रेड लाईट डायरीज : सेक्सवर्कर्सचे रॅकेट - 2

रेड लाईट डायरीज : सेक्सवर्कर्सचे रॅकेट - 2

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातून वेश्याव्यवसायात मुली आणणं त्या मानाने रिस्की असते. या मुलीना गळाला लावणेही कठीण असते. आर्थिक दृष्ट्या नाडलेल्या मुली शोधत फिरावे लागते. प्रामुख्याने बकाल वस्त्या, अक्राळ विक्राळ झोपडपट्ट्या, गलिच्छ वस्त्या यावर नजर ठेवली जाते. अशा ठिकाणच्या लोकवस्तीत आई वडीलांपैकी कुणी मरण पावलेले असल्यास त्या घरातली मुलगी सावज म्हणून हेरली जाते. नोकरी सुटलेले, कर्जबाजारी झालेले, व्यवसायात तोटा झालेले – दिवाळखोरीत गेलेले लोक घरचे मुख्य पुरुष असतील आणि घरात खाणारी तोंडे जास्त असतील, घरात सावत्र नाती असतील तर तिथली मुलगी लवकर निशाण्यावर येते. अशा मुलींच्या पालकांना, नातलगांना दलाल बरोबर गाठतात, त्यांना नेमकी पट्टी पाडतात. मग एखाद्या गर्दीच्या ठिकाणी ती मुलगी जाणीवपूर्वक हरवली जाते आणि दलालांच्या सेफ हातात ती अलगद पडते. मग दाम चुकते केले जातात. दलाल आपला भाव कुंटणखान्याच्या मालकिणीकडून वसूल करून घेतात. या मुली सुरुवातीला राज्य बदलून ठेवल्या जातात. म्हणजे दक्षिणेकडील राज्यातील मुली मध्य व पश्चिम भारतात तर उत्तरपूर्वेकडील मुली उत्तरेत पाठवल्या जातात, उत्तरेकडच्या मुली दक्षिण व मध्य पश्चिम भारतात पाठवल्या जातात. शक्यतो त्या मुलीची मातृभाषा असणाऱ्या राज्यात तिला ठेवलं जात नाही. पण एकदा का धंदा अंगवळणी पडला की त्यांना कुठल्याही राज्यात अदलाबदलीद्वारे किंवा पुन्हा एकदा विकलं जातं. कधी कधी पैसे वसूल करून देणाऱ्या मुली आपल्या मर्जीने हव्या त्या शहरात हव्या त्या गुत्त्यात जातात.

नातलगांच्या मार्फत धंद्यात आणल्या जाणारया या शहरी मुलींना आणखी वेगवेगळ्या पद्धतीने जाळ्यात ओढलं जातं. घरातून पळून आलेल्या मुलींना अलगद पकडून त्यांना वाममार्गी लावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काही प्रकरणात तर हे दलाल लोकं निम्न मध्यमवर्गीय वा कनिष्ट वर्गीय वस्तीतल्या व खालच्या स्तराचा शैक्षणिक दर्जा असणाऱ्या छोट्या आकारमानाच्या शाळांपर्यंत आपलं जाळं विणतात. अस्थिर चंचल स्वभावाच्या, मिरवून घेण्याची हौस असणाऱ्या, अभ्यासाचा कंटाळा असणाऱ्या, घरातल्या लोकांचं न ऐकणाऱ्या, बेफिकीरपणा अंगी भिनलेल्या मुलींची माहिती काढली जाते. शाळेतील शिपाई वा तत्सम चाकरमान्या माणूस ही माहिती देण्यासाठी पुरेसा असतो. अवघ्या काहीशे रुपयात हे काम होतं. या मुलींना मैत्रिणींसह पळून जाण्यासाठी फूस लावली जाते. चार ते दहा असा मुलींचा गट करून त्यांना बरोबर रगडलं जातं. आपल्याला फसवले गेलेय हे लक्षात आल्यावर यातल्या काही मुली अर्ध्यातून परत फिरून आपली सुटकाही करून घेतात पण हे प्रमाण कमी आहे. रेल्वेस्थानके, बसस्थानके, सार्वजनिक इस्पितळे, भाजी मंडया, बाजारपेठा अशा ठिकाणी रस्ते चुकलेल्या लहान मुलीदेखील या लोकांच्या हातून सुटत नाहीत. लहान मुलींची नथ उतरलेली नसल्याने अलीकडच्या काळात तरुण मुलींच्या इतकाच मोबदला त्यात दिला जातो. सार्वजनिक उत्सव, मिरवणुका, सणांचे सोहळे या कालावधीत ही देवाण घेवाण मोठ्या प्रमाणावर होते. अल्पशिक्षित मुली नव्या जागेत लगेच रडारवर येतात त्यांना नानाविध आमिषे दाखवून एकदा वज्रमुठीत चिणले की त्यांचे पुढचे सगळे रस्ते बंद होतात.

हे रॅकेट चालवणारे दलाल त्या त्या भागातील बोलीभाषा बोलण्यात प्रवीण असतात. दिसायला बरे व्यक्तीमत्व असणारे आणि समोरच्या मुलींच्या गरजा ओळखून त्या प्रमाणे फासे फेकण्यात ते पटाईत असतात. ग्रामीण मुलींची वाहतूक ज्या प्रमाणे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून केली जाते तसे या मुलींचे नसते. हे दलाल स्वतंत्र वाहन व्यवस्था करून ने आण करतात. मुलींना खाण्यातून गुंगी येणारे खाद्यपदार्थ देणं हा यांचा हुकमी फंडा असतो. क्वचित प्रसंगी त्यांना भीती दाखवली जाते. पण सावज पूर्ण कब्जात येईपर्यंत धाकधपडशा टाळला जातो. या रॅकेटमधला स्त्रियांचा सहभाग 'की-रोल'चे काम करतो. मुलींना विश्वासात घेण्याचे अवघड काम त्या लीलया पार पाडतात. घरचे उत्पन्न अगदीच नगण्य असणाऱ्या मुलींच्या बाबतीत आणखी एक चाल खेळली जाते. मुली धंद्यात आणल्यापासून काही दिवसात त्यांच्या पालकांना धंद्याच्या ठिकाणी बोलवून त्यांची गाठभेट घालून दिली जाते, यावेळी पैशाचे लालूच दाखवले जाते. मायबाप भेटल्यामुळे मुलगी सुखावते. ती मुलगी घरादारासाठी आयुष्यभर जळायला तयार होते. सख्खे-सावत्र आईवडील वा जे कोणी नातलग असतील ते आधी तिचे पाय धरतात. पण जसजशी ती मुलगी धंद्यात मुरत जाते तिला सगळ्यांचा उबग येऊ लागतो. ती पैसे पाठवत राहते पण रक्ताच्या नातलगांना आपली दारं कायमची बंद करते. या टप्प्यात आलेल्या मुलीचे मतपरिवर्तन करणं खूप कठीण जातं. या मुली धंदा सोडायला नकार देतात, नंतर त्या व्यसनाधीन होतात. स्वतःच्या आयुष्याचं वाटोळे करताना देहाची धूळधाण करून घेतात. या मुलींचा हा रीजीड दृष्टीकोन स्वतःवर आणि जगावर सूड उगवण्याच्या हेतूतून स्फुरलेला असतो.

शहरी वातावरणात वाढलेली मुलगी वयाच्या कोणत्या टप्प्यावर वेश्याव्यवसायात धंद्यात येते त्यावर तिचे भवितव्य ठरते. नव्वदच्या दशकानंतर बालवयातील मुली धंद्यात आणण्याचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढलेले आहे. कारण त्यांना जितका मोबदला द्यावा लागतो पण त्याच्या मानाने कमाईचा पैसा भरपूर मिळतो. बालपणी धंद्यात आलेल्या मुली बऱ्याच वर्षे धंदा करूनही टिकून राहतात त्यामुळे त्यांच्यापासून जास्ती फायदा होतो. शिवाय मोबाईलचा आणि पॉर्नचा अतिरेक वाढल्यापासून लहान मुलींसोबत सेक्स करण्याचे प्रमाण विस्मयकारकरित्या वाढत चालले आहे. एक काळ होता जेंव्हा प्रत्येक लहान मुलीला लोक आपली मुलगी समजत आणि प्रत्येक वयस्क स्त्रीमध्ये आपल्या आईस शोधत. आता तो काळ इतिहासजमा झाला आहे. आता सहा महिन्याच्या चिमूरडीपासून ते सत्तर वर्षाच्या आजीपर्यंतच्या स्त्रीवर लोकं बळजोरी करताना सर्रास आढळून येताहेत. हे वेगाने बदलत चाललेल्या विकृत मानसिकतेचे लक्षण आहे. त्याचे प्रतिबिंब या धंद्यात न पडते तर नवल ठरते. उमर ढळलेल्या स्त्रियांना जशी इथे किंमत नसते तशीच दलालांच्या बाजारात तिशीच्या पुढच्या महिलेची मुल्यावस्था असते. चाळीशी पार केलेल्या बायकांसाठी एकाच जागी राहिल्यास एकदोन गिऱ्हाईक तरी त्यांचे कायमचे पक्के आशिक होतात हा एकच सकारात्मक बिंदू ठरतो. पण असं कुणी नशिबी लाभलं नाही तर या बायका अक्षरशः दलालांच्या हातापाया पडून सातत्याने जागा बदलत राहतात आणि नवनवीन जागी नवनवे गिऱ्हाईक जाळ्यात येते का याचा वेध घेत राहतात.

या मुलींच्या पलीकडचा गट म्हणजे परदेशीय मुली. आपल्या देशात प्रामुख्याने बांगलादेशी आणि नेपाळी मुली धंद्यात आढळतात. दक्षिणेकडील राज्यात अलीकडच्या काळात श्रीलंकन मुली दिसू लागल्यात तर कधी कधी सीमावर्ती उत्तर पश्चिम भारतात पाकिस्तानी मुली दिसतात. या व्यतिरिक्त देशातील सर्व मेट्रो शहरात युरोपियन, आफ्रिकन, दक्षिण अमेरिकन देशांतील मुलींसह मोठ्या संख्येने बाल्टिक नेशन्समधील मुली आढळून येतात. कझाकिस्तान, आर्मेनिया, झेक, अझरबैजान इथल्या मुली यात प्रामुख्याने आढळतात. कृष्णवर्णीय म्हणून गणल्या गेलेल्या नायजेरिया आणि केनिया या देशातील महिला देखील आपल्याकडे या व्यवसाय करताना आढळून येतात. काही महिन्याच्या टुरीस्ट व्हिसावर येऊन केवळ आपल्या तुकतुकीत चामडयाच्या जीवावर त्या लाखो रुपये कमावून आपल्या देशाला रवाना होतात. तर काही मुली चक्क स्टुडंट व्हिसावर आलेल्या असतात. चित्रपटसृष्टीमध्ये कोरस ग्रुप डान्ससाठी लागणाऱ्या विदेशी डान्सगर्ल्सदेखील यात सापडल्या आहेत. यांच्या दलालांचे रॅकेट अंतरराष्ट्रीय असते. मोठ्या शहरातील पंचतारांकित हॉटेलात हा गोरखधंदा अगदी जोमात चालत असतो. हॉटेल मालक यात सामील असतात पण वरकरणी ते तसं दाखवत नाहीत. फिमेल एस्कॉर्ट वेबसाईट्स वा सोशल मीडियाच्या सिक्रेट कोडमेसेजेसद्वारे ‘दर्दी’ लोकांपर्यंत नव्याने दाखल होणाऱ्या मुलींची माहिती वेळोवेळी पुरवली जाते. विदेशी मुलींच्या धंद्यात कुंटणखाना हा प्रकार फक्त दिल्ली आणि कोलकत्यात चालतो. दिल्लीच्या जीबी रोडवरील कोठ्यात आणि कोलकात्याच्या सोनागाछीत यांचे वेगळे ठीय्ये आहेत. अन्य शहरात मात्र विदेशी महिलांचा धंदा पूर्णतः दलाल सांभाळत असतात. उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यात आजकाल पैसा पुरवण्याबरोबरच स्कीन करन्सी सप्लाय करण्याचा ट्रेंड खूप जोरात आहे. मोठ्या दिमतीचे राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटीज आणि मोकार पैशामुळे बिघडलेली मुले ही यांची गिऱ्हाईके असतात. व्यक्ती जितका उच्चपदस्थ तितका त्याला पुरवलेला ‘माल’ हाय लेव्हलचा असतो. यांचे पेमेंट दलालांना देशी चलनात केले जाते पण दलाल त्या मुलींना त्यांच्या देशातील चलन पुरवतात. यावरून लक्षात यावे की बेकायदेशीर विदेशी चलनाचे रॅकेट चालवणारे लोकही यात अप्रत्यक्षपणे सामील असतात.

शहरी मुलींना वा महिलांना या जाळ्यात ओढण्यासाठी अनेकदा प्रेम केल्याचे, लग्न करणार असल्याचे भासवले जाते. कधी कधी खोटे नाटे लग्नही लावले जाते. मुलीला काही दिवस इकडे तिकडे फिरवून आणून तिचा उपभोग घेऊन झाला की तिच्या नकळत तिचा सौदा केला जातो. मोबाईलवरून काढलेल्या क्लिप्सद्वारे ब्लॅकमेल करून त्यांना अनैतिक व्यवसाय करण्यास भाग पाडण्याचे प्रकार अलीकडच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात दिसुन आलेत. अश्लील क्लिप्सचा प्रकार घडला की मुली / महिला घरी सांगण्यास कचरतात याचा फायदा हे लोक उचलत असतात. यातून नैराश्य येऊन अनेकजणी आपला जीव देऊन बसतात पण हा मार्ग नव्हे. क्लिप्स काढून छळणाऱ्या लोकांची नावे मुलींनी आपल्या पालकांना विश्वासात घेऊन सांगितली तर पोलीस यंत्रणा त्यांना पकडू शकते आणि आणखी काही मुलींचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचू शकते. अशा घटनांत पोलीस यंत्रणेची ढिलाई संतापजनक असते हे ही नमूद करावेसे वाटते.

मूळ जागेवरून सावज गाठून आणणारे दलाल हे प्राथमिक दलाल असतात. हे क्वचित शेवटच्या स्पॉटपर्यंत जातात. यांच्याकडून मधल्या हस्तांतरण करणाऱ्या दलालाकडे मुली सोपवल्या जातात. बहुतांशी तोच त्यांना इच्छित स्थळी पोहोचवतो. कधी कधी तो त्यांना इच्छित शहरापर्यंत आणतो आणि कुठल्या बाईकडे कुणाला द्यायचे याची परफेक्ट टीप देणारे दलाल वेगळे असतात. हे तिसऱ्या टप्प्यातले दलाल असतात. जिथे धंदा चालतो थेट तिथेच यांचा वावर असतो. एखाद्याने बाई ठेवावी तसे यांना एखाद्या कुंटणखान्याच्या मालकिणीने ठेवलेले असते. कधी कधी त्यांचे नातेसंबंधही असतात. हे सगळे दलाल कायम सक्रिय असतात, वरवर ते स्लीपिंग मोडमध्ये वाटत असतात. यांच्या नजरेतून सावज सुटणे मुश्कील असते. कुंटणखाना चालवणारे लोक त्याकरिता सर्वात ताजा, टंच माल पुरवणाऱ्या दलालाला मोठा मोबदला देऊन संपर्कात राहतात. धंद्याच्या जागी येऊन काही महिने / वर्षे झाल्यावर तिची मागणी कमी होऊ लागते. अंगावरचे पैसे फिटलेले असले की या टप्प्यावरच्या बऱ्याच स्त्रिया धंदा सोडू इच्छितात. त्यातल्या काही जणी सोडतात देखील. तर काही जणी त्या लढाईत हरतात. मग अशा बायका नव्या ठिकाणी नेण्याचे किंवा त्यांच्या 'मालाला' नेमकी कुठे किंमत येईल याची टीप देण्याचे काम तिसऱ्या टप्प्यातले दलाल करत असतात.

या रॅकेटमधला अंतिम भाग असतो तो पाळलेल्या मवाल्यांचा. नवी मुलगी धंद्याला लावल्यावर ती सहजासहजी तयार होत नाही. पण साम, दाम, दंड भेद इथेही लागू होतो. काही जिद्दी मुली यालाही बधत नाहीत. तेंव्हा हे टगे मवाली गुंड कामी येतात. मुलींवर अनन्वित अत्याचार करून त्यांना धंदा करायला भाग पाडणे हे त्यांचे काम असते. विवस्त्रावस्थेत ठेवणे, उपासमार करणे, मारहाण करणे, चटके देणे, धुरी देणे, बांधून ठेवणे, एकाच वेळी अनेकांनी बळजोरी करणे असे प्रकार सर्रास चालतात. थकल्या भागल्या मुली शेवटी हार मानतात. दारूमटण आणि अवघ्या काही रुपयात हे काम करणारे मवाली प्रत्येक रेड लाईट एरियात सापडतात. तपास यंत्रणेस नव्या मुलीची टीप हवी मिळवायची असल्यास हे लोक फार कामी येतात. वेश्यांवर टाकलेल्या धाडीत दलाल पकडले जाण्याचे प्रमाण अत्यल्प असते पण हे मवाली पकडले जाण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते.

(क्रमशः) 

( या व्यवसायात काम करणाऱ्या स्त्रियांची शारीरिक, मानसिक, सामाजिक परिस्थिती सर्वसामान्य माणसांना उमजावी व हा उपेक्षित घटक नेमका का व कसे जगतो याची किमान त्रोटक माहिती लोकांना व्हावी हा या लेखमालेमागील हेतू आहे. समाजातील एक घटक एकीकडे यांचे शोषण करतो तर दुसरा मोठा घटक यांची उपेक्षा करत यांचा तिरस्कार करतो, घृणा करतो याला अल्पसा तरी आळा बसावा हे लेखनप्रयोजन आहे.)

समीर गायकवाड यांचे याआधीचे ब्लॉग :

'रॅकेट' रेडलाईट एरियाचे...  


नवरात्रीची साडी…

रेड लाईट डायरीज – शांतव्वा….

रेड लाईट डायरीज – ‘धाड’!

गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध)

गणेशोत्सवातल्या आम्ही… (पूर्वार्ध)

उतराई ऋणाची…

स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव…

गीता दत्त – शापित स्वरागिनी

Blog शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV