खादाडखाऊ : जखमा उरातल्या

खादाडखाऊ : जखमा उरातल्या

आवडीच्या खाण्यासाठी वेळप्रसंगी कुठेही जायची तयारी असलेल्या आणि खाण्यावरती मनापासून प्रेम असलेल्यांना समर्पित!

समोर काहीही दिलं तर कितीही खातो तो अधाशी आणि आपल्याला आवडीचं हवं तेवढं भरपेट खातो तो खवय्या! अशी एक व्याख्या आज आपण मराठी भाषेला बहाल करतोय. रोज घरचे देतील ते निमूटपणे खाणे हे कितीही उदात्त वगैरे काम असलं, तरी आवडीचं खाण्यासाठी कुठेही भटकंती करण्याची सर त्या उदात्त कामाला नाही.

2001-02  सालापर्यंत पुण्यात कोल्हापुरी जेवण मिळायचं नाही. त्यावेळी घरी वाट्टेल ती फेकाफेकी करुन, अस्मादिक दोन वेळा मित्राला सोबत घेऊन, सकाळी कोल्हापूरला जाऊन तांबडा, पांढरा मनसोक्त पिऊन रात्री पुण्यात घरी परतही आलेत, तेही स्वतःच्या स्कूटरमधे स्वतः पेट्रोल भरुन. अर्थात महाराष्ट्रात आपल्यासारख्या ‘नतद्रष्ट’ खवय्ये लोकांची कमी नाही ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच आपण मराठी असण्याचा अभिमान बऱ्याचदा दुणावतो.

म्हणूनच मागे एकदा ओंकार ओक या आमच्या मित्राने त्याच्या लेखात, रत्नागिरीवरुन चिपळूणला दुचाकीवर फक्त मासे खायला आलेल्या एकाबद्दल लिहिलं, ते वाचून तो न पाहिलेला ‘महाभाग’ मला माझा “कुंभ के मेले बिछडा हूआ वगैरे भाई” वाटला होता. त्या खुशीत त्या दिवशी मी 2-3 सुरमई आणि रावसचे काटेही तोडले होते, शप्पथ!

ट्रेकच्या दिवसांत नाणेघाट आणि परिसर करताना पहिल्यांदा जुन्नरला गेलो होतो. शिवनेरी, चावंड, हडसर सर करून आम्ही एसटीत बसायचो. दरवेळी आमची एसटी फिरुन फिरुन भोपळे चौकात म्हणजे जुन्नरच्या एसटी स्टँडला लागायची. गडावरून दमूनभागून आणि लाल डब्ब्यात मागच्या सीटवर बसून आलेल्या विशीच्या उंबरठ्यावर असलेल्या चार निष्पाप जीवांच्या खिशात एसटीने घरी परतण्याचे पैसे सोडले, तर बहुदा नाण्यांचाच खूळखुळाटच शिल्लक असायचा. ती पुण्याईही दर जुन्नरवारीत कमी होत होती. काळ बिकट चाल्ला होता. तशा आर्थिक हलाखीच्या अवस्थेत ‘गाव तिथे’ बिरुद मिरवणाऱ्या एसटीच्या ‘कँटीन’चाच सहारा मिळायचा. त्यावेळी मिसळ आणि आपली नवी मोहब्बत एकदम नव्या जोषात होती. त्यामुळे कुठेही गेलं की माझी पहिली पसंती मिसळीलाच असायची. वरती सोबतच्या दोस्त लोकांच्या खोचक बोलण्याकडे लक्ष न देता, “लैला को देखो मजनू की नजर से” या न्यायाने मी पुन्हा मिसळच मागवायचो.

khadadkhau misal-compressed

अनेक गावात तो चॉईस चुकून भ्रमनिरास व्हायचा पण.. जुन्नरच्या ‘येष्टी कँटींग’मध्ये मिळालेल्या मिसळीनी माझं प्रेम अस्थानी नाही ह्याची पुन्हा जाणीव करुन दिली. स्टीलच्या अर्धवट खोलगट बशीत शेवपापडीवर पसरलेली मोडाची गावरान मटकी, मूग, तिखटाची चव अंमळ जास्त घालून बनवलेल्या रश्याच्या मिसळीचा तो सुगंध ह्या घडीलाही आठवतोय. दोन दिवसात तीन-चार वेळा खाल्लेल्या त्या मिसळीने मला साफ भुलवलं.

शहरात लहानपणापासून हॉटेलिंग म्हणजे थाळी, भेळ-पाणीपुरी, इडली, डोसा/छोले-भटुरा/पिझा आणि वरती मिल्क शेक माहिती असलेल्या मुलाने एखाद्या गावातल्या मिसळीवर फिदा होणे म्हणजे आयआयटी, आयआयएम गोल्ड मेडलीस्टनी बुद्रुक गावातल्या एखाद्या ‘शेवंती’ ला मनोमन आपली गृहलक्ष्मी मानावं त्यातला प्रकार होता. पण माझी आणि जुन्नरच्या मिसळीची वन सायडेड लव्ह स्टोरी मनातून बहरत होती.

दिवस पटापटा जात होते, 2-3 वर्षांनी हातात दुचाकी आल्यावर खिशात थोडीफार माया जमली की आम्ही टाकी फुल करून (गाडीची) मिळेल त्या सवंगड्याला घेऊन जुन्नरच्या दिशेने कूच करायचो, फक्त एसटी कँटींनमधल्या मिसळीकरता! पावासकट मिसळ प्लेट म्हणजे प्रत्येकी 10-12 रुपये. वर भांड्यात उकळी येऊन थकलेला “दीड रुप्पय चा ‘च्या” बशीत वतून फुकरून पीत”, जाताना वेटरला सॉरी फडकं मारणाऱ्या ‘पोऱ्याला’ घसघशीत पाचेक रुपयांची टीप देऊन, पुण्याहून खास मिसळ खायला आलेली स्वारी स्कूटरला किक मारून टेचात जुन्नरच्या बाहेर पडायची.

एकदा जुन्नरला पोचल्यावर ओळखीचा झालेला कँटींनवाला बदलला गेल्याचं समजताक्षणी पाचेक वर्ष एकतर्फी सुरु असलेल्या जुन्नरच्या मिसळीच्या मोहब्बतचा दि एंड झाला. क्षणभरच हाय रे दैवा!! छाप भाव चेहऱ्यावर दाटून आले असावेत. पण ह्या हाडाच्या खवय्यानी हार मानली नाही. ‘तू नही तो और सही’ नियमाने दुसऱ्याच मिनिटाला कानात कोंबडीचं सुरेल कूजन यायला लागलं. आताच्या जुन्नरमध्ये हॉटेल्सची कमी नसेल पण अगदी 98-99 सालापर्यंत जुन्नरसारख्या अगदी तालुक्याच्या गावीही नॉनव्हेज ढाबे-हॉटेल्सची भरमसाठ गर्दी नव्हती. शिकाऱ्याने बरेच दिवस हेरून ठेवलेल्या सावजासारखे आमचे लक्ष जुन्नरच्या एसटी स्टँडच्या समोरच्या ‘डिंपल’किंवा ‘मोना’ असे तत्सम नाव असलेल्या हॉटेलकडे गेलं. आत्तापर्यंत आमच्या मिसळीने आम्हाला इकडे फिरकू दिलं नव्हतं.

फिकट अंधाऱ्या हॉटेलात शिरून भिंतीवर लावलेल्या फळ्यावरचा मेन्यू उर्दू-फारसी पद्धतीने वाचल्यावर बरोबरच्या साथीदाराकडे बघून नकळत “ह्ये तर लैच स्वस्त हाय कि यड्या!” अर्थाच्या खुणा झाल्या.

मग काय तोपर्यंत फक्त इराणी हॉटेलात ‘लकी’ किंवा गुडलक मधे असलेल्या नॉनव्हेज मागवण्याच्या अनुभवावरुन जुन्नरमधल्या मराठमोळ्या हॉटेलातही “पेहेला पंखा लगाव और दो गावरान चिकन मसाला, भाकरी उस्स्केसाथ एक अंडा आम्लेट और कांदा, लिंबू लाव”,अशी ऑर्डर सोडली. त्यावर सदरा, लेंगा घातलेल्या पोऱ्यानी, “लैच शाणी दिसत्यात शहरातली पोरं”,असा तिखट लुक दिला. पण  त्यानंतर त्यानी जे लाजवाब झणझणीत चिकन आणून दिलं उसका जवाब नही! लक्षात राहिलेली चव.

पण पहेला प्यार तो आखिर पहेला प्यार होता है. मिसळ खायला न जाता, फक्त चिकन खायला येवढा खर्च करून जुन्नरला जाणं ही आयडिया परवडेबल वाटेनाशी झाली. जुन्नरवारी अचानक बंद झाली.

मिसळीच्या प्रेमभंगातून सावरुन अस्मादिक हळूहळू इतर ठिकाणी मिळणाऱ्या मिसळीवर खुशही व्हायला लागले. पण ते बरेच वर्ष इतरांच्या संसारात आपला आनंद मानण्यासारखं होतं.

जुन्नरच्या एसटी कँटींनमधली ‘ती’ मिसळ मात्र मनात कुठेतरी रुतून बसली. कुठलीही मिसळ खाताना मनात ‘तिची’ तुलना व्हायची. परवा ‘फक्कड’ ची मिसळची बॅच बनवल्यावर टेस्ट करताना, जुन्नरच्या मिसळीचा तो स्वाद पुन्हा दरवळला आणि क्षणभर शोभा गुर्टूंच्या आवाजात “उघड्या पुन्हा जहाल्या,जखमा उरातल्या”, ऐकल्याचा भास झाला. काही जखमा म्हणे पोटातूनही येतात उरात.. ही त्यातलीच एक, बाकी नंतर कधीतरी.

Blog शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV