खादाडखाऊ : वहुमनचा बाबाजी

खादाडखाऊ : वहुमनचा बाबाजी

मागच्या आठवड्यात पुण्यातल्या इराणी हॉटेल्सचा थोडक्यात पूर्वइतिहास आणि गुडलकच्या कासमशेठ आणि लकीच्या अंकलबद्दल आठवणींचा ब्लॉग लिहून हुश्श करतोय; तोपर्यंत,फेसबुक मेमरीमधून झुक्याबाबांनी गेल्या वर्षी 29 नोव्हेंबरची आठवण करून दिली. मागच्या वर्षी बरोब्बर त्याच दिवशी माझ्या पुण्यातल्या अजून एक लाडक्या इराणी हॉटेल ‘वहुमन कॅफे’चा मालक बाबाजी गेल्याची बातमी पोस्ट केल्याची आठवण करुन दिली.

वास्तविक, वहुमनला माझं वरच्यावर जाणं कधीच नव्हतं. पण फार न भेटताही या इराणी बाबाजीबरोबर अंतरीच्या तारा कुठेतरी जुळल्या होत्या. हा बाबाजी म्हणजे पुलंच्या रावसाहेबांचे अस्सल इराणी व्हर्जन!

वहुमनला 1997 ला मी पहिल्यांदा गेलो, आणि मग जमेल तेव्हा जातच राहिलो. पहिल्यांदा गेलो त्यावेळेची मजेशीर आठवण अजूनही आहे.

vahuman cafe(old)

रुबी हॉलमध्ये वडलांच्या हॉस्पिटलायझेशनमध्ये व्यग्र होतो. कामातून मोकळा झाल्यावर भुकेची जाणीव झाल्यावर रस्ता क्रॉस करुन ‘वहुमन कॅफे’ या वेगळ्या नावाच्या हॉटेलमध्ये शिरलो. (त्यावेळी ते जहाँगीर हॉस्पिटलच्या शेजारी होतं.) आत शिरताना अंडा ऑम्लेट बघितलं, त्याची ऑर्डर द्यायला वेटरला बोलावलं. तर त्याने चीज-ऑम्लेट आणू का? म्हणून विचारलं. म्हटलं “दे बुवा जे काय लगेच देता येईल ते.” आलोच म्हणला घेवून पाच मिनिटात. हे त्याने एवढ्या आत्मविश्वासाने सांगितलं ना! हाच फरक असतो चांगल्या आणि वाईट सर्व्हिस देणाऱ्या हॉटेलमधला. चांगल्या चालणाऱ्या हॉटेल्समधल्या वेटर्सनाही योग्य सर्व्हिसचे ट्रेनिंग दिलं जातं. त्यावेळी कारखान्यात प्रॉडक्शन बघत असल्याने लगेच घड्याळ लावायची सवय होती. तर पठ्ठ्याने मोजून चौथ्या मिनिटाला ‘ऑम्लेटबन’ आणून हजर केलं.

vahuman-bunomlet

प्रचंड भूक लागलेल्या पोटात पहिल्याच घासाला अंड आणि चीज ह्याचे भन्नाट मिश्रण असलेल्या ऑम्लेटची समिधा पडली. आणि पहिल्याच घासाला इराण्याला वाह: ची दाद गेली. डबल ऑम्लेट झाल्यावर इराणी चहा मागवला, तीच ती टिपिकल इराणी चहाची चव. दोन चहा हाणल्यावर पोटातली भूक आणि डोक्यातली चिंता दोन्ही काही वेळाकरता का होईना दूर झाली.

भरल्या पोटी काऊंटरला बिल द्यायला गेलो. कुठेही गेल्यावर खाल्लेली एखादी डिश खरंच आवडली तर ती तिथे आवर्जून सांगायची माझी एक सवय आहे. काय आहे! एखादा पदार्थ आवडला नाही, तर लोकं न विसरता सांगतात. पण आवडले म्हणून सांगितले, तर तिथे काम करणाऱ्या लोकांनाही जरा बरं वाटतं. त्या सवयीने बिल देताना चीज ऑम्लेट मस्त आहे, असं काऊंटरला सांगितलं. तर पलीकडचे बाबाजी मख्ख. त्यांनी माझ्याकडे पहिल्यांदा दयाळू नजरेने बघितले, मग हातवारे करत मला काही न समजेल असं पुटपुटले. पण त्यांच्या नजरेत “हे काय ब्वा, तुला आज शोध लागला?” असे भाव. त्यांचे ते भाव बघून वडील अॅडमिट झाल्यापासूनच्या पाच-सहा दिवसांनी पहिल्यांदाच माझ्या चेहऱ्यावर एकदम हसू फुटलं. ते बघून बाबाजी बहुतेक वैतागले. आणि “हा हस्तोय काय च्यायला?” अर्थाचे पारसी शब्द बोलले. ते ऐकून त्यावेळेच्या वयानुरुप मला अजूनच हसायला यायला लागलं. ते पाहून बाबाजी अजून वैतागले आणि शिव्या घालायला लागले. मी एकंदर रागरंग बघून तिकडून एकदाची कल्टी मारली. पण दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये येताना घरी नाश्ता न करता मी पुन्हा ‘वहुमन कॅफे’ मध्ये हजर. त्यात चीज ऑम्लेटबरोबरच त्या पारशी बाबाजींचा चेहेऱ्यावरचे हावभाव बघणे हा “पैसा वसूल”हेतू होताच. मला बघितल्यावर पारशी बाबाजींनी डोक्यावर हात मारून घेतला; आणि चार शेलक्या शब्दातच माझं स्वागत केलं. मला पुन्हा हसू फुटलं. त्याच्या येवढा छान ‘स्ट्रेस बस्टर’ त्या वाईट दिवसात दुसरा मिळाला नव्हता मला.

वडलांना डिस्चार्ज मिळाल्यावर रुटीन सुरु झालं. पण नंतर त्याबाजूला कधी गेलो तर ‘वहुमन कॅफे’ला आवर्जून भेट द्यायला लागलो. बाबाजी हमखास असायचेच. मग जरा गप्पा व्हायला लागल्या. बोलताना चांगली घसट कधी झाली ते समजलंच नाही.

vahuman-new

माझ्या थोड्याफार अनुभवावरुन सांगतो, पारसी-इराणी बाबाजींशी बोलायला सुरुवात करायला बॉम्बे (क्षणभर आपला मराठी अभिमान बाजूला ठेऊन) जुन्या दुर्मिळ वस्तू आणि क्रिकेटसारखे चांगले विषय नाहीत. त्यात बोलताना हा बाबाजी स्वतः मुंबईचाच आणि तरुणपणी उत्तम क्रिकेटर असल्याचं समजलं. नरी कॉन्ट्रॅक्टर, पॉली उम्रीगरसारखे मोठे खेळाडू त्याचे ‘बडी’होते. पुण्यात आल्यावर वहुमनला त्यांनी हजेरीही लावलेली आठवण सांगायचा बाबाजी. (बाबाजीवर केलेला एक व्हिडीओही आहे, त्यात त्यांनी अजूनही क्रिकेटर लोकांचा उल्लेख केला) मग एकदम मस्त गप्पा व्हायला लागल्या. बोलताना बाबाजींची हाताखालच्या कामगारांची चांगली वागणूकही समजायची. बोलताना एकदा ‘वहुमन’या इराणी शब्दाचा बाबाजींकडून समजलेला अर्थ “चांगले विचार!” मग तर हा इराणी ‘म्हातारा’ मग एकदम फेव्हरेट झाला.

मध्यंतरी काही काळ मात्र वहुमनला जाण्यात काही वर्षांचा उगाचच खंड पडला. मग गेल्याच वर्षी ‘वहुमन’ समोर शिफ्ट झाल्याचं समजलं. ऐकल्यावर चीज ऑम्लेट आणि बाबाजींची आठवण झाली. एका सुट्टीच्या दिवशी पहाटेच जाग आल्यावर, बायको-मुलाला “सरप्राईज ब्रेकफास्ट” द्यायचा ठरवून तडक वहुमनवरच मोर्चा नेला. रुबी हॉलच्या शेजारी आलेल्या नवीन जागेकडे पाहिल्यावर, पूर्वीच्या छोट्या, अंधाऱ्या जागेची आठवणही रहात नाही. गाडी लावून आत प्रवेश केला; तर स्वागताला पुन्हा बाबाजी समोर. एवढी वर्ष मधे गेल्याने ओळख सहाजिकच विसरलेले. त्यांनी आमच्याकडे एक थंड नजर फिरवली आणि वरच्या मजल्यावर बसायला सांगितलं.

चीज-ऑम्लेटची ऑर्डर दिली, तीच ती जुनी चव. अंडं फेटताना त्यात प्रमाणात घातलेलं लज्जतदार चीज, चीजची ओलसर चव लागूनही परफेक्ट शिजलेलं ऑम्लेट, क्या बात है! वरती मस्त नेस कॉफी प्यायली आणि मुलाला कडेवर घेऊन बिल द्यायला काऊंटरला आलो. बाबाजींना तो किस्सा आठवणं आणि त्यांनी मला ओळखणे अशक्यच होतं. त्यांना फक्त मी जुना कस्टमर आहे आणि चीज-आम्लेटची चव अजूनही तीच आहे सांगितलं. तशी म्हाताऱ्याच्या डोळ्यात चमक आली. एकदम खुश झाले. उठून उभे राहून माझ्याशी हात मिळवला.

vahuman-babaji

बिल चुकत करुन निघत असतानाच आमच्या चिरंजीवांना काऊंटरवर गोळ्यांच्या बरण्या दिसल्या. आणि बाबाजी माझ्याशी बोलतायत म्हणजे हॉटेल जणू आपल्या तिर्थरुपांचंच झाल्यासारखा ग्रह करुन घेऊन, त्याने माझ्या कडेवरुन थेट बरणीवरच हात मारला. मी आणि बायको एकाचवेळी मुलाच्या अंगावर वस्सकन ओरडलो. ते ऐकून नुकतेच काऊंटरपलीकडे खुर्चीवर बसलेले बाबाजी पुन्हा ताडकन उभे राहिले. आणि उलटे माझ्याच अंगावर खेकसले. माझ्याकडे रागाने बघत मुलाचा हात आपल्या हाताला धरुन बरणीत घातला आणि त्यात मावतील तेवढ्या गोळ्या त्याच्या हातात ठेवल्या. मी मुलाच्या वागण्याला लाजून गोळ्यांचे पैसे द्यायला पाकिटाला हात लावला, तर नव्या जोमाने काऊंटरबाहेर आले. आणि त्याच जुन्या टोनमध्ये ‘गधेडा’ शब्दांनी सुरु करुन अनेक पारसी-इराणी ‘सुविचारांनी’ माझा उद्धार करत पार हॉटेलच्या दरवाज्यापर्यंत आले आणि दरवाज्यातच माझ्या पाठीत एक धपाटा घातला. त्या प्रेमाने दिलेल्या शिव्यांच्या, त्यातल्या टोनमुळे आणि पाठीत प्रेमाने, हक्काने दिलेल्या धपाट्यामुळे पूर्वीसारखंच हसू फुटलं, आणि बाबाजींना मुलासोबत ‘बाय’ करुन गाडीला चावी मारली. त्यांनीही मग दरवाज्यात उभे राहून हसून बाय केला. मी, मुलगा, बायको तिघेही खुश होऊन घरी आलो.

अगदी काहीच महिन्यांनी बाबाजी गेल्याची बातमी समजली. पारसी लोकांच्यात पुण्यतिथी वगैरे कन्सेप्ट नसतीलही. पण माझ्यासारख्या अनेकांना हक्कानी शिव्या घालणाऱ्या पण गिऱ्हाईकाला समाधानानी निरोप देणाऱ्या वहुमनच्या त्या प्रेमळ पारसी ‘म्हाताऱ्याला’ तो जिथे असेल तिथे त्याचा ‘झरतृष्ट’ सुखी ठेवो! ही त्याच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्तानी प्रार्थना.

खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग

खादाडखाऊ : पुण्यातले इराणी

मित्रो !!! आज खिचडी पुराण

खादाडखाऊ : दिवाळीनंतरचे ‘ओरीजनल’ मराठी चटकदार पदार्थ

खादाडखाऊ : दिवाळीची खरेदी अन् पुण्यातील खवय्येगिरी!  


खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस?

खादाडखाऊ : जखमा उरातल्या

खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण

वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे

खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड

खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं

खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ

खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’

खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची

खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी

खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी

खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी

खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा

खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम

खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल

खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा

ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी

खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!

खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा

Blog शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: khadadkhau ambar karves blog on vohuman cafe
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV