खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी

खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी

काही व्यक्ती आपल्या जवळपास कुठेतरी असतात, पण आपलं लक्ष त्यांच्याकडे उगीचच जात नाही. मी सध्या राहतो, त्याच भागात मंदार वसंत कदम रोज नाश्त्याच्या पदार्थांची गाडी लावतो. जातायेता अनेकवेळा त्याकडे लक्ष गेलं होतं, पण तिथे कधी थांबलो नव्हतो. परवा कामाच्या आणि अर्थात खाण्याच्या गप्पा सुरु असताना विख्यात फोटोग्राफर सतीश पाकणीकरांनी त्याचं नाव मला सांगितलं.

khadadkhau mandar pohe 2

मंदारच्या मावशींनी 1978 मध्ये सुरु केलेली गाडी आता मंदार आणि त्याचा भाऊ चालवतो. गेली दहा वर्ष रोज सकाळी फोडणीचे पोहे, दडपे पोहे, साबुदाणा खिचडी, शिरा, उपमा असे नाश्त्याचे टिपिकल मराठी पदार्थ घरुन आणून इथे विकतो. त्यांचा दुसरा स्टॉल नारायण पेठेत पत्र्या मारुती चौकातही आहे. मला आवडले मंदारकडचे दडपे पोहे आणि साबुदाणा खिचडी.

khadadkhau mandar pohe 3-compressed

तुम्ही म्हणत असाल पुण्यात नाश्त्याचे पदार्थ विकणाऱ्या शेकडो गाड्या असताना ह्या मंदारच्या गाडीबद्दल ब्लॉग लिहावा असं वेगळं काय? तर घरगुती पदार्थ उत्तम देणाऱ्या मंदारकडे आसपास राहणार्यांची गर्दी होतेच, पण एमआयटीमधल्या विद्यार्थ्यांचीही सकाळी गर्दी दिसेल. त्याच गर्दीच्या पलीकडे पाहिलंत, तर तुम्हाला कावळ्यांची झुंबड उडालेली दिसेल. हो बरोबर वाचताय, तेच आपले काव काव करणारे कावळे !! आणि हेच मंदारचं वेगळेपण आहे.

khadadkhau 1-compressed

गाडीच्या आजूबाजूला त्याच्या नेहमीच्या ग्राहकांबरोबरच अनेक कावळेही झाडावर, आसपासच्या भिंतीवर मंदारची वाट बघत रोज सकाळी बसलेले असतात. समोर आलेल्या ग्राहकांना नाश्ता देण्याच्या आधी तो कावळ्यांसाठी बरोबरच्या पिशवीतला शेवचिवडा ठेवतो. त्यातही काही कावळे असले इरसाल आहेत की तिकडे बघतही नाहीत. आधीच्या कावळ्यांचा शेवचिवडा खाऊन झाला की ते भिंतीवरून नाश्त्यासाठी खाली उतरतात, कारण त्यांना रोजच्या नाश्त्याला पोहेच पाहिजे असतात, मग मंदारने त्यांना खायला पोहे वाढायचे.

पोहे खायची त्यांची पद्धतही अजब आहे. काही कावळे सगळे पोहे संपवतात, तर काही चोखंदळ कावळे फोडणीच्या पोह्यांकडेही बघत नाहीत. त्यांना रोजच्या नाश्त्याला फक्त दडपे पोहेच वाढायला लागतात. अगदी आत्ता-आत्तापर्यंत एक म्हातारा पाय मोडलेला, चोच वाकडी झालेला कावळा रोज मंदारच्या हातावर बसूनच दडपे पोहे खायला यायचा. गाडीच्या बाजूला घास काढून ठेवला तर त्याला चालायचा नाही. मंदारने इतर कोणालाही डिश देण्याची सुरुवात करायच्या आधी त्या कावळ्याला भरवायला लागायचं. गेल्या काही आठवड्यापासून तो येणं बंद झालं.


या कावळ्यांच्या जोडीला झाडावर एक ‘खार’ही दबा धरुन बसलेली असते.कावळ्यांना वाढून झालं, की ती हळूच झाडावरुन उतरुन गाडीच्या बाजूला येऊन थांबते. तिच्यासाठी फक्त फोडणीचे पोहे! ती त्यातला कांदा बाजूला ढकलत फक्त पोहे खाऊन झाडावर परत जाणार(व्हिडियोत दिसतंय ते). तेवढ्यात कावळ्यांना खायला पोहे कमी पडले, तर त्यातला एखादा आगाऊ कावळा तिला हुसकावून लावत तिचा घास आपणच खाऊन टाकतो. घरात दोन बहिणभावांची आवडीच्या खाऊवरुन लटकी भांडणं व्हावीत ना? अगदी तस्सच एकंदर दृष्य असतं. मंदार एखाद्या कुटुंबप्रमुखासारखं हे सगळं समाधानाने बघत हसत खेळत येणाऱ्या ग्राहकांना एकीकडे पोहे, खिचडी देत असतो.

आजकाल पक्षीप्रेमाच्या नावाखाली पारव्यांच्या झुंडीला(अनेक जण चुकीच्या समजुतीने त्यांनाच कबुतर म्हणतात)अनेक दुकानदार धान्याचे दाणे खायला घालतात. हेच पारवे नंतर रस्त्यावरुन उडत वाहनांच्या मध्ये येतात. यांच्यामुळे पुण्यासारख्या कितीतरी शहरात अनेक अपघात घडण्याच्या घटना घडल्या आहेत. वरती हे पारवे साथीचे अनेक रोग पसरवत शहरभर फिरतात ते वेगळेच.

कावळ्याला ‘इकोसिस्टीम’मधला सगळ्यात चांगला सफाई कर्मचारी म्हटलं जातं. मंदारचे शिक्षण लौकिकार्थाने फार झालेले नाही. CSR, इकोसिस्टिम वगैरे नावंही त्याला माहिती नसतील. पण या कावळ्यांना खायला घालून नकळतपणे तो खूप चांगलं काम करतोय. हेच काम आपल्यातले कितीजण डोळसपणे करतील हे बघणे माझ्यासाठी तरी औत्सुक्याचं आहे.

मंदारच्या गाडीचा पत्ता

अशोक स्नॅक्स

बेडेकर गणपती मंदिराच्या अगदी शेजारी,

रामबाग कॉलनी, पौड रोड, पुणे

वेळ : सकाळी 7 ते 10-11

वर्षातून सुट्टी एकदाच-दिवाळीत 3 दिवस.

खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग:


खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी

खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी


खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा


खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम


खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल


खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा


ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी


खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!


खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV