खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस?

खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस?

संध्याकाळच्या वेळी तुम्ही रस्त्यावर फिरताय. जाता-जाता कानावर चर्र-चर्र असा आवाज येतो, तुमची नजर सहाजिकच तिकडे वळते. समोर डोस्याचा स्टॉल दिसतो, बाहेर लावलेल्या तव्यावर एक माणूस डोस्याचं घाऊक प्रमाणात प्रोडक्शन करत असतो. लोकं डोसे, उत्तप्पा खात उभे असतात.

स्टॉलवर चकाचक रंगीबेरंगी नेमप्लेट असते. डोक्याला टोपी, अंगात दुकानाच्या ब्रँडचा टी-शर्ट घातलेल्या माणसांची कामाची लगबग सुरु असते. ते दृश्य पाहून तुमची नजर क्षणभर तिथेच खिळून राहते.

कानावर पडलेला तो आवाज, डोळ्यांनी पाहिलेला नजारा आपल्याला मधल्या वेळेच्या भुकेची जाणीव करुन देतो. तुम्ही तिथेच थबकता आणि पटकन एका ‘अमूल मसाला डोस्याची’ ऑर्डर देऊन टाकता. आता 'अमूल'चाच डोसा का? आजच्या  मुन्नाभाईच्या भाषेत बोलायचं तर, जशी “बोलेतो रानी तो पप्पानी” असते, तसे मसाला डोसा किंवा पावभाजी फक्त ‘अमूलचेच’ असतात.

तुम्ही सेल्फ सर्व्हिस काऊंटरला पैसे देऊन टोकन घेऊन कारागीराकडे देत,“भैय्या अमूल जरा ज्यादा डालना, क्या? ” अशी ऑर्डर देता. तवा कारागीर तुमच्याकडे आज्ञाधारक नजरेने बघत, समोरच्या टेबलावरच्या अमूल लोण्याच्या मोठ्या पॅकमधून आपला सुरी कम चॉपर फिरवतो. हाताला येणारा एक मोठ्ठा पिवळा काप काढून तुमच्या डोस्यावर भिरकावतो. तुम्ही त्याच्याकडे कृतार्थ नजरेचा कटाक्ष टाकता, तो रिटर्न गिफ्ट म्हणून त्यातले अर्धे अमूल स्वतःच्या तोंडावर पसरल्यासारखं तुमच्याकडे कृतज्ञ नजरेनी बघतो. वातावरणात एकूणच आनंदीआनंद पसरतो.

काहीच मिनिटात प्लेटमध्ये बटर पेपरवर ठेवलेला ‘अमूल’ डोसा बाजूला भरपूर चटणी पसरून तुमच्यासमोर सादर केला जातो. पुण्यातल्या कुठल्याही प्रतिथयश हॉटेल्समध्ये गेल्यावर कमीतकमी 70-80 रुपयांपासून 120 रुपयांपर्यंत  मिळणारा अमूल मसाला डोसा तुम्हाला फक्त 30-40 रुपयात मिळालेला असतो. अर्धे पैसे आणि हॉटेलात बसून खाण्याचा वेळ वाचवल्याच्या आनंदात तुम्ही आपल्या कामाला लागता.

विचार केलाय कधी, हे ‘ज्यादा अमूल’ लावूनही त्या माणसाला तो डोसा हॉटेलच्या अर्ध्या किंमतीत कसा परवडतो? विचार करता का, किराणा मालाच्या दुकानातून /मॉलमधून आपण घरी आणलेल्या 100 ग्रॅम बटरच्या पॅकमधला एखादा चमचा अमूल बटरचा वासही घरभर पसरतो आणि इथे तुम्ही तव्यापासून फक्त 1-2 फुटावर उभे असूनही अमूल बटरचा टिपिकल वास डोस्याला खातानाही का येत नाही म्हणून?

मागच्या एका ब्लॉगमध्ये चायनीजच्या गाड्यांवरच्या चिकनच्या भेसळीबद्दल लिहिलं होतं. इथे फक्त ठिकाण बदललंय, म्हणजे चायनीजच्या गाड्यांऐवजी डोस्याच्या, पावभाजीच्या गाड्या आहेत. भेसळीचा फक्त प्रकार, स्वरूप बदललंय , पण त्याचा सिरीयसनेस तेवढाच आहे.

तर धक्कादायक वस्तुस्थिती अशी आहे, की पुण्यासह अनेक शहरात दोन प्रकारची ‘अमूल बटर’ मिळतात. एक आणंद, गुजरातला तयार झालेलं ‘ओरिजनल अमूल’ आणि दुसरं भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्य़ांकडून होलसेल मार्केटमध्ये विकलं जाणारं ‘लोकल अमूल’.

ह्याच्या मुळाशी असतं अर्थातच अर्थकारण. समजा अमूलच्या 1 किलोच्या होलसेल पॅकचा भाव 500 रुपये असेल तर ‘लोकल अमूल’चा भाव फक्त 150-200 रुपयांच्या आसपास असतो. एकावेळी 2-3 पॅक घेतले तर त्याच्याबरोबर दाखवायला ओरीजनल अमूलचं एखादं (अर्थातच जुनं, वापरलेलं) वेष्टन (कव्हर) फ्री मिळतं. कारण स्टॉलवाल्याला डोसा/पावभाजीत अमूल घालायचं नाही तर ते फक्त “दाखवायचं” असतं. एकदा अमूल बटरचे एक किलोचे कव्हर सगळ्यांना दिसेल असं ठेवलं आणि आम्ही सगळे पदार्थ फक्त अमूल बटर मधेच बनवतो असं लिहिलेला एखादा साईनबोर्ड दुकानात लावला, की तुमच्याआमच्या सारखे नावावर विश्वास टाकणारे लोक, अमूल डोस्याच्या नावाखाली वाट्टेल त्या बटरवर भाजलेला डोसा खायला आणि अमूलच्या कव्हरमधे घातलेला खोट्या बटरचा पॅक वापरून डोसे, पावभाजी बनवायला स्टॉलवाला तयार.

आता ह्या विषयात अगदीच अनभिज्ञ असतील त्यांना साध्या शब्दात सांगायचं झालं तर मुळात ज्याला ‘बटर’ म्हणलं जातं ते एक संपूर्ण ‘डेअरी प्रॉडक्ट’ असतं आणि हे ‘लोकल अमूल’ दुय्यम दर्जाच्या केमिकल प्रोसेसनी बनवलेलं असतं.

आता अजून थोडं खोलात जाऊन हे कसे बनवतात पाहिजे असेल तर, लोकल लेव्हलचे बटर हे स्वस्तातले तेल आणि यीस्ट बनवताना त्यातून निघणारे टाकाऊ (स्क्रॅप) पदार्थ डायसीटइल आणि अॅसीटोनसारखे खाण्याच्या दृष्टीने अतिशय घातक केमिकल पदार्थ वापरून बनवलं जातं. ज्यामुळे हे बटर (?) दिसायला पिवळ्या रंगाचं जरी दिसत असलं तरी खाल्ल्यावर श्वसनविकार आणि फुफ्फुसाच्या कर्करोगासारखे गंभीर आजारही होऊ शकतात. (ह्या विषयात जास्ती रस असलेल्यांनी diacetyl आणि acetoin हे शब्द गुगल करून ह्या पदार्थामुळे नेमकं काय होऊ शकतं ह्याची माहिती अवश्य घ्यावी) अनेक देशांत ही केमिकल्स खाद्यपदार्थात वापरायलाही बंदी आहे.

हे वापरून बनवलेल्या दोन बटरमधला दिसण्यातला फरक अगदी खऱ्या अमूल बटरचे जनक साक्षात डॉ.व्हर्गीस कुरियन जरी येशूगृहातून पृथ्वीतलावर परत आले, तरी त्यांनाही पटकन समजणार नाही.

हा ब्लॉग लिहिताना माझ्याकडे सकृतदर्शनी अशा लोकांविरुद्ध काही पुरावा नसला तरी ही माहिती अनेक वर्षे मार्केटमध्ये स्वतः फिरून, अनेक अनुभवी लोकांशी बोलून मिळवलेली आहे. तसेही ह्या गोष्टींचे पुरावे आपल्यासारख्या सामान्य लोकांना न मिळण्याची पुरेशी काळजी चतूर भेसळबाज लोक अर्थातच घेत असतात.

सगळेच डोसा, पावभाजी करणारे असेच बटर वापरतात किंवा सगळेच होलसेल व्यापारी हे ‘अमूल बटर’ विकतात हे मी चुकूनही म्हणणार नाही. कारण चांगला माल विकणाऱ्या आणि बनवणाऱ्या लोकांमुळेच हॉटेल इंडस्ट्री आजपर्यंत कायम टिकून राहिलेली आहे.

तरी स्वस्तात डोसे, पावभाजी विकणारे आणि भेसळप्रिय लोक गाडीवर/ स्टॉलवर (आणि अगदी काही हॉटेल व्यावासायिक देखील)‘लोकल अमूल बटर’ सर्रास वापरतात ते हे अनेक हॉटेल व्यावसायिकांना माहिती असलेलं उघड गुपित आहे.

आता प्रश्न फक्त येवढाच असतो, की आपण आपल्या कॉमन सेन्सला जागून आजूबाजूला घडणाऱ्या अशा गोष्टींवर कधी विचार करतो का? प्रश्न असा आहे, की एक फूड ब्लॉगर म्हणून फक्त आवडलेल्या पदार्थांची वर्णने करत बसण्यात, त्यावर लोकांची वहावा मिळवण्यातच तात्पुरतं समाधान मानत बसायचं? का फूड इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेला एक सजग माणूस म्हणून, अशा नफेखोर भेसळ करणाऱ्या लोकांमुळे सरसकट बदनाम होणाऱ्या चांगल्या हॉटेल व्यावसायिकांच्या भल्यासाठी हे प्रकार ब्लॉगच्या माध्यमातून लोकांपुढे आणायचे? ह्यातून मी तरी शेवटचा ऑप्शन निवडलाय.

तो वाचून काही लोक जागे झाले, काहींना भोवतालच्या वस्तुस्थितीची जाणीव झाली तरी ‘माझा’ ब्लॉगचा उद्देश सफल झाला म्हणायचं.

खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग :

खादाडखाऊ : जखमा उरातल्या


खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण


वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे


खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड


खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं


खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ


खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’


खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची


खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी


खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी


खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी


खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा


खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम


खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल


खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा


ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी


खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!


खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा

Blog शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV