खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो...

खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो...

खान्देशातील जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील १६ नगर पालिकांच्या निवडणुकांसाठी दि. ११ नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली. त्यामुळे सर्वच ठिकाणी नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले. यावेळी नगराध्यक्षांची निवड शहरातील सर्वच मतदार करणार आहेत. त्यामुळे विधाससभेच्या ज्या मतदार संघात पालिका आहे तेथे नगराध्यक्ष निवडणूक ही विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी चाचणी ठरणार आहे.

नगर पालिकांच्या निवडणुकांची मोठी धामधूम जळगाव जिल्ह्यात आहे. तेथे १३ पालिकांची निवडणूक होत आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर आणि दोंडाईचा पालिकांची तर नंदुरबार जिल्ह्यात केवळ शहादा पालिकेची निवडणूक होत आहे. केंद्र व राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप आघाडीतील केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुका होत आहेत. यात दोंडाईचा हे रावल यांचे शहर असून तेथील गढीचे महाराजा म्हणून त्यांच्या घराण्याला आजही मानसन्मान आहे. जळगाव जिल्ह्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (भाजप) आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील (शिवसेना) यांच्या नेतृत्वात पालिकांच्या निवडणुका होत आहे. मंत्री महाजन यांचे शहर असलेल्या जामनेर पालिकेची निवडणूक सध्या नाही. मंत्री महाजन हे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या जळगाव मतदार संघातील निवडणुकीची जबाबदारी सांभाळून आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीचे बरेच निर्णय हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी घेतले आहेत. अर्ज माघारीपर्यंतची रणधुमाळी पाहता खान्देशातील तीन मंत्री भामरे, महाजन व पाटील, ४ खासदार हे सध्या तरी या निवडणुकांपासून अलिप्त दिसत आहेत. मात्र, सर्वच आमदारांना निवडणुकीत लक्ष घालावे लागत आहे. त्यांच्यासाठी तो अस्तित्वाचा प्रश्न आहे.

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार पाहता राज्य व केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपसह शिवसेनेतही अखेरपर्यंत युती होते की नाही यासाठी खो खो सुरू होता. तशीच परिस्थिती काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची झाली. आघाडी होते की नाही, यात नेत्यांचा खो खो चालला. माघारीच्या नंतरचे चित्र पाहता मावळत्या पालिकांच्या निवडणुकीत संख्या बळावर प्रबळ वाटणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था सर्वांत वाईट झाली आहे. या पक्षाच्या उमेदवारीसाठी नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदासाठी माणसेच मिळाली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा दुबळ्या वाटणाऱ्या काँग्रेसने झाकली मूठ ठेवून स्थानिक पातळ्यांवरील आघाडीत आपली माणसे घुसवून टाकली. भाजपला बऱ्यापैकी उमेदवार मिळाले. तरी सुद्धा राज्यातील सत्तेचा सुकाणू हाती असलेल्या पक्षासारखी स्थिती नाहीच. आश्चर्याची बाब ही की, शिवसेनेने मात्र सर्वाधिक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामागचे एक कारण असेही आहे की, जेव्हा भाजप-शिवसेनेच्या युतीची घोषणा मुंबईत पक्षाचे नेते करीत होते, तेव्हा जळगावात भाजपचे नेते स्वबळाची भाषा करीत होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांविषयी शिवसेनेत कमालीचा रोष आहेच. राज्यातील युती तोडायचे जाहीर श्रेय घेणाऱ्या नेत्यांच्या वक्तव्याचा विचार करुनच शिवसेनेने जिल्ह्यात आपले स्वतंत्र उमेदवार दिले. सध्या तरी निवडणूक रिंगणात शिवसेनेचे कार्यकर्ते जास्त आहेत.

जळगाव जिल्ह्यात पालिकांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी उमेदवारांची अवस्था आयाराम-गयाराम किंवा सभ्य भाषेत उमेदरावांची आयात-निर्यात अशी होती. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या अमळनेर शहरात भाजपने ओढून-ताणून स्वतंत्र पॅनल दिले आहे. पण त्याचवेळी भाजपचे जुने लोक पक्षाशी सवतासुभा करुन स्थानिक आघाडीसोबत रिंगणात आहेत. वाघ हे आपल्या शहरात पक्ष एक संघ ठेवू शकले नाहीत. त्यांनीही भूतकाळात इतरांच्यासाठी फोडाफोडीचे राजकारण केल्याचा इतिहास आहेच. १३ पैकी ८ ठिकाणी (भुसावळ, फैजपूर, सावदा, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, एरंडोल धरणगाव) येथे नगराध्यक्षपादाचे उमेदवार भाजपला देता आले आहेत. यातही आयात उमेदवारांमुळे काही ठिकाणी नाराजी आहे.

Khandesh-Khabarbat-512x395

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ. सतीश पाटील यांचे पारोळा शहर आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षासाठी आयात उमेदवारास पुरस्कृत केले आहे. राष्ट्रवादीला स्वतंत्रपणे पॅनल देता आले नाही. डॉ. पाटील यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत गेले आणि त्यांना भाजपने नगराध्यक्षपदाचा उमेदवार केले. धरणगाव पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी रिंगणात असलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे पूत्र विशाल देवकर यांनाही पक्षाने माघार घ्यायला लावली आहे. १३ पैकी ७ ठिकाणी (भुसावळ, यावल, फैजपूर, सावदा, पाचोरा, अरंडोल, धरणगाव) राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले आहेत.

काँग्रेसचे ग्रामीण भागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांचे शहर चोपडा आहे. तेथेही पालिकेची निवडणूक असून काँग्रेसचे स्वतंत्र पॅनेल रिंगणात नाही. काँग्रेसने स्थानिक मंचमध्ये सहभाग घेतला आहे. १३ पैकी अवघ्या ५ ठिकाणी (भुसावळ, यावल, फैजपूर, चाळीसगाव, एरंडोल) पक्षाला नगराध्यक्षपदाचे उमेदवार देता आले आहेत. काँग्रेसची अवस्था नेहमी प्रमाणे दारुणच आहे.

या निवडणुकीत शिवसेनेच्या दोघा जिल्हा प्रमुखांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. यात आमदार किशोर पाटील यांचे शहर पाचोऱ्यात पक्ष स्वबळावर आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनीही त्यांच्या क्षेत्रातील पालिकांसाठी बऱ्यापैकी उमेदवार दिले आहेत. १३ पैकी १२ ठिकाणी (रावेर वगळून सर्वच ठिकाणी) शिवसेनेने नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले आहेत.

या निवडणुकीचे वैशिष्ट्य असेही आहे की, रावेर येथे नगराध्यक्षपदासाठी कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवार रिंगणात नाहीत.

दोंडाईचा येथेही राष्ट्रवादी काँग्रेसला झटका बसला. माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख हे काँग्रेसवासी झाले. तेथे काँग्रेसतर्फे त्यांचे बंधू डॉ. रवींद्र देशमुख हे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. या ठिकाणी मंत्री रावल यांच्या नेतृत्वाची कसोटी आहे. त्यांच्या आई सौ. नयनकुवर या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून रिंगणात आहेत. राज्यात मंत्रीपद व नंदुरबारचे जिल्हा पालकमंत्रीपद मिळालेले असल्यामुळे शहरात कौटुंबिक व राजकिय प्रतिष्ठा जपण्यासाठी मंत्री रावल यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. देशमुख-रावल यांच्यातील पारंपरिक सामना पुन्हा रंगणार आहे.

शिरपूर शहरावर काँग्रेसचे आमदार अमरिश पटेल यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यांच्या पत्नी सौ. जयश्रीबेन या पक्षाकडून रिंगणात आहे. भाजपकडून श्रीमती अमृता महाजन यांच्या उमेदवारीने काही प्रमाणात विरोध होण्याची शक्यता आहे.

शहादा पालिकेच्या निवडणुकीत आयाराम-गयाराम स्थिती आहे. काँग्रेसचे जुने जाणते मोतिलाल पाटील हे भाजपवासी झाले. ते स्वतः भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्या समोर काँग्रेसकडून मकरंद पाटील आहेत. मकरंद पाटील हे दीपक पाटील यांचे बंधू असून त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आहे. माजी नगराध्यक्ष अशोक बागूल यांनी मुंबईहून लोकभारती पक्ष आणला आहे. मोतीलाल पाटील, बागूल व मकरंद पाटील हे पूर्वाश्रमीचे स्व. पी. के. अण्णा पाटील यांचे समर्थक आहेत.

एकंदरीत खान्देशातील १६ पालिकांच्या निवडणुका या विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी चाचणी असणार आहेत. राजकिय पक्षांनी ऐनवेळी पक्षात आलेल्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यामुळे पुढील काळातही असाच फॉर्म्यूला वापरला जाण्याची शक्यात बळावली आहे. पक्षावर निष्ठा ठेवून आमदारकीसाठी उमेदवारीचे स्वप्न पाहणारे त्यामुळे धास्तावले आहेत.

खान्देश खबरबातमधील याआधीचे ब्लॉग :


खान्देश खबरबात : गिरीश महाजनांचं मैत्रीपूर्ण 'सर्जिकल स्ट्राईक'


खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री


खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!


खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…


खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर


खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल


खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!


खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र


खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?


खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट


खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा


खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी


खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत


शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV