रेड लाईट डायरीज : वेश्येतले मातृत्व ......

रेड लाईट डायरीज : वेश्येतले मातृत्व ......

नसीम धंद्यात अपघाताने आली होती. दिसायला ती फारशी आकर्षक नव्हती. रंगरुपाने बरीचशी डावी होती ती. काळ्यासावळी कांती, अत्यंत शिडशिडीत बांधा, बऱ्यापैकी बुटक्या चणीचा देह, उभट चेहरा किंचित बसके नाक, गालाची वर आलेली हाडे, वर आलेल्या डोळ्याच्या खोबणी, म्लान झालेले डोळे, निस्तेज काया, किंचित जाड वाटणारे बाहेर आल्यागत ठेवण असणारे ओठ, पातळ निमुळती अनलंकृत कानशीले, पसरट बोडके कपाळ, मधोमध फिकट सिंधूर भरलेले सदैव पिंजारल्यागत वाटणारे कुरळे केस, अंगावरची साडी कशीबशी गुंडाळलेली, काही बटनं तुटून एका खांद्यावर कललेले मळके पोलके, आवळून बांधलेला कंबरेचा कटदोरा आणि त्याखाली कातडीवर पडलेली गोलाकार काळसर खुण, पायाची फेंदारलेली बोटे अन् त्याची वाकडी तिकडी झालेली नखे, रंग उडालेली प्लास्टिकची चप्पल, कळकटून गेलेलं डाव्या पायात घातलेलं स्टीलचं वाळ्यासारखं असणारं कडं, उजव्या दंडात बांधलेली कसली तरी तेलकट मळकट कापडात गुंडाळलेली पेटी, गळ्यात काळ्या मण्यांची सर, हाडं दिसणाऱ्या हातातल्या बांगड्याही अशाच धूरकटून गेलेल्या. अशा अवतारातल्या नसीमकडे कुणी पुरुष आसक्त होण्याची शक्यता फारच कमी होती. तरीही मागच्या दहाबारा वर्षापासून ती धंद्यात टिकून होती. याचं कारण म्हणजे तिचा सोशिक स्वभाव.

गिऱ्हाईकाशी अत्यंत लीन होऊन वागणारी, दारुपाण्यास सोबत करणारी, बिडी काडी ओढणारी, तंबाखू मळून देत विनातक्रार कपडे उतरवून बसणारी नसीम म्हणजे खरं तर जिवंत कलेवर होतं, ज्याला स्वतःच्या कोणत्याही भावना नव्हत्या की कोणतंही अस्तित्व नव्हतं. नसीमच्या आवडीनिवडी नव्हत्या की कोणत्याही अपेक्षा नव्हत्या. तिनं अमुक एक हट्ट कधी केला नव्हता. साडी, कपडालत्ता, जेवण, खाणं पिणं, फिरणं, सिनेमा, गाणी, प्रवास कसला म्हणून तिला नाद नव्हता. ती नुसती जगत होती. किडे मुंग्या जगावीत तशी जगायची. महिन्याकाठी जमा होणारी रक्कम देखील समजत नव्हती. मात्र तिच्या भणंग स्वभावाचा तिच्या अड्डेवालीनेही कधी फायदा घेतला नव्हता. तिच्या हाती ज्या दिवशी पैसा येई त्या दिवशीच ती थोडीफार खुश वाटायची. तो दिवस सरला की ती पुन्हा मृतप्राय होऊन जाई. नाही म्हणायला आणखी एक काम करताना ती खुश असायची, लेकुरवाळ्या बायांकडे गिऱ्हाईक आले की त्यांची पोरे आपल्या छातीला ती लावून धरायची. तिच्या ओघळलेल्या स्तनातून दूध येत नव्हते पण तिच्या छातीतून पाझरणारा मायेचा झरा त्या तान्हुल्यांना शांत करायचा. छातीशी बिलगलेलं पोर शांत झालं की नसीमच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान येई, मूल विलग झाल्यावर तिच्या चेहऱ्यावर पुन्हा बारा वाजलेले असत.

पूर्वी नसीम अशी नव्हती. खळखळून हसायची. हास्य विनोद करायची. अचकट विचकट अविर्भाव करत गिऱ्हाईकांची टिंगल टवाळी करायची, गुटखा खायची, आकडा लावायची, तर्राट आयुष्य जगायची. प्रत्येक दिवस ती आपल्या मर्जीने जगायची. कस्टमरची कधी गच्ची धरायची तर कधी पाय चेपून द्यायची! नसीम मूळची बुऱ्हाणपूरची. शकिला तिची आई. ऐन वयात येताना चुकीची पावलं पडल्यामुळे तिचा रस्ता चुकला. भोपाळ ते कामाठीपूरा हा प्रवास कसा होत गेला हे तिला देखील उमगले नव्हते. पोट पाडता आले नाही याची तिला खंत होती. आपल्या वासनेचं प्रतिक तिला जन्माला घालायचं नव्हतं पण जवळ पैसा अडकाही नव्हता आणि अक्कलही नव्हती. हाती थोडा पैसा येईपर्यंत फार उशीर झाला होता. सात महिन्याचा गर्भ पाडताना जीव जाऊ शकतो हे ध्यानात आल्यावर तिने तो नाद सोडला आणि आपली बहिण ताहिरा हिच्या गावी जाऊन तिने पोरीला जन्म दिला. ती मुलगी म्हणजेच नसीम. नसीमचा सांभाळ तिच्या मावशीने केलेला. जमेल तितका जीव लावायची ती. पण तिच्या मुली आणि नसीम यात तिच्या नवऱ्याने भेद करायचा तो केलाच. हळूहळू नसीमला सगळं कळू लागलं. तिच्या मौसाचे टोमणे तिला उमजू लागले. ती दहा अकरा वर्षाची असताना तिने मावशीकडे हट्ट धरला की एकदा का होईना आपल्या आईला शकीलाला बोलवावं! तिच्या कुशीत शिरुन तिच्याशी मनसोक्त बोलावं, तिच्यापाशी आपलं मन हलकं करावं, आपला कसूर तरी काय हे तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारावं असं तिला वाटत होतं. नसीमच्या हट्टापायी ताहिराने शकीलाला बोलावणं धाडलं.

बहिणीच्या सांगाव्यावरुन होय नाही करत करत शकिला एकदाची नसीमच्या भेटीस आली. भरदार गोटीबंद अंगाची, पाणीदार डोळ्याची, तुकतुकीत कांतीची, लाघवी चेहऱ्याची शकिला अत्यंत आकर्षक लोभसवाणी स्त्री होती. तिच्या उफाडलेल्या देहातच एक कमालीचं आसक्त आवतण होतं, ज्याला कुठलाही भोळा भाबडा पुरुष सहज भुलला जायचा. बहिणीच्या घरी जायचं म्हणून नेहमीचा भडक पोशाख, बटबटीत रंगलेपन सारं टाळून अगदी साध्यासुध्या रुपात ती आली होती. तरीही तिची नजर काय तो कहर माजवत होतीच. आईला पाहून नसीम हरखून गेली. तिचे रुप पाहून ती दंग होऊन गेली होती. दोनेक रात्री तर तिने आईच्या कुशीतच काढल्या. तिसऱ्या दिवशी ताहिरा आणि तिचं कुटुंब एका नातलगाच्या निकाहसाठी बाहेर पडलं आणि नसीमला आपल्या आईचं दुसरं रुप नजरेस पडलं. नसीमला पोटाशी धरुन ती धाय मोकलून रडली होती. आपल्याला माफ करावं म्हणून कपाळ बडवून घेत होती. आपला सगळा पूर्वेतिहास तिने नसीमच्या पुढ्यात उलगडला. आपण कसे चुकत गेलो आणि आपली पावलं कशी चुकीची पडत गेली याची कबुली दिली. आपल्या चुकांची शिक्षा आपल्या मुलीला भोगावी लागली याचं शल्य तिने बोलून दाखवलं. आपल्या चुकांची किंमत चुकवण्यासाठी स्त्रीदेहाच्या बाजारात उभं राहावं लागलं हे सांगताना ती साफ कोलमडून गेली होती. आपल्याला तोंड लपवून जगावं लागतं हे सांगताना जगाच्या नजरेत आपली कवडीमोल किंमत असल्याचं तथ्यही तिने सांगितलं. आपल्या आईची ही अवस्था पाहून नसीमला गलबलून आलं. तिने आईला कवेत घेतलं आणि कितीतरी वेळ ती तिला थोपटत राहिली. काही वेळ निशब्दतेत गेल्यावर शकिलाने मनातले आकाश आणखी रिते केले. आपल्या वाटेला जे आलं ते पोरीच्या वाटेला येऊ नये याकरिता मुलीच्या पालन पोषणासाठी, तिच्या शिक्षणासाठी ती ताहीराच्या नवऱ्याला दरमहा पैसे पाठवायची. तिची ही माहिती ऐकून नसीम चपापली. कारण तिचे मौसा कायम तिला घालून पाडून बोलायचे. मावशीही कधी आईने पैसे दिल्याचे बोलली नव्हती कदाचित मावशीला ही बाब ठाऊकही नसावी असं तिला वाटलं. ते खरंच होतं. ताहीराच्या नवऱ्याने ताहीराला ही गोष्ट कधीच सांगितली नव्हती उलट तो तिच्यावरुन ताहीरालाच ताने द्यायचा.

यामुळेच की काय शकिला घरी आल्यापासून ताहीराचा नवरा बिथरला होता. आपलं बिंग फुटण्याची त्याला भीती वाटत असावी. म्हणून त्याने एक योजना आखली आणि शकीलाला पुन्हा एकदा उरल्या सुरल्या माणसातून उठवलं. त्या रात्री त्याने झोपण्यासाठी नसीमची रवानगी आपल्या मावशीकडे केली आणि नशीलं द्रव्य पाण्यातून पाजून शकिलाला आपल्या खोलीत उचलून आणलं. तिचे सगळे कपडे काढले, तिला पार विवस्त्र केलं. आपल्या अंगावर तिच्या हाताने ओरखडे उमटवून घेतले. आपले बनियन फाडून घेतले आणि आरडा ओरडा करत कांगावा केला. तो आवाज ऐकून ताहीरा, नसीमा आणि ताहीराच्या मुली सगळ्याजणी जाग्या झाल्या आणि तिथे गोळा झाल्या. आपल्या नवऱ्याच्या खोलीत नशेच्या कैफात धुंद असणारी नग्न शकिला पाहून ताहिरा मुळासकट हादरली. ती रात्र नसीमाच्या पोटात गोळा आणून गेली आणि तिच्या जगण्याला चकवा देऊन गेली. सकाळ होताच शकिला भानावार आली पण तोवर होत्याचे नव्हते झाले होते. तिने समजावून सांगायचा खूप प्रयत्न केला पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही अपवाद होता नसीमचा! नसीमने आपल्या आईची कड घेतल्याचे पाहून ताहीरा आणि तिच्या मुलींना धक्का बसला. आपल्याजवळ इतकी वर्षे राहूनही ही मुलगी आपल्या आईचे ऐकून आपल्या बापासमान पुरुषावर संशय घेतेय याचा तिला संताप आला. शकिलाची घरातून हकालपट्टी झाल्यावर नसीमने देखील आपला बोऱ्याबिस्तर आवरला. तिला कोणीही अडवले नाही. जड पायाने खालच्या मानेने त्या मायलेकी नरपशूंच्या बाजारात दाखल झाल्या.

आपण ज्या गोष्टीसाठी मुलीला जपले तिच तिच्या माथी लिहिण्याचे दुर्भाग्य आपल्या हाती यावे याचा शोक अनावर होऊन शकिला दुःखसागरात बुडून गेली. तरीही तिने पोरीला तळहाताच्या फोडासारखे जपले. तिचे शीलभ्रष्ट होऊ नये म्हणून शक्य ती काळजी घेतली. पण नियतीला हे मंजूर नसावे. तिथल्या बायकांचं छानछोकीचं वागणं पाहून नसीमही नट्टापट्टा करु लागली अन एका बेसावध रात्री तिची पारध झाली. ती फसली. शकीलाला हे कळल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली. बघता बघता तिला दारुचं व्यसन जडलं. त्यातून दुखणंही लागून आलं. जोडीला बिडी सिगारेटच्या जुन्या व्यसनाने घात केला. आपलं दुःख हलकं व्हावं म्हणून सुरु केलेले झुरके तिच्या जीवावर बेतले होते. तिला टीबीने ग्रासले होते. तिचा दवापाणी भागवण्यासाठी नसीमला बाजारात आपली किंमत लावावी लागली. नवीन नवीन तिला चांगले पैसे मिळाले पण पुढे जाऊन तिचं उत्पन्न रोडावत गेलं. तिकडं शकीलाचा देह खंगत गेला. ती झुरत गेली. आपल्यामुळे आपल्या पोरीचं आयुष्य बरबाद झाल्याची टोचणी तिला जगू देत नव्हती. खरं तर इतके वर्ष धंदा करुन आपल्या आईच्या गाठी जेमतेम काही शे रुपये कसे नव्हते याचा उलगडा नसीमला होत नव्हता. शकीलाची कमाई बक्कळ होती असं तिथल्या बायका सांगत. मात्र दर महिन्याला एक दिवस ती पैसे घेऊन बाहेर जायची अशी माहितीही तिला त्यांनी पुरवली. ताहीराच्या नवऱ्याकडे नसीमसाठी जे पैसे पाठवले जात ते तिच्या उत्पन्नातील चौथ्या हिश्श्याहून कमी होते. मग आपली आई त्या उरलेल्या पैशांचे काय करत असेल हा प्रश्न नसीमला हैराण करु लागला. भरीस भर म्हणजे दर हफ्त्याला, महिन्याला तिला मिळणाऱ्या तिच्या पैशावर कोणी तरी हात साफ करु लागले. आपले पैसे कसे काय चोरीस जाताहेत आणि तेही नेमक्या दिवशी याचे तिला उत्तर मिळत नव्हते. पण एके दिवशी तिने शकीलाला आपल्या ट्रंकेत हात घालून पैसे चोरताना आपल्या डोळ्याने पाहिले आणि तिचा स्वतःवरचाच विश्वास उडाला. आपली आजारी आई आपले पैसे का चोरत असावी या प्रश्नाने तिला हैराण केले. त्या दिवशी तिने शकीलावर नजर ठेवली.

दुसऱ्या दिवशी दुपारी नसीमकडे एक गिऱ्हाईक आल्याचे पाहून शकिलाने मोका साधला. शकिलाच्या वासावर असणारी नसीम सावध झाली. गिऱ्हाईक बाजूस सारुन चोरपावलाने ती गलितगात्र आईचा पाठलाग करु लागली. कामाठीपुऱ्यावरुन दादर, धारावी, कुर्ला, मुलुंडमार्गे ती ठाण्यात आली. शकिलाने पुढे जाऊन लोकलचा प्रवास संपल्यावर टॅक्सी केली. टॅक्सीने ती थेट ठाण्यातल्या मेंटल हॉस्पिटलला उतरली. नसीम तिच्या मागोमाग होतीच. चालताना तोल जाणारी शकीला एका आयापाशी थांबली. तिच्या हातात तिने त्या नोटा सरकावल्या. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते, ते त्या आयाने पुसले. काही अंतरावरुन चोरुन पाहणाऱ्या नसीमला कशाचाच उलगडा होत नव्हता. काही वेळाने एक नर्स आणि एक सुरक्षारक्षक तिथे आले आणि शकिला त्यांच्यासोबत आत निघून गेली. बराच वेळ नसीम तिथेच ताठकळत उभी राहिली. तासाभराने शकिला बाहेर आली. रडून रडून तिचे डोळे सुजले असावेत. चेहरा पार उतरलेला होता. चालण्याचे त्राण नसूनही नेटाने पावले टाकत ती बाहेर आली. हॉस्पिटलबाहेर येताच नसीम तिच्या समोर आली. अकस्मात मुलीला समोर पाहून शकिला पुरती गांगरुन गेली. तिची बोबडी वळली. काय बोलावे ते सुचेनासे झाले. अखेर तिने नसीमला मिठी मारली आणि धाय मोकलून रडू लागली. आजूबाजूचे लोक चक्रावून त्या दोघींकडे पाहू लागले. नसीमला तर काहीच कळत नव्हते. तिने शकिलाला आधी शांत केले. मग शकिलाने सत्यकथन केले.

शकिलाच्या आयुष्याचे धिंडवडे निघाल्यानंतर तिच्या आईला मलीहाला जबर मानसिक धक्का बसला होता. गावात झालेल्या मानहानीला कंटाळून एके दिवशी शकिलाच्या वडीलांनी तिला चक्क रस्त्यावर बेवारसासारखे सोडून दिले होते. तिकडे ताहीरा आपल्या नवऱ्याला भ्यायची आणि तशातच नसीमही तिच्या पदरात असल्याने ती आईला मदत करु शकली नव्हती. तरीही ही घटना तिने शकिलाला पत्रातून कळवली होती. त्या नंतर काही दिवसातच शकिलाने बुऱ्हाणपूरात गुपचूप येऊन डोक्यावर परिणाम झालेल्या आपल्या वेडसर आईला ठाण्यात आणून तिथल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. दर महिन्याला ती आईला भेटायला यायची. तिची काळजी घेतली जावी म्हणून तिथल्या लोकांना आपखुशीने पैसे द्यायची. तिच्या भल्यासाठी अल्लाहकडे दुवा मागायची. मलीहा आणि नसीम हेच शकिलाच्या जगण्याचे आधार होते. त्यातला एक आधार आता खचला होता आणि ती स्वतःही पुरती झिजून गेली होती. तिने नसीमला सोबत घेऊन आपल्या दुरुनच आपल्या वृद्ध आईची खोली दाखवली. त्या दिवशी नसीमचा ऊर भरुन आला. आपल्या आईचा आता तिला अत्यंत अभिमान वाटत होता. आपली आई साधी सुधी बाई नाही, तिने दोन जीव जगवले याचे अपार समाधान नसीमच्या चेहऱ्यावर नांदत होते. पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. काही दिवसात शकिलाने आपला जीवन सफर थांबवला. ती आपल्या अन्यायाची कैफियत करण्यासाठी अल्लाहच्या दरबाराकडे रवाना झाली.

शकिला गेल्यानंतरच्या महिन्यात शकिलाच्या जागी नसीम ठाण्यातल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये आली. जड पावलाने ती आपल्या आजीच्या खोलीत शिरली. देहाचा सापळा झालेली, शून्यात नजर असलेली, अस्ताव्यस्त केस पसरलेली, विमनस्क चेहऱ्याची जरठ वृद्ध मलीहा आत झोपून होती. नसीम आत गेली. आपल्या आजीला पाहून तिला आपल्या आईची शकिलाची आठवण झाली. तिला रडू कोसळलं. "अम्मीजान" म्हणत तिने हंबरडा फोडला. तिच्या त्या आर्त हाकेने मलीहाने तिच्याकडे आपली मान हलवली. तिचा कातडी लोंबत असलेला मुलायम हात नसीमने आपल्या हाती घेतला. त्या सरशी त्या मलीहाच्या डोळ्यात एका क्षणासाठी अलौकिक चमक तरळून गेली. तो स्पर्श तिला काहीसा ओळखीचा वाटला, तो आवाज तिचे थिजलेलं अंतःकरण वितळवून टाकणारा वाटला. नकळत ती पुटपुटली, "शकिला! शकिला, मेरी बेटी ! कहां गयी थी तुम?"

तिचे बोलणे ऐकून तिथे उभ्या असलेल्या नर्सला हर्षवायू व्हायचा राहिला होता. तिने मोठ्याने डॉक्टरांना पुकारले. डॉक्टर धावतच तिथे आले. पेशंट कित्येक वर्षाने बोलत होता! त्या अनुभवाने ते चकित झाले होते.

त्या दिवसानंतर दर महिन्याला नसीम तिथे यायची तेव्हा म्हातारी मलीहा चैतन्यमय होऊन जायची. नसीमला खरंतर आता जगावंसं वाटत नव्हतं पण जोवर म्हातारी मलीहा जगत होती तोवर तिलाही जगणं भाग होतं. मलीहाच्या आधी मरुन जायचं तिला मुनासीब वाटत नव्हतं. मलीहाच्या पालन पोषणाइतके पैसे महिन्याकाठी मिळाले तरी नसीमला समाधान वाटे, बाकी तिचे जगणे म्हणजे काय होते का याचे उत्तर त्या विश्वनिहंत्याकडेही नव्हते. नसीमला एकीकडे मलीहासाठी शकिला म्हणून जगावे लागत होते तर मलीहाला नसीमच्या रुपात आपली मुलगी दिसायची. या ओढाताणीत नसीमच्या काळजातली आई जागी झाली होती जी इतरांच्या तान्हुल्यांना आपल्या उराशी कवटाळत होती. एरव्ही बेचव चेहरा घेऊन उभी असणारी नसीम 'त्या क्षणी' तृप्त का वाटायची याचे हे उत्तर थक्क करणारे होते! नसीमच्या अर्थहीन जगण्यातला सच्चा अर्थ उमगला तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहिल्या होत्या. सगळी गाथा ऐकवून झाल्यावर गिऱ्हाईक समजून कपडे उतरवण्याच्या बेतात असलेली नसीम माझ्या रडवेल्या चेहऱ्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत होती, मी तिच्या दुःखाला अनुभवत होतो आणि बाईच्या मादीपणावरचे उत्तर शोधत उस्मरत होतो ...... वेश्येलाही आई असते आणि आईची ममता असते याचा नव्याने गवसलेला हा अर्थ माझे जगणे अधिकच समृद्ध करुन गेला...

- समीर गायकवाड.

(घटनेतील मूळ व्यक्तींची आणि स्थळांची नावे बदलली आहेत. या व्यवसायात असणाऱ्या स्त्रियांची दुःखे जगापुढे यावीत हा एकच लेखनहेतू सकल लेखनामागे आहे)

(लेखासोबत देण्यासाठी caption-वेश्येलाही मातृत्वाच्या भावना असतात, ती ही कुणाची तरी मुलगी असते अन कुणाची तरी आई असते. समाज मात्र मादीच्या पलीकडे दुसऱ्या भिंगातून तिच्याकडे कधीच पाहत नाही आणि स्त्रीत्वाला मिळालेल्या मातृत्वाच्या देणगीचं ऋण वेश्येला फिटता फिटत नाही. नसीमच्या रुपातली ही संघर्षगाथा वेश्येतल्या मातृत्वाचा अंतःकरणाला जोरदार चटका लावून जाते.....)

समीर गायकवाड यांचे याआधीचे ब्लॉग :

इंदिराजी .... काही आठवणी ...

रेड लाईट डायरीज : गिरिजाबाई .....

रेड लाईट डायरीज : सेक्सवर्कर्सचे रॅकेट – 2

‘रॅकेट’ रेडलाईट एरियाचे…  


नवरात्रीची साडी…

रेड लाईट डायरीज – शांतव्वा….

रेड लाईट डायरीज – ‘धाड’!

गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध)

गणेशोत्सवातल्या आम्ही… (पूर्वार्ध)

उतराई ऋणाची…

स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव…

गीता दत्त – शापित स्वरागिनी

Blog शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sameer Gaikwad’s blog series Red light Diaries on Veshyetale Matrutwa
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV