घुमक्कडी (२४) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी (२४) : कार निकोबार आणि नारळ

भरपूर काम किंवा कामानिमित्त भरपूर प्रवास करणाऱ्या माणसांच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो की, सहल म्हणजे एखाद्या शांत ठिकाणी जाऊन आठवडाभर नुसतं निवांत आराम करणं बरं असं त्यांना वाटू लागतं. निव्वळ माणसांनी गजबजलेले समुद्र किनारे गाठून लाटा बघत बसण्यापेक्षा जंगलं, झाडं, वनराया, आंबराया, देवराया अधिक आवडू लागतात. हिरवा रंग डोळ्यांमधली आणि डोक्यातली जळजळ कमी करत नेतो, शांतवतो. अशा जंगलभागांमध्ये फिरताना किंवा अगदी जिथं नुसती वनं माजलेली आहेत अशा समुद्री बेटांवरही झाडांच्या अनेक लोककथा ऐकायला मिळतात. त्यातल्या काही ‘उत्पत्ती’शी निगडितही असतात. विश्वउत्पत्तीच्या कथा जसा अनेक आहेत, तशाच प्राणी, पक्षी, झाडं इत्यादींची निर्मिती कशी झाली याच्याही अनेक कथा आहेत. त्यातली एक कथा नारळाच्या झाडाची आहे, कार निकोबार या बेटावरची.

kavita mahajan blog

तर निकोबार बेटावर एकलामेरो भागात असंगीतो संग आणि एनालो हे दोन घनिष्ट मित्र राहत होते. असंगीतो संगला जन्मजातच काही जादुई शक्ती प्राप्त झालेल्या होत्या. मात्र त्यांचा तो गैरवापर कधीच करत नसे. एकदा बेटावर भयानक दुष्काळ पडला. भोवती समुद्र, पण त्यातलं पाणी खारं. प्यायचं गोडं कुठेही पाणी थेंबभर देखील उरलं नाही. पाणसाठे कोरडे पडले, जंगलं सुकून सरपण बनली. हिरव्या झाडांचे काळेकरडे बनलेले सापळे कडाडत कोसळून जमीनदोस्त होऊ लागले. माणूस वा जनावर कुणीही खाऊ शकेल असं एकही हिरवं पान दूरदूरपर्यंत दिसेना. ओल इतकी ओहोटली की जमिनीखालची कंदमुळंही आतल्या आत सुकून गेली. प्राणी-पक्षी-साप सगळ्यांचे सांगाडे वाटांवर सापडू लागले.

असंगतो संग घरातून दूर कुठेसा निर्मनुष्य जागी गेला आणि त्याने आपल्या जादुई शक्तीने थोडं पाणी मिळवलं. ते घेऊन तो एनोलोकडे आला. पाणी मिळाल्याने एनोलो खुश होईल असं त्याला वाटलं होतं; पण झालं उलटंच. असंगतो संगने जादूने आणलेलं पाणी पाहून एनोलो संतापला. आपल्या शक्तीचा प्रयोग कुवतीहून अधिक केला आणि तोही सगळ्यांसमोर केला, तर शक्ती नष्ट झाली असती, हे एनालोला सांगण्यासाठी तो भांडण थोपवत होता. पण असंगतो संगने आपल्या शक्तीचा उपयोग समाजासाठी केला असता तर सगळे जीव असे अन्नपाण्यावाचून तडफडून मेले नसते असं त्याला वाटत होतं. तो असंगतो संगशी त्याची बाजू ऐकून न घेताच  भांडत राहिला आणि अखेरीस संतापून त्याने असंगतो संगचं डोकं उडवलं. काही वेळाने भानावर आल्यावर त्याला आपली चूक ध्यानात आली. पश्चात्ताप झाला, पण व्यर्थ. अखेर तो असंगतो संगचं शीर घरी घेऊन आला.

असंगतो संगचं शीर त्यानं भिंतीवर लावून ठेवलं. ते शीर त्याच्याशी बोलत राहायचं. एनालो त्याला अडीअडचणी सांगायचा, सल्ला मागायचा, प्रश्न विचारायचा. असं वर्षानुवर्षे सुरू राहिलं. दुष्काळ सरून सुकाळ आला, तेव्हा एनोलोनं लग्न केलं. त्याला एक मुलगी झाली. एकदा ती खूप आजारी पडली. कुठल्याही उपचारांनी ती बरी होत नव्हती.

एनोलोला काळजीत पाहून असंगतो संगचं शीर म्हणालं, “तू मला अंगणात नेऊन मातीत पुरुन टाक. त्या जागी झाड येईल. त्याच्या फळात पाणी असेल ते तुझ्या मुलीला प्यायला दे. त्याने तिचा आजार नाहीसा होईल.”

एनोलोने मित्राचं शीर मातीत पुरलं. काही क्षणातच मातीतून अंकुर फुटला आणि बघता बघता त्यातून एक उंच झाड वाढलं. त्याला फळंही लगडली. त्यांचा आकार असंगतो संगच्या डोक्यासारखाच होता.  झाडावर चढणं सोपं नव्हतं आणि फळ फोडणंही सोपं नव्हतं, मैत्री - नाती सांभाळण्या - जोपासण्याच्या वाटा अशाच अवघड असतात, पण फळ हवं तर त्या जतन कराव्या लागतात हे एनोलोच्या ध्यानात आलं. टणक कवच सोलून काढताना त्याला सतत आपण मित्राचा शिरच्छेद केल्याची आठवण होत होती. डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. त्या फळातलं पाणी त्याने मुलीला प्यायला दिलं आणि मुलगी ठणठणीत बरी झाली. त्या झाडापासून पुढे अनेक झाडं निर्माण झाली. असंगतो संगच्या बलीदानातून मिळालेलं हे झाड आणि त्याचं फळ केवळ एकलामेरो भागालाच नव्हे तर अवघ्या निकोबार बेटाला जीवनदायी ठरलं. असंगतो संगने मित्राच्या इच्छेचा मान राखला. समुद्राच्या लाटांवरून वाहत नारळ पुढे जगभर पोहोचलं आणि त्यातलं जादुई पाणी माणसांना तृप्त करत राहिलं.

ही कथा केवळ नारळाच्या उत्पत्तीबद्दल बोलत नाही; ती त्याहून पुष्कळकाही सांगते.

2

मानवी मस्तकासारख्या आकारामुळे नारळाला इतर फळांहून वेगळं स्थान समाजात मिळालं. धार्मिक कर्मकांडात त्याला श्रीफळ म्हटलं जाऊ लागलं. सृजनाचं प्रतीक म्हणून ते नववधूच्या ओटीत घातलं जाऊ लागलं. शुभसूचक मानल्याने कलशात, तोरणात देखील आलं. नरबळी देण्याऐवजी नारळ फोडण्याचा पर्याय आला आणि अनेक दुबळ्या माणसांचे जीव क्रूर माणसांपासून वाचले. अनेक अर्थांनी तो कल्पवृक्ष ठरला. तो तोडला तर तोडणाऱ्याचा निर्वंश होतो, अशी समजूत पसरवण्यात आली; त्यामुळे माणसांच्या हव्यासाच्या झगड्यात तो बचावला. देवळाच्या कळसावरही विराजमान झाला आणि नारळी पौर्णिमेला समुद्रालाही वाहिला गेला.

या झाडाची फळं, फळांचा प्रत्येक भाग, पानं, खोड... सारंकाही माणसाने उपयुक्त ठरवलं आहे. पाणी व खोबरं अनेक विकार दूर करण्यासाठी, टाळण्यासाठी वापरलं जातंच; खेरीज त्याचं तेलही काढलं जातं... हे सर्वज्ञात आहे. आयुर्वेदात नारळाची तब्बल चौतीस नावं सापडतात आणि शंभराच्या आसपास औषधी उपयोगदेखील.

नारळाची आणि पोपटाची एक मजेशीर गोष्ट आहे.

1

नारळाचं उंचच उंच झाड, त्याला लगडलेली भरपूर आणि हिरवीगार मोठी फळं पाहून पोपटाला मोह झाला. कुणालाही न विचारता सांगता थव्यातून एकटाच निघून तो फळं खायला निघाला. याच झाडावर निवांत राहावं आणि एकट्यानं आयुष्यभर सगळी फळं खावीत; यापुढे अन्नासाठी इकडेतिकडे भटकण्याची गरजच नाही... या विचाराने तो स्वत:शी खुश होऊन गेला. बरेच दिवस तो परतला नाही, म्हणून बाकी पोपट त्याला शोधत निघाले; तेव्हा नारळाच्या झाडाखाली तो जखमी अवस्थेत पडलेला आढळला. काय झालं असेल हे एका वृद्ध पोपटाच्या ध्यानात आलं. नारळाच्या कठीण कवचावर चोच मारत राहिल्याने त्याची चोच वाकडी आणि रक्तबंबाळ बनली होती. फळ तर मिळालं नव्हतंच, उलट स्वार्थीपणामुळे चांगली अद्दल घडली होती. तेव्हापासून पोपटांच्या चोची वाकड्या आणि लाल बनल्या.

 

‘घुमक्कडी’ ब्लॉग मालिकेतील याआधीचे सर्व ब्लॉग :

घुमक्कडी 23. लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (२१) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (१९) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (१८) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (१७) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

 घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…  

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV