वेगळ्या वाटेवरील प्रवासी

वेगळ्या वाटेवरील प्रवासी

सकाळी गडबडीत स्वारगेट स्थानकात साताऱ्याला निघालेल्या ठाणे-कोल्हापूर बसमध्ये चढलो. इतक्यात कुठूनशा येणाऱ्या मोगऱ्याच्या वासाने मन प्रसन्न झालं. सुगंधाच्या दिशेने नजर गेली तर ड्रायव्हर काकांच्या समोर लटकवलेला गजरा दिसला. मनोमन त्यांना धन्यवाद देत कंडक्टर शेजारी असणाऱ्या जागेवर बसलो. आज रविवार आणि लग्नाची तिथी त्यामुळं एसटीला नेहमीपेक्षा जरा जास्त गर्दी दिसत होती. एरवी गावी जाताना स्थानकात निदान अर्धा तास तरी थांबाव लागतं. पण आज मात्र लगेचच बस मिळाली. सकाळची वेळ असल्यामुळे स्थानकात फिरणाऱ्या फेरीवाल्यांची गडबड, जवळच गरम गरम तेलात सोडलेल्या वड्यांचा वास यामुळे एक वेगळीच अनुभूती मनात निर्माण झाली. सीटवर बसल्या-बसल्या सहज लक्ष गेलं तेव्हा ही बस जरा वेगळीच जाणवली.


St Decoration 1-compressed


बसच्या प्रत्येक खिडकीवर महामंडळाची माहिती देणाऱ्या पट्ट्या दिसत होत्या. यामध्ये महाराष्ट्रातील बसची पहिली फेरी, महामंडळामध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या, कार्यशाळांची नावे आणि ठिकाण, राज्य परिवहन बसने प्रवासाचे फायदे, खाजगी प्रवासी वाहतुकीचे तोटे, बसच्या आतून-बाहेरून रंगी-बेरंगी प्रकाश टाकणाऱ्या लाईटच्या माळा तर बसला नववधूचे रुपडं देत होत्या. महामंडळाचा हा सृजनशील उपक्रम पाहून बर वाटलं. या कामाचं कौतुक करावं म्हणून शेजारी उभ्या असलेल्या कंडक्टर काकांना म्हटलं, काका महामंडळाचा हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे.


St Decoration 2-compressed


तिकिट काढण्यात व्यस्त असलेल्या काकांनी माझ्याकडे कटाक्ष टाकत म्हटलं महामंडळाच्या लोकांकडे कुठला आलाय एवढा वेळ. ठाण्याच्या एका पोरान केलंय हे सगळं. इतक्यात ड्रायव्हर काकांनी ब्रेक मारला तसे उभे असणारे प्रवासी एकमेकांच्या अंगावर आदळले. काकांनी दोन प्रवाशांना आत घेत बेल वाजवली. पुन्हा  एकदा गाडीने वेग घेतला. थोड्याच वेळात तिकिटांची गडबड संपवून काका देखील माझ्या जवळ येऊन बसले. मनात मघासपासून वाढलेली उत्कंठा मला स्वस्थ बसू देईना. काकांना माझी थोडक्यात ओळख करुन दिली. पत्रकार असल्याचे समजल्या नंतर काकांनी निःसंकोच बोलायला सुरुवात केली. गेली सहा वर्षे ठाण्यातील रोहित दादासाहेब धेंडे हा मुलगा या बसने प्रवास करतोय. गावोगावच्या रस्त्यांचा धुरळा उडवणाऱ्या लाल डब्याचे आपण ही काही तरी देणे लागतो यासाठी रोहितने या बसला सजवण्याचा विडा उचलला. सुरुवातीला ही बाब आम्हाला त्याने सांगितली तेव्हा त्याचं प्रचंड कौतुक वाटलं. पण वरिष्ठ पातळीवरुन परवानगी घ्यायला त्याला प्रचंड समस्यांचा सामना करावा लागला. त्यातील गंभीर बाब अशी की, एका बहाद्दराने तर मी परवानगी मिळवून दिली तर "त्या बदल्यात मला काय देणार" अशी भाषाच रोहितला बोलून दाखवली. पट्ठ्या पण लई जिद्दीचा. त्यानं पार परिवहन मंत्र्यांपर्यंत हे प्रकरण नेलं.


St Decoration 4-compressed


सरतेशेवटी त्याला परवानगी मिळाली ती पण एका जाचक अटीवर. रात्री बस ठाण्याला पोहचली की मध्यरात्री बारा ते पहाटे पाच यावेळेत तुम्हांला जे काही करायचे ते करा. पहाटे साडे पाचला बस पुन्हा कोल्हापूरसाठी निघते. रोहितने कोणतेही आडेवेढे न घेता आनंदाने अट मान्य केली. यानंतर पुढील पाच दिवस तो संध्याकाळी कॉलेज संपवून स्वारगेट स्थानकातून बसला बसायचं. रात्री गाडी डेपोत पोहोचली, की आपल्या चार मित्रांसोबत गाडीला सजवायचा. रात्री ठाणे डेपोला जाऊन गाडी सजवणं आणि सकाळी पुण्याला येऊन कॉलेज अटेंड करण यात मोठी कसरत त्याला करावी लागली. या संपूर्ण उठाठेवीसाठी गेल्या दोन वर्षांपासून पॉकेटमनीच्या माध्यमातून साठवलेले तब्बल बाविस हजार रुपये खर्च केले. त्याने संपूर्ण बसला आतून-बाहेरुन रंगरंगोटी केली, गाडी समोरील काचेवर एलईडीच्या माळा लावल्या, आतून राज्य परिवहन महामंडळाची माहिती देणाऱ्या पट्ट्या चिकटवण्यात आल्या. राज्यात पहिली बस केव्हा आली, ती कोणत्या मार्गावर किती किलोमीटर धावली. वडापने प्रवास करण्याचे तोटे, महामंडळाच्या प्रवाशांसाठीच्या वेगवेगळ्या सोयी सुविधा.


आश्चर्याची बाब अशी की, त्याला जेवढी मंडळाची माहिती आहे तेवढी डेपोतकाम करणाऱ्या मोठया साहेबाला पण नसेल. या पोराची एवढी धडपड एकापण साहेबाच्या लक्षात आली नाही हे आमचं दुर्दैव. याच्यासाठी जास्त नाही पण  वर्षातून निदान दोनदा महाराष्ट्रात फिरता येईल असा पास तरी द्यावा.


St Decoration 5-compressed


आज सकाळीच तो पुण्याला आला आहे. समोर दिसणारा गजरा देखील त्यानंच आणून लावलाय. महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि राज्याच्या सीमेवरील अनेक भागात अखंडपणे सेवा देणाऱ्या एसटीचा कारभार सर्व सामान्यांपर्यंत  पोहचवण्यासाठी त्याने तब्बल अडिचशेच्या आसपास डेपो पालथे घातलेत. ठाण्यातील खोपट मध्यवर्ती डेपो पासून ते गडचिरोलीमधील अहिरी या अतिशय दुगर्म भागापयर्तंच्या डेपोंना त्याने स्वःखर्चाने सहा वेळा भेटी दिल्या. माहिती गोळा केली. त्यातूनच पुढे महाराष्ट्राभर एसटी विश्वप्रदर्शनाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. बोलता बोलता काकांनी रोहितला फोन लावला. तेव्हा असे समजले की, रोहित त्याच्या जवळ उपलब्ध असलेल्या माहितीचा सर्व प्रवाशांना फायदा व्हावा या उद्देशाने एक मोबाईल अप्लिकेशन तयार करत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक डेपो मधील एसटीच वेळापत्रक, बसस्थानकांची माहिती जादा गाड्यांची तात्काळ माहिती मिळण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल. अशा या एसटी प्रेमीला त्याच्या अगळ्या-वेगळ्या कामासाठी खुप साऱ्या शुभेच्छा.


शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV