घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना

घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना

उत्सव अनुभवावेत तर ते आदिवासी भागातच, या मतावर मी दिवसेंदिवस अधिक ठाम होत चालले आहे. सण कोणताही असो, उत्सव कोणताही असो, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांमधलं सपाटीकरण वेगाने वाढत चाललेलं आहे. कुटुंबात सण साजरा करताना जितकं सोयीचं आहे, तितकं करायचं आणि बाकी सोडून द्यायचं अशी पद्धत माझ्या आधीच्या पिढीतच आली होती. आता बारा महिने हवे ते खाद्यपदार्थ उपलब्ध असतात, नवे कपडे हवे तेव्हा घेता येतात, नाचायला – काहीही साजरं उर्फ सेलिब्रेट करायचं अगदी किरकोळ निमित्तंही पुरतात... त्यामुळे नाविन्य, उत्सुकता कशातच नाही. उत्साह फसफसून आलेले दिसतात, ते तितक्याच झटकन विरतात देखील. शहरी-ग्रामीण भागांची झपाट्याने सरमिसळ होत जात असल्याने खेड्यांमधलं चित्रही फारसं वेगळं राहिलेलं नाही. आदिवासी भाग मात्र अजून निराळा आहे.

Blog 1

चैत्र शुक्ल अमावास्येच्या द्वितीयेला सृष्टीचा सण सरहुल येतो. झारखंडमध्ये मी तो प्रथम अनुभवला. उरांव, मुंड, संताळ अशा विविध आदिवासी जमाती देशात हा सण साजरा करतात. सरहुलची नावं विविध आहे. मुंड बा परब म्हणजे पुष्पोत्सव म्हणतात. उरांव खद्दी म्हणतात. संताळ बाहा असे म्हणतात. हा फुलांचा उत्सव आहे खरं तर. दिवाळीला आपण दिव्यांचा सण म्हणतो, तसा हा फुलांचा सण! ही कल्पनाच मुळात अत्यंत भुरळ घालणारी आहे. पलाश, काटेसावर, मोह, शाल... जंगलातले मोठाले वृक्ष फुलांनी लदबदून गेलेले असतात. हे रंगागंधाचं आगमन साजरं तर केलंच पाहिजे.

Blog 2

मुंड जमातीत ग्रामदेवतेची पूजा करतात. सालवृक्षाची फुलं देवाला वाहून एकमेकांना दिली जातात. फुलं केसांत माळली जातात, कानावर खोवली जातात. लाल काठांच्या पांढऱ्या साड्यांचा गणवेश त्यात अशात आलाय, पण लहान गावांमध्ये तो नसतो. मग ढोल – मांदल यांच्या तालावर नृत्य आणि गाणी. या उत्सवानंतरच नव्या फुलाफळांचे सेवन सुरू होतं.

Blog 3

उरांव आदिवासी सूर्य आणि पृथ्वी यांच्या विवाहाप्रीत्यर्थ हा सण साजरा करतात. सालवृक्षांच्या जंगलात जाऊन सारना बुढी देवतेची पूजा करतात. त्यांच्या पुजाऱ्याला पहान असं म्हणतात. तांदळाची दारू आणि कोंबडीचं मांस घालून शिजवलेला भात यांचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी पहान मिरवणुकीने प्रत्येक घरी जातो. बायका त्याचे पाय धुवून त्याला नमस्कार करतात, नृत्य झाल्यावर तो बायकांच्या केसात साल वृक्षाची फुलं माळतो आणि दाराच्या चौकटीवरही फुलांचे गुच्छ खोवतो. बायका त्याच्या अंगावर पाणी ओततात, त्याला तेल लावतात, खायला भात आणि तांदळाची दारू प्यायला देतात. तरुण मंडळी सालाच्या फुलांचे सुंदर मुकुट बनवतात आणि ते परिधान करून रात्रभर नाचतात. हा नाच निदान तीन-चार रात्री तरी होत राहतो.

Blog 4

संथाळ आदिवासींची पूजा साधारणपणे उरांव समाजासारखीच असते. ते पुजाऱ्याला नायके म्हणतात. सालाच्या फुलांसह ते मोहाची फुलं, दुर्वा आणि अक्षता वाहून पूजा करतात. कोंबडीचा बळी देताना तो कशासाठी व कुणाला द्यायचा आहे यावर रंग ठरतो. पांढरा कोंबडा महान ईश्वराला, लाल कोंबडा ग्रामदेवतेला आणि काळी कोंबडी दुष्ट आत्म्यांना शांत करण्यासाठी बळी देतात.

Blog 5

हा उत्सव झाला की मग शेतीची कामं सुरू. उत्सवावेळी आदलेदिवशी मातीच्या नव्या घड्यात पाणी भरून ठेवतात. दुसरेदिवशी पूजेनंतर ते पाणी पाहून पुजारी पावसाचं भाकीत करतो. नाचायची जागा पूजेच्या जागेसारखीच स्वच्छ करतात. पाण्यातून खेकडे पकडून आणून दोऱ्याने बांधून ठेवतात. पेरणीच्या वेळी पूजा करून या खेकड्यांचे अवशेष शेतात शिंपडले जातात. खेकड्यांना जशी खूप पिल्लं होतात, तसंच शेतात मुबलक धान्य पिको आणि शेतकऱ्यांची भरभराट होवो, अशी भावना त्यामागे असते.

फुलांनी देवाला ठरावीक फुलं वाहणं, फुलदाणीत चार फुलं फुलं ठेवणं, लग्नात नवरानवरीने एकमेकांना गळ्यांत फुलांचे हार घालणं, बायकोला आठवणीने गजरा आणण्याचा मध्यमवर्गीय मचूळ रोमान्स करणं, डोहाळजेवणावेळी बाईला फुलांचे दागिने घालून फोटोसेशन उरकणं यापलीकडे आपली मजल जात नाही. नाही म्हणायला आजकाल बुके भेट देण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे; याहून निराळं कौतुक नाही.

आता आदिवासींच्या सणाउत्सवांवर देखील हळूहळू सावट येऊ लागलं आहे. रांचीसारख्या शहरांमध्ये ढोल – नगारे वाजवत शोभायात्रा काढून, गुलाल उधळून सरहुल साजरा होऊ लागलाय. आदिवासींच्या गोष्टींना तुच्छ लेखून ‘आमचे सणउत्सव तेवढे महत्त्वाचे’ म्हणणाऱ्या लोकांना अस्मितेपोटी दिलं जाणारं हे उत्तर असलं, तर सपाटीकरणाची सुरुवात रुजली आहे. धुमकुड़िया, पेलो एड़पा, सरहुल, सोहराई, फग्गू, करम, लग्नकार्य... सगळ्यांचं स्वरूप बदलतंय.

Blog 6

तरीही अजून काही काळ सरहुल मूळ स्वरुपात पाहायला, अनुभवायला मिळेल. लहान गावांमधून दुसऱ्या गावांना सरहुलसाठी आमंत्रणं जातात. माणसं आनंद आणि उत्साहाने एकत्र जमतात. तरुण-तरुणी एकमेकांना आजमावत नाचतात-गातात आणि आपापले जोडीदार शोधतात. तरुणींनी नाचात पुढं पाउल टाकलं की तरुण मागे सरतात आणि तरुणांनी पुढं पाउल टाकलं की तरुणी मागे सरत नाचतात. नाचताना तरुणी कधीच पाठ वळवत नाहीत, तरुण मात्र पाठ वळवूनही नाचतात. जोरकस आरोळ्या, कडाडून वाजणारा ढोल आणि सगळे आवाज थांबवून मध्येच चार ओळींचं कवितेसारखं एखादं नाजूक शब्दांचं गाणं... सवालजबाबच ते!

इसामई काला लगी सोना

दोसर समय किरोका माला रे

किर्रागा किरो वहीन मदूर मोखना समय किर्रो

रे मदूर मोखना समय किरों

ती म्हणते, माझं तारुण्य जर असंच एकटीने राहून सरून गेलं, तर पुन्हा परत येणार नाही!

तो म्हणतो, गेलं तारुण्य एकवेळ परत येईल देखील, पण प्रेमानं आघात करण्याची अशी फुलांच्या उत्सवासारखी वेळ पुन्हा येईल की नाही कोण जाणे!

घुमक्कडीमधील याआधीचे ब्लॉग :


घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई !


घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!


घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून…


घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं…


घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!


घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…


घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस


घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा


घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो


घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय


घुमक्कडी (25): साकाचं बेट


घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ


घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय


घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!


घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो


घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू


घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!


घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं


घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ


घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे


घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे


घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!


घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे


घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!


घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!


घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 


घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी


घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये


घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण


घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना


घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!


घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी


घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना


घुमक्कडी : (2) सीतेची तहान


घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई


 

                    

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV