खादाडखाऊ : वाडेश्वर भुवन

खादाडखाऊ : वाडेश्वर भुवन

पुण्यातला ‘फुडी’ नवा का जुना हे ओळखायच्या माझ्या काही सोप्या ट्रिक आहेत. त्यातली एक म्हणजे, ‘वाडेश्वर’ म्हटल्यावर ज्यांना फर्ग्युसन रोडचं वाडेश्वर आठवतं, ते पुण्यात नवे. ज्यांना लॉ कॉलेज रस्त्यावरचं वाडेश्वर आठवतं ते नवखे आणि जर बाणेरचं वाडेश्वर आठवलं तर पुण्यातल्या भाषेत अगदीच पाळण्यातले. ह्याउलट जी व्यक्ती वाडेश्वर म्हणल्यावर, “म्हणजे वाडेश्वर भुवन”? विचारते; ती व्यक्ती पुण्यातल्या खाण्यात आणि पुण्याच्या पेठांत मुरलेली आहे असा अर्थ खुशाल घ्यायचा.

(पुण्याबाहेरच्यांनी शेवटच्या वाक्याचा अर्थ, “म्हणजे जरा सांभाळून राहा” असा घेतला तर त्या कुजकट अर्थाला प्रस्तुत लेखक जबाबदार नाही)

पण काहीही म्हणालात तरी, ‘वाडेश्वर’ नाव माहिती नसलेला माणूस पुण्यातला खवैय्या असू शकत नाही हे खरं.

वाडेश्वर ४

बाजीराव रस्त्याच्या टेलीफोन एक्स्चेंजकडून आल्यावर दोन छोटे चौक पार केल्यावर नातूबागेच्या चौकात थांबून डावीकडे बघायचं. गणपती मंदिराशेजारीच पुण्याच्या रिवाजाप्रमाणे हॉटेलबाहेरची टिपिकल गर्दी दिसली की समजा पोचलात वाडेश्वर भुवनला.फार मोठं नाही, जेमतेम 8-10 टेबलांचंच छोटेखानी हॉटेल. वेळ सकाळी 7.30 पासून 11.30 पर्यंत आणि संध्याकाळी 4.30 पासून रात्री 10 पर्यंत.

(दुपारी बंद असेल तरी ते सांगायची खऱ्या पुणेकरांना गरज लागत नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी)

माझी इथे यायची आवडती वेळ भल्या सकाळची. चारदोन गप्पिष्ट सवंगड्यांबरोबर आधी ठरवायचं आणि तडक वाडेश्वर गाठायचं.

समोर स्टीमरमधला इडलीचा घाणा अविश्रांतपणे सुरु असतो. त्याला पहिला मान म्हणून गेल्यागेल्या दोन-तीन प्लेट इडल्यांची ऑर्डर देऊन टाकायची. लोणी लावून उकडल्या आहेत असं वाटणाऱ्या वाफाळलेल्या मऊसुत इडली-चटणीच्या प्लेट समोर येतात. नवीन लोकांसाठी

विशेष सूचना-कुठल्याही हॉटेलमध्ये इडलीबरोबर मिळणारं सांबार इथे मात्र गैरहजर. इडलीसोबत इथे मिळते फक्त ओली चटणी.तीही तळकोकणात मिळते तशी, सढळ हातानी ओलं खोबरं वगैरे घातलेली.

वाडेश्वर-इडली

मित्रांबरोबर गप्पा मारत समोरच्या इडल्या कमी व्हायला लागल्या, की पुढची प्लेट उपम्याची मागवायची. रवा भाजताना आळस केलेला नाही, हे सांगायची गरज नसलेला माफक ओलसर उपमा.फोडणीत तळला गेलेला कढीपत्ता आणि मधूनच दाताखाली येऊन चव वाढवणारं पंढरपुरी डाळं, केवळ अफलातून.

वाडेश्वर २

डोसा फक्त उडपी लोकांनाच बनवता येतो, असा समज असणाऱ्यांनी इथला मसाला डोसा एकदातरी नक्कीच चाखावा. उपम्यानंतर मी सहसा कुरकुरीत मसाला डोसा आणायला सांगतो. मसाला डोस्याबरोबर तव्यावर शिजलेल्या कांदा-बटाट्याची ओलसर भाजी, तोंडाची चव अजूनच वाढवते.

(इथे साधा डोसाही मिळतो, पण अस्मादिक तो खात नाहीत) हे सगळं झाल्यावर पोटात भूक शिल्लक राहणं मुश्कील.त्यामुळे दुसऱ्या फेरीत डोस्याऐवजी थालीपीठ मागवावं. घरच्या स्वयंपाकघरात करुन पानात वाढलंय असं वाटावं, अशा थाटाचं भाजणीचं थालीपीठ समोर येईल. त्याच्याबरोबर घरगुती लोणी नसेल तरी बटरच्या क्यूबला लावून खात आपलं पोट कधी भरलं, ते समजतही नाही.

वाडेश्वर भुवन सुरु केलं, श्रीराम भावेंनी. युनिव्हर्सिटी आणि इतर संस्थांमध्ये कँटीन चालवल्यामुळे लोकांची चव त्यांना सापडली असणार. बाजीराव रस्त्याला वाडेश्वरची सुरुवात झाली 1978 साली, सकाळी इडली-चटणी विकण्यापासून. सोबतीला होते आधीच्या कँटीनच्या स्टाफमधले काही सहकारी.

वाडेश्वर नाईक आणि स्टाफ

त्यावेळी इडली विकणारी हॉटेल मुळातच कमी. होती ती फक्त मोजकी उडपी हॉटेल्स. त्यातून मराठी माणसानी इडली विकणं म्हणजे त्यावेळेच्या पुण्यात अप्रूप. तेव्हापासून वाडेश्वरमध्ये काम करणारे आणि आता वाडेश्वरच्या सगळ्या शाखांवर देखरेख करणारे, मॅनेजर अशोक नाईक आठवणी सांगतात, ''त्यावेळी आम्ही लोकांना “इडली-चटणी खायला आत या” असं रस्त्यावर उभे राहून सांगायचो. इडली-चटणी प्लेटची किंमत होती केवळ 40 पैसे. सुरुवातीची काही वर्ष कठीण गेली, पण नंतर मात्र पुणेकरांच्या पसंतीला ही इडली पूर्णपणे उतरली.

दिवस जात होते तसे वाडेश्वरमधे बदलही झाले. फक्त सकाळी सुरु असलेले वाडेश्वर सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा सुरु झालं. इडली-चटणी बरोबरच सकाळी उपमा, डोसा, थालीपीठ तर संध्याकाळी कांदा उतप्पा, टोमॅटो ऑम्लेट, दही वडा मिळायला लागला. नाटकाच्या रंगमंचावर दोन प्रवेशांच्या मध्येनेपथ्यात जसा फटाफट बदल होतो, तसा रात्री ८ नंतर इथे दिसायला लागतो. तीच माणसं वेगवेगळ्या डिशेस बनवायला लागतात. इडलीऐवजी आजूबाजूला टोमॅटो सूप, आलू पराठा, पुलाव, फ्राईड राईस दिसायला लागतात.

वाडेश्वर ५

नाईक ह्यांच्यासारखे जुने सहकारी, वाडेश्वर भुवनचे व्यवस्थापन खंबीरपणे पाहायला लागल्यावर,वाडेश्वरच्या शाखा एकेक करून फर्ग्युसन रस्ता, लॉ कॉलेज रस्त्यावर आणि बाणेरलाही सुरु झाल्यात.

पण बाजीराव रस्त्यावरच्या वाडेश्वरच्या इडली-चटणी, डोसा आणि उपम्याची चव माझ्यालेखी कायमच सर्वोत्कृष्ट राहील. शेवटी जुनं ते कायमच सोनं !

खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग:खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा


ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी

खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!

खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV