खादाडखाऊ : पुण्यातला पहिला 'आमराई मिसळ महोत्सव'

खादाडखाऊ : पुण्यातला पहिला 'आमराई मिसळ महोत्सव'

बरेच वर्ष झाली, कुठेसं वाचून, मराठी माणूस स्वतःची खाद्यसंस्कृती जगात न्यायला उत्सुक नसतो. त्याचे उदाहरण देताना लेखकानी पंजाबी, गुजराथी, दाक्षिणात्य लोकांच्या स्वतःच्या प्रदेशातले खाद्यपदार्थ मागण्याच्या आग्रहामुळे, छोले-भटुरे, उंधियो पदार्थ, इडली-डोसा जगात हॉटेल्समध्ये कसे मिळतात त्याचं उदाहरण दिलं होतं.हे सर्व वाचून अंतर्मुख झालो होतो.

आपली मराठी लोकं जगभरात प्रवास करतात, प्रवासात जगभरातले खाद्यपदार्थ ‘टेस्ट’ करणे अगदी स्वाभाविक आणि रास्त आहे. पण ज्यावेळी आपण एखाद्या देशात स्थायिक होतो, त्यावेळी खऱ्या अर्थाने चौरस आहार असलेल्या आपल्या मराठी खाद्यसंस्कृतीची ओळख जगाला का करून देत नाही? तेव्हापासून इतर कोणी करून देत नसेल, तर आपणच किमान एक मराठी खाद्यपदार्थ का पोचवू नये? असा विचार डोक्यात घोळत होता. पण त्यावेळी सेमी ऑटोमेशन नंतर रोबोटिक्स विषयात प्रॉडक्ट आणि इव्हेंटचे काम करत असल्याने मराठी पदार्थाचा विषय बाजूला पडला होता.

Misal Mohotsav 2

पण काही वर्षांपूर्वी मी मुळचा इंजिनियरिंग प्रॉडक्ट तयार करण्याचा व्यवसाय सोडला. आधीच्या व्यवसायाच्या आणि उगाचच फिरण्याच्या निमित्त महाराष्ट्रात, भारतात भ्रमण केल्यामुळे आलेल्या गैरसोयीच्या अनुभवातून ग्राहकांना विश्वासार्ह पिकनिक रेंटल देण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यात काही प्रॉपर्टीजच्या व्यवस्थापनासाठी विचारणा झाली. टीम तयार होत होती, त्यांच्या सहकार्यावर त्या प्रॉपर्टी चालवायला घेतल्या. त्यात सुरुवातीला आम्ही पुण्याजवळ काही ठिकाणी लोकांच्या घरगुती राहण्याच्या सोयीबरोबरच त्यांच्या जेवण्याचीही व्यवस्था करायला सुरुवात केली. त्यात आमच्याकडे सिंहगड पायथ्याला असलेली आमराई आली. एक-दीड एकराची आणि शंभरेक आंब्याची झाडं असलेली ती प्रॉपर्टी हातात आल्यानंतर, किमान एका मराठी खाद्यपदार्थाला प्रसिद्धी देण्यासाठी मनात अनेक वर्ष मराठी खाद्य महोत्सव करायचा विचार पुन्हा बळावला. मिसळ या पदार्थाची आपल्याकडे असणारी लोकप्रियता वादातीतच आहे. कामाच्या निमित्ताने अनेक क्षेत्राशी संबंध आलेला असल्याने, रस्त्यावर दगड फोडणाऱ्या कष्टकरी जनतेपासून ते इंजिनियरिंगमध्ये सगळ्यात हायटेक काम समजल्या जाणाऱ्या अंतरीक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या मल्टीनॅशनल कंपनीच्या सीईओपर्यंतच्या लोकांची मिसळीची आवड मी अनुभवल्या आहेत. त्यामुळे नुसता खाद्यमहोत्सव करण्यापेक्षाही निवड केली ती मुळात अस्सल मराठी पदार्थ असलेल्या 'मिसळी'चीच.

आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात मिसळ वेगळ्या पद्धतीनी करतात. तांबडा रस्सा, काळा रस्सा, काहीजण बटाट्याच्या भाजीवर तो रस्सा वाढतात. तर काहीजण बटाटे पोह्यांवर. हे सगळं दाखवण्याच्या प्रयत्नांची सुरुवात म्हणजे हा मिसळ महोत्सव असं ठरवलं होतं.

आमराईत पुण्यातला पहिला आणि एंट्री फ्री असलेला तीन दिवसांचा मिसळ महोत्सव करण्याचं ठरलं. सुरुवातीला माझ्या या कल्पनेला अनेकांनी वेड्यात काढलं होतं. अनेक वर्ष इव्हेंट फिल्डपासून लांब असल्याने, त्यातूनही फूडमधला पहिलाच इव्हेंट करत असल्याने अनेक अडचणीही समोर उभ्या होत्या. टुरिझमचा व्यवसाय नव्यानेच सुरु केल्याने, पैसा ही त्यातली पहिली. मोजक्या दिवसात एकट्यालाच सगळी कामं करायची असल्याने, स्पॉन्सरर शोधायलाही वेळ नव्हता. आणि खाद्याजत्रेचा शॉपिंग फेस्टिव्हल करायचा नाही हेही पक्कं ठरवलं होतं.

सुदैवानं स्वतःचे नाव चांगलं आणि विश्वासार्ह असल्याने क्रेडीटवर काम करून द्यायला लोकं विनाहरकत तयार झाली. महोत्सवाची घोषणा केल्यापासून हातात वेळही कमी होता. सगळे काम करायला एकटाच असल्याने रग्गड कामे होती. तरी जाहिरात वगैरे करायला बजेट नावाचा प्रकार फारसा हातात नव्हता. त्यावेळी वेबसाईटचे काम माफक पैशात करून दिले, जवळचा मित्र चेतन केळकरने. वेबसाईट आणि सोशल मीडियावर थोड्याफार जाहिराती केल्या, पण खरी साथ दिली फेसबुकवरच्या शेकडो मित्रमंडळीनी. माहितीसाठी लिहिलेल्या साध्या पोस्टचेही फ्रेंडलिस्टमधल्या मित्रांनी फेसबुकवर हजारात शेअर केले. तरी एकीकडे इव्हेंटला प्रचंड प्रसिद्धी मिळत असताना मुख्य आकर्षण असलेल्या मिसळ ह्या विषयाकडे मला दुर्लक्ष करायचे नव्हते.

Misal Mohotsav

त्यातही फक्त सरसकट कुठल्याही मिसळी जमवायच्या नाही, हे पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं. त्यामुळे फक्त चांगल्या चवींच्या मिसळ देणारी निवडक मंडळी अपेक्षित होती. त्यामुळे पुण्यातल्या नामवंत लोकांबरोबरच इतर शहरातल्याही लोकांना गाठणे सुरु केले. नाशिकमधल्या मित्रांनी नाशिकचे काही रेफ्रन्स दिले, त्यातले काहीजण आमराईत आले.

पुणेरी, कोल्हापुरी, दम मिसळ, नाशिकची मिसळ अशा एकेक मिसळी आल्यावर  इव्हेंटला खरे स्वरूप यायला लागले. मग सुरु झाली, पुढची व्यवस्था आमराई असली तरी मिसळच्या स्टॉल्सकरता मंडप आणि बसण्याची चांगली व्यवस्था पाहिजे होती. अशावेळी पुन्हा जुनी मैत्रीच उपयोगी आली. ती व्यवस्था पुण्यातल्या ख्यातनाम काळे मांडववाले ह्यांच्या विकास आणि अमित या काळे बंधूंनी मैत्रीखात्यात अगदी हसत उचलली. रस्त्यावर बॅनर्स, कमानी लागल्या, वातावरण बनायला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ नव्या व्यवसायातल्या हितशत्रू लोकांकडून धमक्यांचेही फोन आले. पण सुदैवाने सर्व पद्धतीचे लोक हाताळायची सवय असल्याने, स्वतःचे काम कुठे थांबवायला लागले नाही.

Misal Mohotsav 4

सिंहगड पायथ्याच्या डोणजे गावातले जुने स्नेही गुलाबराव नानगुडे, अनेक वर्ष ग्रामपंचायत आणि झेडपीचे काम सांभाळणारे सरपंच पारगे ह्यांचे कुटुंबीय,आमच्या आमराईचे मालक राजू लोहकरे, शेजारचे हॉटेल व्यावसायिक नाना पायगुडे आणि अशा अनेक ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाच्या हद्दीत एखादी इव्हेंट करताना ज्या-ज्या अडचणी येऊ शकतात. त्यातल्या एक शतांशही अडचणी माझ्यापर्यंत पोचल्या नाहीत.

मिसळ महोत्सव सुरु झाला, पण पहिला आणि दुसरा दिवस अगदीच भाकड गेला. तरी जे लोकं आले ते सगळ्या व्यवस्थेवर खुश होऊन जात होते. त्याचा परिणाम शेवटच्या दिवशी सकाळपासून दिसायला सुरुवात झाली. लोकांच्या चर्चेमुळे अगदी टीव्ही मीडियाही उत्सुकतेने आमराईत पुण्याचा पहिला मिसळ महोत्सव कव्हर करायला पोहोचला.

Misal Mohotsav 3

रविवारी तर आम्ही सकाळी पोचायच्या आधीपासून सिंहगडावर नियमित येणाऱ्या मंडळींनी मिसळ खायला गर्दी केलेली होती. ती गर्दी अगदी संध्याकाळपर्यंत टिकून होती. पुण्यातली मित्रमंडळी तर तीन दिवसात अगदी दोन-दोनदाही (एंट्रीफी भरून) हजेरी लावून गेली. पण मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर एवढेच काय अगदी गोव्यावरुनही आमच्या दत्ता गवससारखे मित्र प्रेमाखातर उपस्थिती लावून गेले. त्याहीपेक्षा कडी केली ती शिंदे नावाच्या एका अस्सल खवैय्याने. (पहिले नाव विचारायचे विसरलो) खरंतर माझी त्याची ना ओळख ना पाळख. पण कुठूनतरी whatsapp वर आलेली माझी मिसळ महोत्सवाची पोस्ट वाचून, हा पठ्या थेट परभणीवरून रात्रभर एसटीने प्रवास करून सिंहगडाच्या पायथ्याला फक्त मिसळ खायला हजार झाला. मिसळ खाऊन मला आवर्जून भेटला, थोड्या गप्पा मारल्या आणि समाधानाने परत गेला. ज्यावेळी आपण एखादे काम हे फक्त पैशाकडे न बघून एखादा उद्देश म्हणून करत असतो. त्यावेळी अशा लोकांनी येऊन, समाधानानी परत जाताना बघणे याच्यापेक्षा मोठं सुख नसतं तुम्हाला सांगतो.

याच्या पुढचे व्हर्जन मला आमच्या दुसऱ्या मिसळ महोत्सवात दिसले, तेही असेच इंटरेस्टिंग आहे. पुढच्या भागात तुमच्याबरोबर शेअर करतो.

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!

खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग:


खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची


खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी


खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी


खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी


खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा


खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम


खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल


खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा


ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी


खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!


खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV