रेड लाईट डायरीज - 'धाड'!

रेड लाईट डायरीज - 'धाड'!

1990 चं साल असावं. मे महिन्यातील कडक उन्हाळयाचे दिवस होते. त्या दिवशी जयश्री खूप खुश होती. तिची आई भौरम्मा तिला भेटायला आली होती. जयश्रीला पुण्यातल्या बुधवार पेठेत येऊन पाच वर्षे लोटल्यानंतर तिची आई आली होती. जयश्री गव्हाळ रंगाची, तुकतुकीत कांतीची, ठाशीव गोलाई अंगावर असणारी शंभरात उठून दिसणारी अशी होती. उभट चेहरा, अरुंद कपाळावरती रुळणारी कुरळ्या केसांची महिरप, मधोमध पाडलेल्या भांगात सिंधूर भरुन करकचून बांधलेला आंबाडा, अबोली मोगऱ्याची केसाला पडलेली मिठी, लालबुंद रंगाच्या टिकलीला शोभून दिसतील, अशा लाल खड्याच्या इअरिंग्ज, काळेभोर पाणीदार डोळे, तलम रसाळ ओठ, किंचित वर आलेले गाल आणि निमुळती हनुवटी अन सैलसर परकर पोलकं, असं त्या दिवशी तिचं जालीम रंगरुप होतं. एरव्हीदेखील साध्या राहणीतही ती उठून दिसायची. जयश्रीचं गाव आंध्रप्रदेशातील किनारपपट्टीलगतच्या गुंटूर जिल्ह्यातील दरवेशपालेम. याच्या नाजिकची माडा जंगलं प्रसिद्ध होती. तिचे वडील शेतमजूर होते. तिच्या कुमार वयात सर्पदंशामुळे मरण पावलेले. त्यांच्या मृत्यूनंतर भौरम्मा सैरभैर झालेली. काय करावं अन् काय नाही? तिला काहीच कळत नव्हते. पदरात दोन मुली टाकून नवरा अकाली निघून गेलेला. घर नाही, ना दार नाही. माहेरचे रस्ते गरिबीमुळे कधीच बंद झालेले. अन् सासरच्या लोकांनी पांढऱ्या पायाची म्हणून हाकलून दिलेले.

पोरींना उराशी कवटाळून ती थेट माडाच्या जंगलात निघून आलेली. तिथं जंगलात कसंबसं राहू लागली. तिथंच तिची ओळख मक्कुरशी झालेली. पस्तीशी पार करुन गेलेला मक्कुर भौरम्माच्याच येरुकुला जातीचा होता. आपल्याकडील बुरुड आणि लमाण यांच्याशी यांचं पुष्कळ साम्य. त्या जंगलातच त्याचं झोपडीवजा घर होतं. तिथं तो एकटाच राहायचा. विक्षिप्त स्वभावाचा, व्यसनांचा आधीन असलेला मक्कुर त्याच्या जातबिरादरीशी लागून होता. पण जंगलाच्या नावाखाली अलिप्त राहत होता. जंगलातल्या चीजवस्तू बाहेर विकून पैसा कमावून त्यावर तो आपली व्यसनं भागवायचा. या दोघांच्या शरीराच्या अन् पोटाच्या गरजा एकसारख्या निघाल्याने ते दोघं एकत्र राहू लागले. त्यांनी जंगलातच गंधर्वविवाह केला. एकमेकाला हार घातला, ना मंत्र, ना साक्षीदार ! तेंव्हा भौरम्मा पंचवीसेक वर्षाची अन् जयश्री आठ वर्षांची. तर लहानगी सुज्जी तीन वर्षाची असावी.

जवळपास चारेक वर्षे त्यांची बरी गेली. यामुळे तिला आसरा मिळाला, त्याचा आधार झाला. अन् तिच्या रुपाने त्याच्या ताटाची, खाटेची सोय झाली. यात अडचण आली ती जयश्रीच्या शहाण्या होण्याने. तिच्या लवकर वयात येण्याची कारणेही तशीच होती. हा पूर्ण भाग समुद्र किनारपट्टीलगत असल्याने, दमट हवामान अन् उष्म शरीर धाटणीची माणसं असल्याने मुली लवकर वयात येत. त्यामुळे उफाडया अंगाची जयश्री बाराव्या वर्षी वयात आलेली. रिवाज म्हणून भौरम्मा तिला माहेरी घेऊन गेली, तिचे सासरचे लोकही तिथे आलेले. मोठा कार्यक्रम करुन तिला त्यांना गोडधोड द्यावं लागलं. चार-पाच वर्षात काटक्या कुटक्यांचं जळण विकून आलेल्या दिडक्या अशा रीतीने अकस्मात खर्च झाल्या. तिचे दीर हरामी होते, त्यांनी आपल्या भावाच्या पोरी आपल्याकडे असाव्यात म्हणून तिथं तगादा लावला. त्यांच्या मनातलं काळंबेरं ती ओळखून होती. तिने काही दिवस पोरी आपल्यापाशी ठेवून झाल्यावर पक्क्या न्हात्याधुत्या झाल्यावर आणून सोडते, असं सांगून त्यांचा पिच्छा सोडवून घेतला.

एक आठवडा तिकडं घालवून ती जंगलातल्या झोपडीत परत आली. ती परतताच तिची पोरं मोठी झाल्याची बातमी झाडांच्या पानांतनं वारं वाहत जावं, तशी फॉरेस्ट खात्यातल्या लोकांपुढे गोंडा घोळणाऱ्या सॉ मिलवाल्या लाकुडतोड्या लोकांच्या टोळीच्या कानी पोहोचली. या संपूर्ण जंगलातल्या लाकडांवर त्यांची नजर होती. त्यांनी अनेकदा भौरम्मा आणि मक्कुरला जंगलात पाहिलं होतं. त्यांना ते नवरा-बायको वाटायचे. भौरम्मावर कुणाची नजर खिळून राहावी, असं काही तिच्या अंगी खास नव्हतं. अन् तिचं अंग म्हणजे जणू हाडाचा सापळाच. जोडीला तिचा चेहरा सदा भेसूर उदासवाणा असे. अंगावरच्या कपडयांची विटून लक्तरे झालेली असत. त्यामुळे तिच्या वाटेला कुणी जात नसत. जयश्रीचं तसं नव्हतं. निसर्गानं तिला मादक सौंदर्याचं वरदान दिलेलं होतं. तेच पुढे शाप बनून तिच्या मागे लागलेलं. तिचं मुसमुसलेलं अंग लपवायला भौरम्माकडं पुरेसे कपडेही नव्हते. मक्कुरची जयश्रीवर वाईट नजर नव्हती. पण त्याला तिची फिकीरही नव्हती. मात्र एके दिवशी आक्रीत घडलं....

मक्कुर लाकुडतोडया लोकांच्या लॉरीत बसून गुंटूरला निघून गेला होता. अन् त्याच सॉ मिलवाल्यांचा तरणाताठा देखणा मुकादम, एकदम दाक्षिणात्य नटांच्या वेशभूषेला शोभावे अशा कपड्यात मक्कुरला शोधत तिथं आला. बहुतेक त्याला रक्तचंदनाच्या रोपटयांची माहिती हवी होती. नेमक्या त्याच वेळी भौरम्मा लाख गोळा करायला जंगलात गेली होती. झोपडीत जयश्री अन् सुज्जी दोघीच होत्या. जयश्री रांजणात पाणी ओतत होती, ओढ्यातून हंड्यात आणलेलं पाणी तिच्या अंगावर सांडून ती निम्मीअर्धी ओली झालेली. ओलेत्या अंगातल्या जयश्रीला पाहताच, त्याच्या तोंडाला लाळ सुटली. पहिल्याच नजरेत रुबाबदार व्यक्तीमत्वाची छाप पाडून त्याने तिच्या हृदयावर कब्जा केला. त्यानंतर तो रोज गुपचूप येऊन तिला भेटू लागला. तिलाही त्याचे आकर्षण वाटू लागले. दोघांची भीड चेपली तशी त्याची लगट वाढू लागली, मर्यादा लांघल्या गेल्या. त्यातून व्हायचे तेच झाले. जयश्रीला दिवस गेले. मक्कुर आणि भौरम्माला सगळं ध्यानात येईपर्यंत फार उशीर झाला होता.

तिचं अनौरस संततीचं बाळंतपण झाल्याचं भौरम्माच्या सासरी कळते, तर त्यांनी त्या सर्वांची खांडोळी केली असती. शिवाय इकडून सॉ मिलवाले लोकंही त्याला जयश्रीवरुन दम देऊ लागले. त्याला ब्लॅकमेल करू लागले. त्यातल्या काही लोकांना तो नकार देऊ शकत नव्हता. कारण त्यापायी त्या सर्वांना जंगल सोडून बेघर व्हावे लागले असते. पोटाला मुकावे लागले असते. गर्भवती जयश्रीला राजरोस कुस्करले जाऊ लागले. तशी भौरम्मा कासावीस होऊ लागली. जयश्रीचा जीव तर हादरून गेला. भेदरलेल्या हरिणीसारखी तिची गत झाली. ते सगळं वेदनेच्या पलिकडचे होते. त्या चौघांना तिथून हलताही येईना अन् जयश्रीला कुठे नेऊन सोडावे म्हटले तर तेही जमेना.

त्यातच एके रात्री जयश्रीने फास लावून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते दोघे घाबरून गेले. त्यांनी यातून मार्ग काढायचे ठरवले, कारण गरोदर जयश्रीच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर सगळ्यांचीच धडगत नव्हती. अखेर हिम्मत करुन मक्कुर तिला आपल्या दूरच्या बहिणीकडे शांतीकडे कडप्पामधल्या येरगुंटलात सोडून आला. जयश्रीचं पोट खाली करण्यासाठी तिच्याकडे थोडेफार पैसेही दिले. त्याची बहीण म्हणजे पैशासाठी काहीही करायला तयार असणारी अवदसा होती. जोडीला ती स्वतः वाईट चालीचीही होती. तिची वाकडी पडलेली पावले कधीच सन्मार्गावर आली नव्हती. तिच्या चलाख नजरेने जयश्रीचा काय भाव येऊ शकतो? हे हेरले होते. नाही तरी ती तिची वा मक्कुरची कुणीच लागत नव्हती.

सहा-सात महिन्यापुरती तिला तिच्यापाशी ठेवण्यासाठी मक्कुर तिला तिथं सोडून गेला होता. पण त्याआधीच शांतीने तिची वासलात लावली होती. तिला जयश्रीच्या रसरशीत अंगाची किंमत चांगलीच ठाऊक होती. तिचं गाव रेल्वे महामार्गावरचं गाव असल्याने अनैतिक धंदे चालायचे. तिने विश्वासातला दलाल गाठून जयश्रीला विकून टाकलं. पुण्यात नेऊन पोट खाली करायचं, असं कारण तिने पुढे केलं होतं. ती स्वतः तिच्यासोबत तिला रवाना करायला गेली होती. तिथून परतल्यावर तिने मक्कुरला कळवले की, जयश्री दवाखान्यातून पळून गेली.

ही बातमी भौरम्माच्या कानी पडली, तेव्हा तिच्या पोटात गोळा आला. कंठातून आवाज फुटेनासा झाला. हातापायाला पेटके आले. दरदरुन घाम फुटला. अंग लटलट कापू लागले. श्वास गतिमान झाले. मस्तक फुटते की काय, असे वाटू लागले. त्या नंतर किती तरी दिवस भौरम्मा आपल्या धाकट्या मुलीला घेऊन जवळच असणाऱ्या चेरुवी नदीच्या काठी जाऊन बसायची. तासनतास त्या संथ हिरव्या निळ्या पाण्याच्या प्रवाहाकडे बघत राहायची. तेव्हा सुज्जीला वाटायचं की आपली मोठी ताई, आपली जयश्री या पाण्याच्या प्रवाहातून परत येणार आहे. म्हणूनच आपली आई आपल्याला घेऊन रोज इथे येतेय.

भौरम्माला वेड लागल्यागत झालं, झाडांच्या बुंध्यांखाली शून्यात डोळे लावून बसलेली भौरम्मा दिसली की मक्कुर तिच्या जवळ जायचा. तिच्या डोक्यावरुन हात फिरवायचा, तिला बिडी द्यायचा. ताज्या तेंदूपत्त्याचा तिला ठसका लागायचा. कधी कधी वाडग्यात कल्लू प्यायला द्यायचा. शिंदीसारखं ते पेय पिलं की, भौरम्माचं अंग हलकं होऊन जाई. दुःखाचा विसर पडे. मक्कुरचा तिच्यावर जीव होता, अशातला भाग नव्हता. आपल्या पोटापाण्याच्या चिंतेपायी तो तिची अशी जुजबी काळजी घ्यायचा. आता सॉ मिलवालेही त्याला त्रास देत नव्हते, त्यामुळे त्याचं आयुष्य काहीसं स्थिरावलं होतं....

इकडं बायकांच्या बाजारात उभं केलेल्या जयश्रीला अंगावर वीज कोसळल्यासारखं झालं होतं. ना छप्पर, ना आधार, ना परिवार फक्त वासनेचा बाजार ..! तिला ज्या कुंटणखाण्यात विकलेलं होतं. तो भामाचा होता. ती देखील आंध्रातलीच होती. तिच्याकडच्या सगळ्या मुली त्याच भागातल्या होत्या. तिनं जयश्रीचं पोट आधी मोकळं करुन घेतलं, तिला धंदा शिकवला. माणसं ओळखायला ती आपोआप शिकली. ते गणित इथं आपोआप शिकलं जातं. इथून-पळून जायचं तरी कुठं. आणि का हा मोठा प्रश्न तिच्या पुढ्यात असल्यानं तिनं विरोध असा कधी केलाच नाही.

मागच्या तीनेक महिन्यात नाहीतरी तिने अशाच यातना सहन केल्या होत्या. राहून-राहून तिला आई आणि बहिणीची आठवण मात्र सारखी येत होती. मनाला आवर घालत ती कसबसे दिवस घालवू लागली. कधीतरी आई भेटेल तेव्हा तिला भेटून आपला यात काहीच दोष नाही, हे पटवून द्यायचं आणि मग मोकळ्या मनानं जीव द्यायचा एव्हढेच तिचं ध्येय होतं. तिचे देवाकडे फार मोठे मागणंही नव्हतं. बघता बघता तिला इथं येऊन चार साडेचार वर्ष झाली. तिच्यावर लावलेली भामाची बोली तिने केव्हाच फेडून टाकली होती. तिचा पैसा आता तिला निम्मा का होईना पण हाती येत होता. जयश्रीला वाटू लागले की, हा पैसा असाच साठत जावा. आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं म्हणून काय झालं सुज्जीचं कधी ना कधी लग्न होईल, तेव्हा तिला हे पैसे द्यावेत. तेवढाच तिच्या संसाराला आधार होईल अन् आपली मोठ्या बहिणीची थोडी का होईना जबाबदारी पार पाडल्याचं समाधान आपल्याला मिळेल, असा तिचा होरा होता.

पण सुज्जी अन् भौरम्मा भेटणार तरी कशा? हे मोठं कोडंच होतं. तिला दरवेशपालेमला परतणे शक्य नव्हते. अन् भौरम्माला तिचा सुगावा लागणे कठीण होते. मात्र, तिची तीव्र मनोकामनाच तिच्या कामी आली. ज्या दलालाने तिला इथं आणलं होतं त्याची नि तिची एके दिवशी योगायोगाने गाठभेट झाली. तिनं एक पांढरी नोट त्याच्या हाती सरकावत आपल्या गावाचा पत्ता त्याला दिला. आईचा नाकनक्षा सांगितला. माडाच्या जंगलातील रस्त्यांची माहिती दिली. काम फत्ते झालं, तर बक्षीस म्हणून वाट्टेल ती 'सेवा' पुरवण्याचं वचनही दिलं....

जयश्रीची तगमग कामी आली. तो माणूस बरोबर पोहोचला. भौरम्मा आणि मक्कुरला खरी स्थिती समजताच हादरा बसला. मक्कुर तडक शांताच्या घरी गेला. पण तिने काखा वर केल्या. पोरगी पळून गेली, यावर ती ठाम राहिली. खरं तर मक्कुरला जयश्रीला विकलेल्या रकमेचा अर्धा हिस्सा हवा होता. पण कोल्ह्याच्या काळजाच्या शांतेने त्याला रिकाम्या हाती परतवले. भौरम्मा मात्र पुरती उन्मळून पडली. तर लहानग्या सुज्जीला आजूबाजूला नेमकं काय घडतंय याचा अंदाज आला नाही. मक्कुर जयश्रीला परत आणण्याच्या विरोधात होता. असला व्यवसाय करणारी मुलगी आपण घरी आणल्याचं कळल्यास बिरादरीवाले बहिष्कार घालतील, याची त्याला भीती होती. आपण मेलो तर आपल्या मयतीला बिरादरीचे लोक आले नाही, तर आपला आत्मा भटकत राहील असले भ्रामक विचार त्याच्या मनात असत.

तर भौरम्माचं म्हणणं होतं की जयश्रीला गावी परत आणता आलं नाही, म्हणून काय झालं? आपण तरी तिला जाऊन भेटून यावं. 'पोर एकटीच राहते. तिनं काय काय सोसलं असेल याची कल्पना सहन होत नाही'. भौरम्माच्या या हट्टावरुन त्यांच्यात कुरबुरी होऊ लागल्या. अखेर मधला मार्ग काढला गेला. त्याने स्वतः जायला नकार दिला. पण भौरम्माला जाण्यास अनुमती दिली. सुज्जीला दोनेक दिवस मक्कुरने सांभाळायचे ठरले. अन् त्याच दलालासोबत श्रावण महिना उलटल्यावर ती जयश्रीकडे पुण्यात बुधवारात आली.

भौरम्माला पाहून जयश्रीला अस्मान ठेंगणं झालं. आपल्या आईला कुठे ठेवू अन् कुठे नको असं झालं. दुपारी भौरम्मानं तिला आपल्या हातानं अंघोळ घातली. तिचं अंग दाबून दिलं. गेली कित्येक वर्ष तिच्या अंगावर वासनेचे साप रेंगाळत होते, किती तरी दिवसानंतर तिच्या अंगावरुन मायेचा हात फिरत होता. तिथले दुर्दैवाचे दशावतार पाहून भौरम्माला अन्नाचा घास घशाखाली जाईनासा झाला. कसंबसं दोन घास खाऊन प्रवासाचा शीण हलका करायला तिनं पाठ टेकली. उन्हाळयाचे दिवस असल्याने सगळ्या अंगाला घामाच्या धारा लागलेल्या, त्या लाकडी फळकुटात तिचा जीव खरं तर गुदमरून गेला होता. पण ती इतकी दमून गेली होती की, तिच्या नकळत तिचा डोळा लागला. इतक्यात भामाने जयश्रीला आवाज दिला, "जया कोन्नी इक्कड रा.." (जरा इकडे ये)...आईची झोप मोडणार नाही अशा बेतानं ती बाहेर आली. पाहते तर भामापाशी करीमभाई उभा होता. व्हीआयपी कस्टमर असायचे त्याच्याकडे. अडीअडचणीला तो पैसाही द्यायचा. त्यामुळे त्याला कुणी खाली हात पाठवत नसे.

पण आताची बाब वेगळी होती. किती तरी वर्षांनी आई आलेली होती. त्यामुळे जयश्री आढेवेढे घेऊ लागली. भामाने डोळे वटारले तरी ती बधेना. अखेर जयश्रीनेच धिटाई दाखवत करीमभाईला आपली अडचण सांगितली. त्यासरशी तो आधी भामाच्या अन् नंतर जयश्रीच्या कानात पुटपुटला. ती रक्कम ऐकून त्या हबकून गेल्या. शिवाय तो सांगत होता की, 'तिला पूर्ण रात्र थांबायची गरज नाही, रात्री बाराच्या आत परत आणून सोडतो, पण कस्टमर जुने आहे. त्याला जयाच हवीय.'

सांज कलायच्या बेताला भौरम्मा जागी झाली. आजूबाजूचा तो माहौल पाहून ती सर्द झाली. प्रत्येकीचा आरसा चालू होता. वेणीफणी पासून ते स्कीन कोम्प्लेक्शन पर्यंत नानाविध रंगरंगोटीला उधाण आलेलं होतं. गिऱ्हाईक रिझवण्यासाठी हा देखावा किती आवश्यक असतो हे जयश्री भौरम्माला उसनं अवसान सांगत होती अन् ती चोरुन पदराने डोळे पुसत ऐकत होती. ‘काही तासासाठी बाहेर जावे लागेल, तोवर टीव्ही पहा किंवा आराम कर’ असं भौरम्माच्या कानावर घालून ती ‘तयार’ होऊन बसली. करीमभाई येताच त्याच्यासोबत नाईटच्या कस्टमरकडे ती रवाना झाली. दृष्ट लागेल अशा आपल्या पोरीला कुणाचाही हात अंगावर फिरवून घ्यावा लागतो या कल्पनेनेच भौरम्माचा थरकाप उडत होता. जयश्रीला जाऊन जेमतेम एक तास झाला होता. आणि एक अघटित घडले.

रोरावणाऱ्या सायरनचा आवाज कानावर आला आणि त्या इमारतीत सर्वत्र गोंधळ उडाला. दणादाण पाय आपटत पोलिसांचा अख्खा फौजफाटाच तिथं दाखल झाला. उंबरठयापाशी लेडीज कॉन्स्टेबलला पाहून भामा जोरात ओरडली. ‘दाSSSड, दाSSSड पारीपू, पारीपू !!’ (धाड धाड, पळा पळा) काही वेळ तर नुसता कोलाहल माजला. काही चलाख पोरी मागच्या दाराने समोरच्या घरात घुसल्या. काही वेळात तिथेही पोलीस धडकले. दरम्यान, भामानं आणलेलं 12 वर्षाचं नवं 'सावज' शेजारच्या घरातील माळ्यावरच्या ट्रंकेत जाऊन बसलं होतं. पोलिसांना कुणी तरी हीच खबर दिली होती. अन् त्या आधारे त्यांनी रेड टाकली होती. त्या आधी एक डमी कस्टमरदेखील त्यांनी आत धाडला होता. त्याने ग्रीन सिग्नल दिल्यावरच पोलीस आत घुसले होते.

पोलिसांनी अड्ड्यात असलेल्या सगळ्या बायका पोरी व  हजर असलेल्या किरकोळ कस्टमरवर धावा बोलला. त्यातल्या एकदोघी अव्वल नंबरच्या अट्टल बदमाश होत्या. त्यांनी महिला पोलिसांना अन् पीआयला सातपिढ्यांची शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली. त्यांचे ते अचकट विचकट हावभाव, बोलताना हाताचं मधलं बोट हलवत अर्वाच्य अविर्भाव बघून पोलिसांची मती गुंग झाली. चलाख मद्धीनं तर कहर केला. शेजारच्या घरातल्या हसीनाचं शेंबडाळलेलं, मुतून चड्डी ओलं केलेलं घामेजलेलं पोर तिनं उचलून हातात घेतलं. त्या पोराच्या बुडाला जोरात चिमटा काढला, त्या सरशी ते पोर जोरात भोकाड पसरुन रडू लागलं. त्याचं रडणं इतक्या मोठ्या आवाजात होतं की रेडवर आलेले पीआय कातावून गेले. त्यानं ही रडणाऱ्या पोराची आई तिथंच ठेवायला सांगितली. रात्रभर हे पोरगं लॉकअपमध्ये रडत बसलं, तर नाईट शिफ्टवाल्यांच्या डोक्याचा भुगा करेल हे त्याला ठाऊक होते.

शिव्या देणाऱ्या दोघींना लेडीज कॉन्स्टेबलनी आवरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यासरशी त्या दोघींनी अंगावरचे कपडे उतरवायला सुरुवात केली, एव्हाना पब्लिकही जमा झालं होतं. त्या दोघी नेहमीच तमाशा करतात. न जाणो त्यांच्यामुळे पत्रकार मागे लागले तर काय घ्या! हा विचार करुन शेवटी त्या दोघींना तिथंच ठेवलं. बायकांना ओढत खेचत बाहेर आणलं जात होतं.  त्यात भामासह भौरम्माचाही समावेश होता. तिला तर हिंदी मराठी काहीच कळत नव्हते. सगळ्या बायकांसोबत तिलाही गाडीत कोंबलं गेलं....

गाडीत बसल्यावर भौरम्माच्या शेजारी बसलेल्या तेलुगुभाषिक मुलीने तिला हे सगळं काय चाललंय याची माहिती दिली. ते ऐकताच तिचा चेहरा काळाठिक्कर पडला. पोलिसांनी सगळ्यांची नावे रजिस्टरमध्ये नोंद करुन घेतली. गुन्हा नोंद केला आणि सकाळी जजपुढे उभं करण्याआधी त्यांची मेडिकलही करुन आणली.'भौरम्माला सोडा ती यातली नाही' असं भामापासून अनेक पोरींनी सांगून पाहिले. पण पोलीस बधले नाहीत.

दरम्यान, काही तासांनी नाईटसाठी बाहेर गेलेली जयश्री परतली. अन् तिथला किस्सा कळताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती मटकन खाली बसली. तोवर उरलेल्या मुलीही तिथं एकेक करुन गोळा झाल्या. जयश्रीपुढं आता भौरम्माला सोडवून आणण्याचं आव्हान उभं ठाकलं होतं. दुसऱ्या दिवशी कोर्टाने काहींना ताकीद देऊन तर काहींना दंड करुन तर काहींना एक दिवसाची शिक्षा करुन सोडून दिले. भामाचीही सुटका झाली. तर भौरम्मा आणि आणखी एका बाईला एक वर्षासाठी महिला सुधारगृहात रवाना केलं गेलं. सुटका होईपर्यंत आपल्या आईला महिला सुधारगृहातून कोणत्या 'दिव्या'तून जावं लागेल हे ध्यानी येताच जयश्रीच्या काळजाचे पाणीपाणी झाले.

सुज्जीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे जयश्रीने भौरम्माला तिथून बाहेर काढण्यासाठी खर्च केले. तरीही त्यात दिडेक महिना मोडला. यातून बाहेर आलेल्या भौरम्माने सुधारगृहाच्या चार भिंतीआड तेच भोगले होते जे जयश्रीने बाह्यजगात उघड उघड झेलले होते. भौरम्माच्या सुटकेनंतर जयश्रीने तिला स्वतःजवळ ठेवून घेतलं. दुसऱ्या दिवशी गुंटूरच्या रेल्वेने पाठवून दिले. आपल्या आईला आपण आराम तर देऊ शकलो नाही, पण आपल्यामुळे तिच्या आयुष्याला डाग लागला. हा सल तिला आयुष्यभर टोचत राहिला....

दीड एक महिन्याने आपल्या आईला परत आलेली पाहून सुज्जीचं देहभान हरपलं. आनंदानं तिनं आईला खच्चून मिठी मारली. भौरम्माला यायला इतके दिवस लागले याचे मक्कुरला नवल वाटले होते. मात्र, त्याचवळी तिला पाहून त्याला हायसेही वाटले होते. ती परतल्यापासून तो रोज तिच्याशी लगट करू पाहत होता. भौरम्मा मात्र त्याच्या डोळ्याला डोळा भिडवत नव्हती. तिचं हे वागणं त्याच्यासाठी कोडं होतं. मात्र तीनेक दिवसात त्याला याचा उलगडा झाला. त्या रात्री सुज्जी लवकर झोपी गेल्यावर मक्कुरने भौरम्माला आपल्या बिछान्यात ओढलं. त्याच्या या अधाशीपणानं ती जाम घाबरून गेली. एक अनामिक भीतीची लहर तिच्या धमन्यातून वाहत गेली. तिच्या छातीचा भाता जोरात हलू लागला होता. त्यानं बरीच झटापट केली, अन् थोड्याच वेळात काय ते बरोबर ‘जोखलं’ अन मोठ्याने खाकरत, पच्चदिशी थुंकत तो तिच्यापासून उठून दूर गेला.

भौरम्मा हुंदके दाबत रडू लागली. तिच्या डोळ्यातलं खारट पाणी गालावर ओघळू लागलं. ती रात्र तिच्या हमसून रडण्यात गुरफटून गेली. त्या नंतर आठवडाभर मक्कुर तिच्याशी बोलला नाही. अगदी घुमनघुस्क्यागत वागत होता तो. त्याला कशाचा संताप आलाय हे भौरम्माने ताडलं होतं. त्याच्याशी बोलायचा देखील तिने प्रयत्न करून पाहिला. पण काहीच साध्य झाले नाही. त्यानंतरच्या रात्री पेराली गावाहून येताना त्याने एक बाई सोबत आणली. तिलाही त्यानं त्या झोपडीत ठेवलं. त्या दिवसापासून भौरम्माच्या डोळ्यादेखत तो तिला भोगू लागला. दीडेक महिना महिला सुधारगृहात राहिलेल्या भौरम्माने तेच भोगले होते, जे तिची मुलगी जयश्री बाहेर राहून भोगत होती. तिच्यावर झालेली बळजोरी चाणाक्ष मक्कुरने बरोबर ताडली होती.

मुलीच्या वयाची पोर मक्कुरने भोगायला आणून ठेवली, मात्र त्या दिवसापासून त्याने भौरम्माच्या अंगाला कधीही हात लावला नाही. तर इकडे जयश्रीच्या आयुष्यात एकही दिवस असा गेला नाही की, दहा लोकांनी तिला विवस्त्र केलं असेल. आता जयश्री पूर्ण ताकद एकवटून धंदा करत्येय, बहिणीच्या लग्नाचे पैसे तिला गोळा करायचे आहेत तर विमनस्क अवस्थेतली केस विस्कटून गेलेली, खाण्यापिण्याची शुद्ध नसलेली, जगण्यातलं सत्व हरवून बसलेली भौरम्मा आता रोज पहिल्या सारखं चेरुवीच्या काठी येऊन बसते. नदीला हरतऱ्हेचे प्रश्न विचारते, बाईच्याच वाटेला हा भोग का यावा म्हणून अश्रू ढाळते. तिचे अश्रू नदीत मिसळले की, नदीच्या प्रवाहाला शिरशिरी येते, थरारुन तरंग उठतात. गटार, नाल्यांचे, ओढ्याचे पाणी सामावणाऱ्या चेरुवीचं पाणी भौरम्माच्या अश्रूंसह पुढे तुंगभद्रेला मिळतं. अन् तिथून स्त्रीजन्माच्या दुःखाचं उत्तर शोधायला थेट समुद्रात मिसळून थेट त्याच्या तळाशी जातं. बहुधा म्हणूनच समुद्र जितका खोल असतो तितका तो शांत अन् धीरगंभीर. त्याच्या पाण्यात भौरम्मासारख्या अनेकींचे अश्रू मिसळल्याने की काय त्याची चवही खारट असते...

(मूळ व्यक्तींची नावे बदलली आहेत. रेड लाईट एरियातील स्त्रियांची दुःखे समोर आणणे हा एकच हेतू या लेखामागे आहे. कॉमेंट करताना संयत शब्दात करावी)

समीर गायकवाड यांचे याआधीचे ब्लॉग :

गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध)


गणेशोत्सवातल्या आम्ही… (पूर्वार्ध)


उतराई ऋणाची


स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव


गीता दत्त – शापित स्वरागिनी

Blog शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV