नाहीत आणि समर्पणातलं समाधानही तुला कधी उमगणार नाही.”

blog 5

blog 6

blog 7

अशा गोष्टी कधीकधी काही बोध मांडतात; काहीएक तात्पर्य सांगतात. मला तात्पर्याहून अधिक त्यांच्यातलं काव्य भावतं. प्रेमात समर्पण वगैरे कल्पना जुन्या आणि कालबाह्य झालेल्या आहेत, असं आज कैक लोकांना वाटतं. स्त्रियांकडूनच सतत समर्पणाची अपेक्षा का? – असा प्रश्न विचारत आधुनिक स्त्रीनेही ते सरसकट नाकारलेलं दिसतं. तरीही प्रेमात, मैत्रीत, नात्यात कुणी सहज उत्फूर्तपणे आपल्यासाठी काही केलं तर आपल्याला किती सुखी-समाधानी वाटतं हे यातलं कुणीच नाकारणार नाही आणि दुसऱ्या बाजूने आपण हे कुणासाठी केलं तरीदेखील आपल्याला किती आनंदी वाटतं हे आपणही नाकारू शकणार नाही. म्हणून तर जगात प्रेम कधी कालबाह्य झालं नाही आणि प्रेमकवितादेखील कधी कालबाह्य झाल्या नाहीत. अवस्था कोणतीही असो... प्रेम असलं की रेशीमकिडा जीवाश्म बनूनही शिल्लक राहतोच...
मी एक झरा होते
तू नहात होतास
नदी होते
पोहत होतास
समुद्र बनले
स्वार झालास लाटांवर
वाळवंट उरले
तू जीवाश्म. 

घुमक्कडीब्लॉग मालिकेतील याआधीचे सर्व ब्लॉग :

घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (25): साकाचं बेट
घुमक्कडी (२४) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी 23. लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (२१) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (१९) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (१८) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (१७) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

 घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…  

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV