गांधी जयंती @ २०१७

हे भलतंच छान आहे आणि हो माझा जन्मदिवस "ड्राय डे" ही असतो म्हणे. धत् तेरे की मला काय माहित नाही का की तुम्ही आदल्या दिवशीच स्टॉक घरी आणून ठेवता ते. हे मी दरवर्षी बघतो. यावर्षीही बघितलं. मलाही हे सवयीचं झालंय.

By: | Last Updated: > Saturday, 7 October 2017 12:01 PM
Kavita Nanware’s blog on Mahatma Gandhi birth anniversary

अरे अरे आदिमानव बघितल्यासारखे का चेहरे केलेत. मी…मी..आहे. मोहनदास करमचंद गांधी. हल्ली मला कुणी कुणी चतुर बनिया देखील म्हणते आहे. तर या चतुर बनियाला तुमच्याशी दोन शब्द बोलायचे आहेत. एक विनंती ही करायची आहे.त्यासाठीच मी तुमच्या भेटीसाठी आलो आहे.

मी, दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे आणि गौरी सगळे सोबतच राहतो. त्या चौघांना मी दुसरेच एक कारण सांगून इथं आलोय. तुमच्याशी दोन शब्द बोलणार म्हटलो असतो तर त्यांनी मला येऊच दिले नसते. आणि तसंही सांगितलं असतं तरी म्हणाले असते जयंती होऊन चार पाच दिवस उलटून गेलेत. आता संवाद साधण्याचं प्रयोजन काय? तर असो.

२ आॕक्टोबर २०१७ रोजी माझा जन्म होऊन तब्बल १४८ वर्षे झाली. अजून दोन वर्षांनी इंग्रजांनी जेवढी वर्षे आपल्या भारतावर राज्य केलं तेवढी म्हणजे दीडशे वर्षे पूर्ण होतील. माझ्या शरीराचा मृत्यू झाला त्यालाही जवळजवळ ६९ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रत्येक शाळेत, सरकारी कार्यालयात, संसदेत सगळीकडे माझी जयंती तुम्ही साजरी केली म्हणजे भिंतीवरचा फोटो खाली काढून त्यावरची धूळ साफ केली. माझ्याकडे पाठ करुन माझ्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या कारकीर्दीवर आपल्या भाषणातून त्रोटक प्रकाशही टाकला. कुठे कुठे माझा गौरव करणारी गाणीही वाजवली. ते एक गाणं ऐकलं मी परवा “बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल” असंच काहीतरी होतं. गाण्यातला खड्ग हा शब्द ऐकून मला काही वाटले नाही पण संत शब्द ऐकून मात्र माझ्या अंगावर काटा आला. बापू म्हणा, गांधी म्हणा पण संत नका रे म्हणू बाळांनो. काही वर्षांनी तुमचेच नातू पणतू मला भोंदू, संतमहंतांच्या रांगेत बसवतील याची भीती वाटतेय मला.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी माझ्यासारख्या चतुर बनियाचा जन्मदिवस अहिंसा दिन म्हणूनही साजरा केला तुम्ही. बाळांनो का फसवता रे स्वतःला. या तुमच्या राज्यात “अहिंसा दीन” झालीय हे मी कशाला सांगायला हवंय. रोज होणारे अत्याचार, खून, मारामाऱ्या, शाब्दिक हिंसा दिसत नाहीत का तुम्हाला. अहिंसा दिनादिवशीही कुठे कुठे अहिंसात्मक अमानुष घटना घडल्या हे वाचलं असेल ३ आॕक्टोबरच्या वर्तमानपत्रात. अरे हो गौरी मला परवा सांगत होती २०३२ ला शेवटचं वर्तमानपत्र छापलं जाणार आहे म्हणे. छापील वर्तमानपत्रांमुळे थोडीफार काही विश्वासार्हता उरली आहे माध्यमात ती ही संपुष्टात येईल. चालायचंच.

चीनच्या भिंतीपेक्षाही लांब असलेली तुमची फेसबुक भिंत माझ्या जयंतीच्या शुभेच्छांनी गजबजून गेली. कुणी गुगलवरुन फोटो डाऊनलोड केले त्यावर काहीबाही चार शब्द म्हणजे “Happy Gandhi Jayanti” वगैरे  लिहिले, पोस्ट केले. चकचकीत कपड्यात माझ्या चरख्यासोबत काढलेले फोटो कुणी पोस्ट केले तर कुणी राजघाटावर माझ्या समाधीवर नतमस्तक झालेले फोटो टाकले. अनेकांनी फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या गोलात माझे फोटो डकवले आणि दुसऱ्या दिवशी न विसरता काढूनही टाकले. कुणी माझ्यावर कविता लिहिल्या तर कुणी मोठे मोठे लेख लिहिले. फोटोशॉपचा वापर करुन माझी प्रतिमा अधिकाधिक मलिन करण्याचाही कुणी कुणी प्रयत्न केला. कुणी मी किती महान होतो, गांधीविचार कसा महान होता याबद्दल आपली लेखनी झिजवली. तर काहींनी मी किती दुटप्पी होतो, महात्मा होण्यासाठीच मी माझी हाडे झिजवली, आंबेडकर आणि माझ्यात कसे आणि किती मतभेद होते, भगतसिंगची फाशी रद्द व्हावी म्हणून मी काहीच कसे प्रयत्न केले नाहीत याबद्दल त्वेषाने लिहिले. यावरुन मला वाटलं की माझ्यापेक्षा तुम्हा सर्वांनाच माझ्या आयुष्याबद्दल आणि एकूणच भारतीय स्वातंत्र्यलढ्याबद्दल अधिक माहिती आहे, असो. तुम्हाला अभ्यासासाठी वेगवेगळी शेकडो माध्यमं आहेत. तुमचा अभ्यास दांडगाच असणार याबाबत माझ्या मनात जराही किंतु नाही.

Swachh_Bharat_Abhiyan_logo

तुम्ही मागच्या दोन वर्षांपासून माझ्या नावानं स्वच्छ भारत अभियानही राबवता आहात. यावर्षीही सर्वांनी ही प्रथा इमानेइतबारे राबवली. जी जी स्वच्छ ठिकाणं आहेत तिथे आजूबाजूचा पालापाचोळा आणून टाकलात. स्वतःच्या उंचीपेक्षाही जास्त उंचीचे झाडू घेऊन तिथे उभे राहिलात. तुमचं लक्ष केवळ आपण फोटोत येतोय की नाही याकडे होतं. तुम्हाला मी दिसत नव्हतो पण मी तिथेच आसपास होतो. वेगवेगळ्या अभियानांसाठी, जाहिरातींसाठी तुम्ही माझा चष्मा पळवला असला तरी मला अजूनतरी अंधूकअंधूक दिसतच बाळांनो. तुमचे असत्याचे प्रयोग जाणून घ्यायला मला चष्म्याची गरज भासत नाही.

मला कामासाठी वेळ कमी पडायचा म्हणून मी रेल्वेप्रवासात मला आलेल्या पत्रांना उत्तरं द्यायचो. कामाला सुट्टी काय असते हे मला माहितीच नव्हतं. पण तुम्हाला माझ्या जयंतीची सुट्टी देतात. माझ्या जयंतीदिवशी तुमची कामातून सुटका होते. हे भलतंच छान आहे आणि हो माझा जन्मदिवस “ड्राय डे” ही असतो म्हणे. धत् तेरे की मला काय माहित नाही का की तुम्ही आदल्या दिवशीच स्टॉक घरी आणून ठेवता ते. हे मी दरवर्षी बघतो. यावर्षीही बघितलं. मलाही हे सवयीचं झालंय.

तुम्ही ते कॕशलेस का काय ते व्यवहार चालू केलेत ना. म्हणजे नोटांशिवाय व्यवहार करणे. बरोबर नं. ते एक बरंय. गांधी शरीराने संपवला,गां धी विचाराने संपत चाललाय आता नोटांवरुनपण गांधी संपत जाईल. माझी पुस्तकं वगैरे काही उरली असतील तर एखाद्या स्वच्छता अभियानात त्यांचीही काहीतरी विल्हेवाट लावा. तसंही तुमच्या असत्याच्या प्रयोगापुढे माझे सत्याचे प्रयोग किती काळ तग धरणार! आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्याचं कामच काय राहिलंय इथं. तुम्ही लोक सुजाण, सज्ञान आहात. कशाचा आणि कुणाचा वापर कुठे करायचा हे खूपच उत्तम जाणता तुम्ही. चरखा वापरला, चष्मा वापरुन वापरुन खराब झाला, फुटला तर म्हाताऱ्याची काठी आहेच. ती वापरा. पंचा, धोतर हे ही वापरा माझी अजिबात ना नाही.

किती किती चुळबुळ करता आहात रे बाळांनो मगापासून. खूप वेळ घेतला वाटतं मी तुमचा. आणि म्हाताऱ्या लोकांसाठी दोन मिनिटंही न देण्याच्या या टेकसॕव्ही जमाण्यात तुम्ही माझं बोलणं तब्बल पाच मिनिटं ऐकून घेतलंत हे खूप झालं. तुम्हाला बरीच कामं असतील, अनेकांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या असतील. बघता बघता नथुरामचीही जयंती येईल. तर शेवटी हात जोडून मी तुम्हाला एक विनंती करतो. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या नावानं आलिशान मंदिरं बांधा. सकाळ संध्याकाळ पूजा-अर्चा-प्रसाद ठेवा. नथुरामचं ही मंदिर बांधा. शाळा बांधा.अभ्यासक्रम तयार करा. अनेक नथुराम कसे तयार होतील यासाठी प्रयत्नशील राहा. गांधी मेला तरी चालेल. गांधीविचार मेला तरी चालेल. पण नथुराम जगला पाहिजे. नथुराम जगला पाहिजे.

 

कविता ननवरे यांचे आधीचे ब्लॉग

ओ नौ रंग मे रंगनेवाली…!

BLOG : मग तुम्ही खुशाल करा उत्सव साजरे.!

खोलेबाईंचे विचार किती खोल खोल खोल

BLOG : माझ्या मराठा बांधवांनो..!

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Kavita Nanware’s blog on Mahatma Gandhi birth anniversary
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: