उतराई ऋणाची...

वर्षभर नव्हे तर आयुष्यभर आपल्यासाठी राबणारे बैल हेच आपले खरे पोशिंदे होत. पोळयाच्या दिवशी बैल हा जणू 'नवरदेव' असतो. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. बैलाने हा मानाचा घास खाल्ल्याशिवाय बळीराजा देखील जेवत नाही.

By: | Last Updated: > Tuesday, 22 August 2017 11:44 AM
sameer gaikwad blog on Bail Pola

यंदाचं पोळ्याचं आवतण बैलाना कालच दिलंय. खांदमळणीही कालच अगदी दमात झालीय. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर लावलीय आणि हळद तेल-तुपाने त्यांचे दमलेले खांदे मस्त पैकी मळून झालेत. सगळ्यांची शिंगे साळून झाली आहेत. त्याला आता केशरी लाल हुंगुळ लावला की शिंगे चमकदार दिसतील अन बैल उठून दिसतील. आंबाडीचे सूत काढून तयार केलेली नवी वेसण दुरडीत तयार आहे. नवा कोरा पांढरा शुभ्र कासरा लावून लाल लोकरीचे गोंडे, नविन घुंगर माळा, कवड्यांचे हार, नवीन रंगीबेरेंगी चित्रांच्या झुली दुपारी यांच्या अंगावर चढतील. पैंजण, पट्टे, झेंडूचे हार अशी सामग्री तयार आहे.

 

सर्वांगाला गेरूचे लाल पिवळे निळे हिरवे ठिपके देऊन झाले की मस्त पिवळ्या धमक रंगातले बैल आणि त्यावरचे ठिपके अगदी झकास दिसतात. हुंगुळ लावलेल्या शिंगांना चमकीच्या कागदाचे बेगड चिटकवायचे, डोक्याला बाशिंग बाधून माठोटे टांगले की शिंगे कशी उठून दिसतात! शिंगाळी असतील तर ती आज बदलून टाकायची नाही तर काढून टाकायची. त्यातल्याच एकाच्या पायात पूर्वी तोडे देखील असायचे आता नाहीत. त्याचे जागी कटदोरयाचे मऊ दोरे बांधतोत. पायली भर डाळ-गुळ शिजायला टाकला आहे. मस्त घमघमत्या वासाची पुरणपोळी आणि जोडीला गुळवणी!

 

bail pola 2

 

बैलाला ढूसण्या देणारी तारी आणि अंगावर उठणारा चाबूक आता दोन तीन दिवस तरी सुट्टीवर जाणार. वर्षभर नव्हे तर आयुष्यभर आपल्यासाठी राबणारे बैल हेच आपले खरे पोशिंदे होत. पोळयाच्या दिवशी बैल हा जणू ‘नवरदेव’ असतो. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. बैलाने हा मानाचा घास खाल्ल्याशिवाय बळीराजा देखील जेवत नाही.

 

bail pola 3

 

पूर्वी पाऊसपाणी ठीकठाक वकुबावर अन वक्तशीर असायचं, त्यामुळे पोळा कुठल्या का महिन्यात येईना शेत शिवार सगळं कस हिरवंगार असायचं. सगळ्यांकडंक बैलजोडी ही असायचीच, आता चित्र बदललयं. निम्मी अधिक शेतीची कामं यांत्रिक पद्धतीने होतात आणि चारा पाणी वेळेवर मिळत नाही वर त्याचे दामही वाढलेले त्यामुळे लोकं बैल एकमेकाचेच वापरतात. पावसाळ्यात रान चिखलानं गच्च भरलं अन ट्रॅक्टरची चाके रुतून बसू लागली की मग मात्र सगळ्या गावाला बैलांची आठवण जरा जास्त येऊ लागते.

 

bail pola 4-

 

‘पोळ’ म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा जुन्या काळात होती आता शेतकऱ्याकडेच बैल नाहीत तर गावावर बैल सोडणार कोठून? गावातल्या गायींना गाभण करण्यासाठी त्याला सोडीत. या बैलाला काही ठिकाणी पोळ म्हणतात तर काही ठिकाणी ‘पोळ्याचा वळू’ तर काही गावात या बैलालाच पोळा म्हणतात. या बैलाला गावावर सोडण्यापूर्वी त्याला धुऊन, रंगवून सजवीत आणि त्याच्यापुढे तशाच सजवलेल्या चार गाई आणून उभ्या करीत. मग त्याच्या कानात ‘तू वासरांचा पिता` अशा अर्थाचा मंत्र म्हणत. ‘हा तुमचा पती आहे.’ अशा अर्थाचा मंत्र गायींच्या कानात म्हणत. पोळा म्हणून सोडायच्या बैलाचे वषिंड मोठे, शेपटी मऊ व लांब केसांची, गाल कोवळे, पृष्ठभाग रूंद, डोळे पाणीदार, शिंगे टोकेदार, बांधा डौलदार, आणि मोठ्याने डिरक्या देणारा बैलच निवडला जायचा. असा बैल आढळला नाही तर त्यावर्षीचा पोळ सोडायचा.

 

संबंधित ब्लॉग 

 

स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव…

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:sameer gaikwad blog on Bail Pola
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: