दिल्लीदूत : गालिब की हवेली

दिल्लीदूत : गालिब की हवेली

दिल्लीत आल्यावर जी गोष्ट आवर्जून पाहायचं ठरवलं होतं, तो संकल्प पूर्ण व्हायला जवळपास वर्ष लागलं. पण उशीरा का होईना अखेर योग जुळून आला. गालिब की हवेली असं विचारल्यावर चांदणी चौकातही अनेकांना पटकन सांगता येत नाही. आधी बल्लीमारान, मग गली कासीम जान कुठेय असं विचारावं लागतं. एकदा या टप्प्यात आलं की मग मात्र गालिब की हवेली विचारल्यावर समोरच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव उमटायचे थांबतात.

एकेकाळी जुन्या दिल्लीची शान असलेली ही हवेली एका कोपऱ्यात आपल्या जुन्या वैभवाचं संचित आठवत तग धरुन उभी आहे. इथपर्यंत पोहचण्याआधी जुन्या दिल्लीच्या कोलाहलातून जवळपास पाऊण तास काढावे लागतात. छोटं वाहन असेल तर थोडं सोयीस्कर. अरुंद बोळाचा रस्ता.. त्यातही आम्ही रविवारी आल्यानं जरा गर्दी कमी. एरव्ही इथं पाय ठेवायला जागा नसते. तरीही एक क्षण असा येतो जिथून तुम्हाला पायीच चालण्याशिवाय गत्यंतर नाही. बल्लीमारानच्या इथे आलं की एका कोपऱ्यावर गली कासीम जानचा बोर्ड दिसतो. या बोर्डच्या दिशेनं समोर चालत गेलं की दहा बारा पावलांवरच डावीकडे हवेली मिर्झा गालिब असा एक शिलालेख दिसतो. हवेली म्हटल्यावर जे भव्य, चकचकीत चित्र डोळ्यासमोर येतं, तसं आता काही उरलेलं नाहीय. फक्त दोन खोल्याच उरलेल्या आहेत. पण या खोलीत पाऊल ठेवल्यावर मात्र तुम्हाला अचानक मुघल काळात घेऊन जायची ताकद वातावरणात आहे. त्यात ज्या दिवशी आम्ही पोहचलो तो दिवस तर गालिब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा. या दिवशी दिल्लीच्या सांस्कृतिक वर्तुळातले काही मान्यवर, गालिबप्रेमी इथे आवर्जून जमतात. मशालीच्या उजेडात एक छोटा मार्च बल्लीमारानमधून निघतो. नंतर इथे हवेलीवर गालिबच्या पुतळ्यासमोर मेणबत्या लावल्या जातात..नंतर मुशायराही रंगतो.

Ghalib 1

दिल्ली शहराच्या इतिहासात शाहजहान, बहादुरशहा जफर ही नावं जितकी महत्वाची आहेत तितकचं महत्वाचं नाव आहे मिर्झा गालिब...दिल्ली म्हणजे गालिब आणि गालिब म्हणजे दिल्ली इतकं हे नातं घट्ट आहे... या शहराला गालिबनं एक ओळख दिली, पण दिल्लीनं गालिबला काय दिलं हा प्रश्न मात्र अस्वस्थ करणारा आहे.

गालिबचा काळ 1797 ते 1869 असा आहे. त्याचा जन्म आग्र्यातला. पण वयाच्या 13 व्या वर्षीच तो दिल्लीत आला. भारतात मुघलांची राजवट संपून जेव्हा देश ब्रिटीशांच्या हातात जात होता तेव्हाचा हा काळ. या सगळ्यात मोठ्या सत्तांतराचा साक्षीदार गालिब आहे. त्यामुळे त्याच्या लिखाणात या सामाजिक घटनांचाही प्रभाव आहे असं समीक्षक सांगतात.

Ghalib 6

नवी दिल्ली इंग्रजांची तर जुनी दिल्ली मुघलांची अशी या शहराची ढोबळ विभागणी करता येते. आज जिथं गालिब की हवेली आहे तो परिसर एकेकाळी मुघल सल्तनतीची शान होता. बल्लीमारानचे संदर्भ इतिहासात पाहिलं तर आणखी मजेशीर काही सापडतं. बल्लीमारान हे एकेकाळी श्रेष्ठ नाविकांचं निवासस्थान होतं. बल्ली मारणारे इथे राहतात, म्हणून बल्लीमारान. तर ज्या गलीत गालिबची हवेली आहे ती गली कासीम जान. कासीम जान हे नवाबाचं नाव असावं. कारण गालिब कमिटीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार गालिब यांच्या चुलत्याचा विवाह या कासीम जान चे भाऊ आरिफ जान यांच्या मुलीसोबत झालेला होता. नंतर गालिबचा विवाह ज्या उमराव बेगमशी झाला ती उमरावही याच कासीम जानची नातेवाईक होती.

Ghalib 3

या हवेलीत सध्या गालिब यांचा संगमरवरी चबुत-यावर उभारलेला पुतळा, काही जुनी पत्रं, एक जुना पोशाख आहे. मीर हाकिम शरीफ नावाचा इसम हा या हवेलीचा मूळ मालक होता. त्यानं गालिबला ही हवेली भाड्यानं राहायला दिलेली होती. असं म्हणतात की गालिब गेल्यानंतर या हवेलीत येऊन हा मूळ मालक या हवेलीत येऊन तास न तास खिन्न बसून राहायचा. गालिबच्या आठवणी या हवेलीतून पुसल्या जाऊ नयेत, त्यावर जळमटं बसू नयेत अशी त्याची धडपड होती. मात्र नंतर त्याच्या वारसांनी काही इतकं गालिब प्रेम दाखवलं नाही. नंतर नंतर तर मालकीचे अनेक दावे होऊ लागल्यानं प्रत्येकानं जमेल तितका या हवेलीवर कब्जा करत आपली दुकानं थाटली. आजही या हवेलीच्या वरच्या मजल्यावर एक हॉटेल चालतं. 97-98 च्या दरम्यान पुरातत्व विभागानं बेकायदेशीर बांधकामातून वाचलेल्या दोन खोल्या आपल्या ताब्यात घेतल्या. या दोन खोल्यातच हे जुनं वैभव टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं आल्यावर माणसाला एकदम 19 व्या शतकाचा फील यावा यासाठी मुघलकालीन विटा, चुन्याचा दगड, मोठाले लाकडी दरवाजे वापरुन या खोल्या सजवण्यात आल्यात. इथल्या भिंतींवर गालिबचे शेर कोरून ठेवले गेलेत. शिवाय एका बाजूला एक मोठं चित्र टांगलेलं आहे. ज्यात मिर्झा गालिब हे आरामात हुक्क्याची नळी आनंद ओढत आपली प्रतिभा साधना करतायत.

Ghalib 7

जयंतीच्या निमित्तानं यातल्याच एका खोलीत गादी तक्के टाकून मैफलीचं आयोजन करण्यात आलं होतं. अगदी पन्नास लोक बसतील इतकीच ही जागा पण अनेक उर्दूप्रेमींनी ही जागा भरुन गेलेली. मौलवी पोशाखातले काही खास दर्दी तर इथे होतेच, पण काही कॉलेजची तरुण मंडळीही दिसत होती. सगळ्यात विशेष म्हणजे बुरखा घालून आलेल्या दोन तीन महिलाही मान डोलावत मुशाय-याला मनापासून दाद देत होत्या. गालिबच्या जयंती, पुण्यतिथीला तरी किमान ही हवेली दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघते. कुठल्याही प्रकारची औपचारिकता या कार्यक्रमात नसते. ऊर्दूवर, शायरीवर प्रेम असणारा कुठलाही व्यक्ती इथे येऊन थेट मनमुराद आनंद लुटू शकतो.

मिर्झा गालिब हा शब्द जवळपास शायरीला समानार्थी मानला जाणारा शब्द आहे. इतकं या माणसाचं ऊर्दू साहित्यातलं मोठं योगदान आहे. अर्थात त्यांनी फारसी, ऊर्दू या दोन्ही भाषांमध्ये लिखाण केलंय. जवळपास 1100 ऊर्दू शेर गालिब यांनी लिहून ठेवलेत. फारसी भाषेत तर तब्बल 6600. त्यांच्या सगळ्या शायरीचं जे संकलन आहे त्याला दिवान असं म्हणतात. त्यांच्या समकालीन शायरांनी याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक साहित्य निर्माण केलं. पण तरी देखील केवळ दर्जाच्या जोरावर गालिब यांना जे श्रेष्ठत्व मिळालं ते इतरांना नाही मिळू शकलं. गालिबलाही आपल्या लेखणीवर प्रचंड आत्मविश्वास होता. कलाकारात एक जो बेफिकिरीचा भाव असतो तसा..त्यामुळेच त्यानं म्हटलंय...

पूछतें है वो के गालिब कौन हैं

कोई बतलाओ के हम बतलाएं क्या?

केवळ भारत, पाकिस्तानातच नव्हे तर अगदी दक्षिण भारतातल्या अनेक देशांतही गालिबच्या ऊर्दू शायरीचा प्रभाव आहे. त्यांच्यावर चित्रपट, टीव्ही मालिकाही निघाल्या. पण तरी या महान शायराचं उचित स्मारक करायला मात्र कुणाला वेळ नाहीय. ऊर्दू अकादमीचे प्रोफेसर अख्तर सांगत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. जो चित्रपट निघाला, त्यात सगळी संस्कृती ऊर्दू, कलाकारांची भाषा ऊर्दू, पण सेन्सॉरच्या प्रमाणपत्रावर चित्रपट हिंदी म्हणून शिक्का आहे. ऊर्दूबद्दल इतकी अनास्था असेल, तर गालिबला न्याय कसा मिळणार असं तावातावानं ते सांगत होते.

Ghalib 4

या हवेलीत सध्या जो पुतळा बसवलाय, त्याच्या खाली प्रेझेंटेड बाय गुलजार ही अक्षरंही लक्ष वेधून घेतात. कारण ज्येष्ठ कवी आणि गीतकार गुलजार यांचं या जागेशी, गालिबशी एक अनोखं नातं आहे. दरवर्षी नियमानं ते बल्लीमारानमधल्या या हवेलीला आवर्जून हजेरी लावतात. इथं आल्यावर आपल्याला काही अनोखं गवसतं, जे प्रतिभेसाठी इंधन म्हणून लागणारं असतं असं त्यांना वाटतं. या जागेबद्दल त्यांनी लिहिलेल्या या पंक्ती वाचल्यावरच त्यांच्या भावविश्वात बल्लीमारानचं स्थान काय आहे हे स्पष्ट होतं..

बल्लीमारान के मोहल्ले की वो पेचीदा दलीलों की सी गलियां
सामने टाल के नुक्कड़ पर बटेरों के कसीदे
गुड़गुड़ाती हुई पान की पीकों में वो दाद , वो वाह वाह
चंद दरवाज़ों पर लटके हुए बोशीदा से कुछ टाट के परदे 
एक बकरी के मिमयाने की आवाज़
और धुंधलाई हुई शाम के बेनूर अँधेरे ऐसे दीवारों से मुहँ जोड़ के चलते हैं यहाँ 
चूड़ीवालां के कटड़े की बड़ी बी जैसे अपनी बुझती हुई आँखों से दरवाज़े टटोले 
इसी बेनूर अँधेरी सी गली कासिम से एक तरतीब चरागों की शुरू होती है
एक कुराने सुखन का सफा खुलता है 
असदल्ला खां ग़ालिब का पता मिलता है |

गेल्या दोन वर्षापासून गालिब की हवेली ही २७ डिसेंबरला उजळून निघते. दिल्ली सरकारच्या टाऊन हॉलपासून मेणबत्ती घेऊन सुरु झालेला मार्च हवेलीपर्यंत पोहचतो. एरव्ही रोज जगण्याच्या धावपळीत सगळे व्यवहार यंत्रासारखे उरकरणारी नवी दिल्ली या जुन्या दिल्लीत आल्यावर काहीशी विसावते. तिला स्वत:तच एक जगण्याचं सत्व सापडल्यासारखं वाटतं. गालिबच्या हवेलीत जवळपास दोन तास मुशाय-याची मैफल रंगते. गालिबची गझल इथे येऊन गाण्यात अवर्णनीय आनंद मिळतो असं कलाकार नंतर सांगत होते.पण त्याचवेळी इथे गाताना एक दडपणही असतं. कारण ही जागा आमच्यासाठी धर्मस्थळासारखी पवित्र आहे. इथे परफॉर्म करताना एकही उच्चार, एकही तान चुकीची जाऊ नये हे स्वतःला बजावत असतो.

Ghalib 5

गालिब कमिटीचे लोक भक्तिभावानं इथे येतात. आपण जे करतोय ते काहीच नाही, या महान शायरासाठी अजून काहीतरी भव्य केले पाहिजे अशी त्यांची खंत असते. गालिबच्या हवेलीची ही अवस्था. तर आग्र्यात ज्या काला महलमध्ये गालिबचा जन्म झाला, त्या ठिकाणी आता मुलींचं एक कॉलेज सुरु आहे. शहरातल्याच अनेकांना याचा पत्ताही नसेल. दिल्ली शहराचा जो प्रसिद्ध निजामुद्दीन परिसर आहे. त्याच निजामुद्दीनमध्ये गालिबचा मकबरा आहे. पण त्याची अवस्थाही अशीच. दिल्लीचं इंग्रजांनी नव्या दिल्लीत रुपांतर करायच्या आधीच गालिब या दुनियेतून निघून गेला. आपल्या वाट्याला येणारं भावी एकाकीपण कदाचित त्याला आधीच जाणवायला लागले असावेत. कारण त्यानंच एका ठिकाणी लिहून ठेवलंय..

हाय, इतने यार मरे कि जो अब मैं मरुंगा

तो मेरा कोई रोनेवाला भी न होगा

इंग्रजांनी वसवलेल्या ल्यूटन्स दिल्लीत रस्त्यांना अनेक महान नेत्यांची नावं दिली गेलीयत. त्यात काही इंग्रजी साहित्यिकांची नावंही आहेत. पण ज्या गालिबनं दिल्लीवर एवढं प्रेम केलं, त्या गालिबच्या वाट्याला एकही रस्ता येऊ नये याची मनापासून खंत वाटते.

VIDEO : मिर्झा गालिब यांच्या जन्मदिनानिमित्त खास पेशकश : गालिब की हवेली



'दिल्लीदूत'मधील याआधीचे ब्लॉग :

दिल्लीदूत : शांतता, गोंधळ चालू आहे!

दिल्लीदूत : काही ( खरंच) बोलायाचे आहे...

दिल्लीदूत : दीदी बडी ड्रामा क्वीन है.. 

दिल्लीदूत : जेव्हा मनमोहन सिंह बोलतात…

राज्यसभेत पंतप्रधानांचा चरणस्पर्श कधी होणार?

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Ghalib गालिब
First Published:
LiveTV