खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा

By: | Last Updated: 23 May 2017 10:48 AM
खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा

 

पु.ल. आज असते तर 'सार्वजनिक पुणेरी मराठीत, खवय्याला जर पेठेतली काही आद्य ठिकाणे माहिती नसतील तर तो फाऊल मानतात' असं नक्की म्हणाले असते. प्रभा विश्रांतीगृह हे त्यापैकीच एक आद्य ठिकाण. माझे बालपण ते कॉलेजपर्यंतचा बराचसा काळ 'जगप्रसिद्ध पुणे 30' मध्ये गेला असल्याने; माझ्यावर या फाऊलची वेळ कधी आली नाही. केसरी वाड्यासमोरच्या 'प्रभा'शी ओळख तर फार लहानपणी झाली. 'प्रभा'ची मिसळ, वडा सॅम्पल परफेक्ट पुणेरी (म्हणजे तिखट नाही) पण प्रभाचा सुरुवातीचा इतिहास फक्त तिखटच नाही तर जळजळीतही आहे.

प्रभा

नवऱ्याबरोबर स्वतःचा संसार सावरायला, कै.सरस्वतीबाई परांजपे रत्नागिरीवरून पुण्यात आल्या. रत्नागिरीत डोक्यावर कापडाचे गठ्ठे घेऊन घरोघरी विकण्याचा अनुभव गाठीला होता. पुण्यात आल्यावर मोलमजुरीपासून सदाशिव पेठेत भाजीच्या व्यवसायापर्यंत अनेक अनुभव घेतल्यावर त्यांनी, त्याकाळी निकृष्ट दर्जाचा व्यवसाय समजला जाणारा हॉटेलचा व्यवसाय निश्चयाने सुरु केला. साल होतं साधारण 1940 आणि हातात भांडवल होतं केवळ 9 रुपये.

प्रभा४

एकट्या स्त्रीने सुरु केलेले हॉटेल, त्याकाळी अनेकांच्या टवाळीचा विषय झाला होता. रस्त्यावरून येता-जाता त्यांना शेरे मारणे, अपशब्द वापरणे हे सुरूच होते. अगदी हॉटेलात येऊन लाळघोटेपणा करणारेही कमी नव्हते. सुरुवातीला तर फारसा व्यवसायही होत नव्हता, पण सरस्वतीबाईंनी हिंमत हारली नाही. लोकांच्या वागण्या-बोलण्याला दाद दिली नाही. कष्ट सुरूच ठेवले, कसं सहन केलं असेल? पण जवळपास तीन वर्षांनंतर, सरस्वतीबाईंचं हॉटेल पुण्यात नावारूपाला यायला लागलं.

स्वतः तयार केलेला घरगुती चवीचा बटाटेवडा, कांदाबटाट्याचा रस्सा त्याच्याबरोबर पुऱ्या असे एकेक पदार्थ त्या बनवत गेल्या आणि ते पुणेकरांच्या पसंतीला उतरतच गेले. पुणेकरांच्या नाश्त्याचे हमखास ठिकाण तर ते झालंच, पण पुण्यातून खडकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत, कॅम्पात डिफेन्स अकाऊंट ऑफिसला जाणारे लोकंही सकाळी इथूनच खाऊन ऑफिसला जायला लागले.

प्रभा२

हाताखालच्या लोकांना सांभाळून वेळप्रसंगी करडे बोल सुनावत; त्यांच्यासाठी रोज घरी स्वयंपाक करून, मायेनी जेवायला वाढून, या बाईंनी आपला व्यवसाय उभा केला. आपल्याला मनापासून कौतुक वाटायला पाहिजे ते या उद्योजकतेचे. 1951 सालच्या मे महिन्याच्या 'स्त्री' मासिकात, लेखक द. बा. कुलकर्णी यांनी सरस्वतीबाईंवर लिहिलेला लेख तुम्हाला ‘प्रभा’मधे बघायला मिळेल.

त्याकाळी एखाद्या स्त्रीने आपल्या हिमतीवर सुरु केलेले दुसरे हॉटेल महाराष्ट्रात कुठे असेल तर ते जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. पुण्यात कै. सरस्वतीबाई परांजपे सुरु ह्यांनी सुरु केलेलं हे हॉटेल म्हणजे, स्त्रियांच्या व्यवसायात येण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात क्रांती घडवणारे मानलं जायला पाहिजे.

Prabha Hotel Owner

आजही सरस्वतीबाईंनी सेट करून दिलेली चव कायम ठेऊन, त्यांची तिसरी आणि चौथी पिढी म्हणजे उदय आणि केतन परांजपे हे पिता-पुत्र प्रभा विश्रांती गृह चालवत आहेत. आणि हळद न घातलेला वडा, मिसळ, सँपल-स्लाईस अशा ‘युनिक’ चवी करता, माझ्यासारखे पुणेकर प्रभाची वाट नित्यनियमाने तुडवतायत. फक्त ज्या बटाट्याच्या (उपासाची)कचोरीमुळे आम्हाला ‘उपास हीच एक पर्वणी’ वाटायची, ती मात्र त्यांनी दहाएक वर्षांपूर्वी बनवायची बंद केली. ती हळहळ आजही कायम आहे. यावरूनच कचोरीच्या चवीची महती समजेल.

पदार्थांच्या चवीत वर्षानुवर्षे बदल नाही, कच्चा मालाच्या दर्जात तडजोड नाही. खरेदीचा व्यवहार एकदम रोखठोक, हॉटेलही कायम स्वच्छ. या तडजोड न करण्याच्या वृत्तीमुळेच असेल, पण माणसाच्या बोलण्यातही (पुणेरी) रोखठोकपणा येतोच.

‘प्रभा’मध्ये तर बटाटेवडा जास्ती पुणेरी का दस्तूरखुद्द मालक? हे सांगणे मला अवघड आहे. त्यामुळे सेल्फ सर्व्हिस काऊंटरवरून बटाटेवडा घेताना,“याच्याबरोबर चटणी नसते का?”ह्यासारखे प्रश्न विचारायला गेलात, आणि त्यावर “आमची चटणी वड्यातच असते” असे काही उत्तर आले, तर आश्चर्य नको. तुम्ही स्वतः पुणेकर नसाल तर त्या बोलण्याचा अर्थ लावून, त्यावर टीका करण्यातच तुमचा बराच वेळ खर्च होईल. थोडक्यात पुण्याच्या भाषेत ‘डोक्याची मंडई’ होईल.

यापेक्षा अंगी लागेल असा दुसरा मार्ग म्हणजे, नारायण पेठेत केसरीवाड्यात लोकमान्यांच्या पुतळ्याला वंदन करून समोरच्याच ‘प्रभा’मध्ये प्रवेश करा. काहीही न बोलता काऊंटरवरचे दर बघून हवे ते पदार्थ घ्या. ऐसपैस बसून त्या पदार्थांचा शांत चित्तानी आस्वाद घ्या. त्यावर ‘मौसम का तकाजा’ म्हणून पन्हं किंवा सुरेख चवीचं कोकम रिचवून समाधानानी आपल्या कामाला लागा. बंदा भी खुश,मालिक भी खुश !

प्रभा३वेळ सकाळी ८.३० ते १२.०० ,संध्याकाळी ४.३० ते ७.०० वाजेपर्यंत

आता फक्त एक ते चार बंद का? वगेरे प्रश्न विचारु नका, उत्तर पुणेरीच मिळेल.

खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग


ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी


खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!


खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा


शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV