नवरात्रीची साडी...

नवरात्रीची साडी...

रंग विटलेल्या दंड घातलेल्या इरकली साडीतली रुख्माई दर साली तुळजापुरास पुनवेला चालत जायची. तिची विधवा सून मथुरा तिच्या संगट असते. रुख्माई ल्हानी असताना पासून नवरात्री करायची. मथुरेलाही तिचाच नाद लागलेला. खुरपं हातात धरून सदानंदीचा उदो उदो म्हणणाऱ्या रुख्माईचा नवरा मरून तीस वर्ष झालीत. पोरगा गेल्याचं दुःख तिनं तण काढावं इतक्या सहजतेनं काळजातनं काल्ढं. पण तिची भक्ती कमी झाली नाही. मथुरेला दोन पोरी अन एक पोरगा. तिघं नेमानं शाळंत जातात अन या दोघी रोजानं कामावर जातात. रुख्माईच्या दारात जो कुणी सांगावा घेऊन यील त्याच्या रानात या दोघी माइंदळ बेगीनं जातात. काम आटपलं की तडाक वस्तीचा रस्ता धरतात. गावकुसात्ले सगळे रस्ते त्यांच्या पावलांच्या वळखीचे झालेले. त्यांच्या भेगाळल्या पायात जर कधी बाभळ घुसली तर ती कुणाच्या बांधावरची आसंल हे देखील त्यांना कळायचं. मिळंल त्याच्या रानातनं कवळं मकवन आणून आपल्या कालवडीला खाऊ घालायच्या त्या. तीन लेकरं, दोन विधवा बाया आणि एक तांबडी कालवड असलेल्या त्या कुटुंबात नवं काय घडत नव्हतं. यंदाच्या नवरात्रीत शेजारच्या भागीरथीनं मथुरेला शहरातलं नऊ रंगाच्या नऊ दिवसाच्या साड्यांची नवरात्र साजरी करण्याची नवी रीत सांगितली अन देवीची भक्तीण डोक्यावर सवार झालेल्या मथुरेला आनंदाचं उधाण आलं. नाही म्हटलं तरी मागच्या काही वर्षापासून गावात देखील याच्या खाणाखुणा उमटू लागल्या होत्या. पहिला दिवस पिवळ्याचा अन नंतरचा दिवस हिरव्याचा आहे एव्हढंच तिच्या मनाने ध्यानी ठेवलेलं. तिनं रातच्याला भीत भीत सासूच्या कानावर आपली इच्छा ऐकवली. रुख्माईने फारसे आढेवेढे घेतले नाहीत कारण आपल्या मर्यादाशील सुनेला ती चांगली ओळखून होती.

"आपल्या घरी धड साडी लुगडं न्हाई पर मंडोदरीवैनीच्या घरून नेसासाठी एकच दिवस का होईना जो रंग असंल त्या दिसाची साडी आणायचे" असे तिने मनोमन ठरवले. मथुरेनं आदल्या दिवशी सांज मावळ्ल्यावर मंडोदरीकडे जाऊन नेसूची जुनेर पर चांगली अशी पिवळी साडी एक रोजासाठी द्याल का अशी आर्जवं केली. कोणत्याही वक्ताला अडीअडचणीला कामाला येणाऱ्या मथुरेला मंडोदरी नाही म्हणणं शक्यच नव्हतं. घरचं किराणा दुकान असणारी मंडोदरी मुबलक पैका अडका बाळगून होती, साठ सत्तर एकर रान पाण्यात भिजत होतं, घरी दुध दुभतं होतं, कपडा लत्ता भरपूर होता. त्यामुळं तिनं मथुरेला पिवळी साडी खळखळ केल्याबिगर आणून दिली.

दुसऱ्या दिवशी कामावर जाताना मथुरेचं पाय मातीला लागत नव्हतं. लगबगा चालताना ती सारखी अंगावरच्या साडीकडं बघायची. तिच्या चैतन्यरुपाला पाहून रुख्माईचं डोळं भरून आलं, आज आपला नवरा असता, पोरगा असता तर आपल्या सुनेला लोकांकडून अशा साड्या मागाव्या लागल्या नसत्या याचं तिला राहून राहून वाईट वाटत होतं. काम आटोपल्यावर सांज व्हायच्या आधी दोघी घरी परतल्या. पोरास्नी वाढून काढून झाल्यावर मथुरेच्या जीवात उलघाल सुरु झाली. मथुरेच्या डोक्यात साडी परत करायची घाई तर होतीच पण साडीचा मोहदेखील निर्माण झाला होता. आणखी एकदीवसाकरिता नेमलेल्या दुसऱ्या रंगाची साडी आणावी असं तिला वाटू लागलं. तिनं भेदरल्या आवाजातच सासूला इचारलं. तिचं कोड्यागत घाबरं घुबरं बोलणं ऐकून ती जरा विचारात पडली.

"हे बग मथुरे आपुन दोगी बी इध्वा, रंडक्या बोडक्या हावोत. मी तसलं रंगी बेरंगी नेस्ली न्हाई अन माजं मन बी करत न्हाई. मला त्येची आस बी न्हाई... तुज्या मनाला जे बराबर वाटतं ते तू कर, पर जरा जपून कर. जरा भाव्कीचा गावकीचा इचार पाचार कर. उसनवारीची असली तरी आपली ऐपत बघून हौस कर पोरी" - हनुवटीवर उजव्या हाताची तर्जनी ठेवून पदर सावरत डोईची चांदी झालेली रुख्माई सूनंला मथुरेला समजावून सांगत होती. "आजवर आपुन दोघांनी नावाला लई जपलंय त्येला बट्टा लागंल असं काही करू नगंस"तिच्या बोलण्याला मथुरा झपाटल्यागत मान हलवत होती. तिच्या डोळ्यापुढं गावातल्या तालेवार घराण्यातल्या जरतारी नवरंगातल्या साड्या नेसून मिरवणाऱ्या बाया तरळत होत्या.

रुख्माईने कसाबसा होकार देताच मथुरा रात गडद व्हायच्या आधी मंडोदरीच्या दरी हजर झाली.

"वैनी, ही आजची साडी घ्या. एकदम सोच्च ठुलीय बरं का !"

मंडोदरीने हसत हसत तिच्या हातातली साडी घेतली. तरी मथुरा दारातच घुटमळलेली.

मंडोदरीनं पुढं होत विचारलं, "कसं वाटलं मग आज ?"

या प्रश्नावर मथुरा खूप वर्षांनी लाजली असावी. उन्हातान्हात फिरून रापलेल्या तिच्या लाल गव्हाळ रंगाच्या गालावर मस्त खळी पडली तशा दोघी खळखळून हसल्या.

"एक इचारू का ?" - मथुरा.

मंडोदरीने मान डोलावली.

"वैनी फकस्त उद्यासाठी एकदि साडी मिळंल का ?" पोटातला गोळा मोठ्या कष्टाने घशापाशी थांबवत मथुरा एका दमात बोल्ती झाली.

मंडोदरी हसली. दोन पळं तिथंच चकवा झाल्यागत मथुरेला बघत उभी राहीली अन नंतर भानावर येताच आत गेली. बाहेर येताना तिच्या हातात एक अत्यंत चमकदार हिरवीकंच साडी होती. ती साडी तिनं मथुरेच्या हाती ठेवली. "जपून वापर गं मथुरे, तीन हजाराची आहे... माझ्याकडे हिरवा शालू हाय तो मी घालीन. बाकी हिरव्या साड्या एकदम पोतेरं झाल्यागत हैत. ही साडी मी दिल्याचं आमच्या ह्येनला कळू दिऊ नगंस म्हंजी झालं बग, दिस मावळाय्च्या आत परत आणून दे बरं का "

'इतकी भारी साडी नगा देऊसा, सादी असंल तर द्या न्हाईतर र्हाऊ द्या' असं म्हणत मथुरा मागं हटू लागली तशी मंडोदरीने तिला समजावून सांगितलं आणि बळंच ती साडी तिच्या हातावर ठेवली.

ती मखमली साडी हातावर पडताच मथुरेच्या मनातले मोर थुईथुई नाचू लागले. साडी घेऊन अक्षरशः धापा टाकत मथुरा घरी धावत पळत आली. त्या रात्री तिला झोप अली नाही. रातसारी नुस्ती कूस बदलत होती ती. दिस उजाडताच हणमंतभाऊंच्या रानात सासू सुना रवाना झाल्या. मथुरेला उगंच वाटत होतं की 'समद्या बाया आप्ल्याकडंच बघत्येत' पर तसं काही नव्हतं. जो तो आपल्या कामाच्या नादात होता, येरवाळी कोण काय नेसलंय ह्याकडे ध्यान द्यायला कुणाकडे वेळ नव्हता. सगळीकडं नुसती लगबग होती. नाही म्हणायला रानाकडं निघालेल्या काही बायांनी मथुरेच्या साडीचा चाखाचोळा घेतलाच. 'मंडोदरीवैनीची दिसत्येय जणू, कवा आणलीस, बाजारात कदीपास्न जाया लाग्लीस, सासूला आता समदं चाल्तं जणू, रांड मुंड बाईच्या जातीनं अशी थेरं करू नै' इथंपासून ते, 'मथुरे तू आजूक बी नवी नवरीवानी दिस्तीस बग' इथंपर्यंतचे टोमणे टोचके तिला ऐकायला मिळाले.

हणमंत शेळक्याच्या रानात कामाला गेल्यावर रुख्माई आपल्या सुनेकडे अप्रूपाने बघत होती. आपली सून आजूक बी कमळंच्या देठागत टच्चून अंग टिकवून हाय हे तिच्या डोळ्यातनं स्पष्ट दिसत होतं. न राहवून तिने मथुरेच्या पाठीवरून हात फिरवला, 'पोरी लई गोड दिस्तीस बग, आज अंगद अस्ता तर तुला कमरंत उचलून धरून नाचला असता, तुजा सासरा अस्ता तर हातातलं तोडं काढून तुला दिलं अस्तं बग". बोलताना रुख्माईच्या डोळ्यांना धारा लागल्या. तिचे डोळे पुसताना मथुरेच्या पापण्या कधी ओल्या झाल्या काही कळलंच नाही. दुपारी चवाळयावर बसून जेवताना ती साडीची इतकी काळजी घेत होती की बोलायची सोय नव्हती. अखेर उन्हं तिरपी झाली, कामाची हाजरी झाली. तशा त्या दोघी घाईघाईनं त्यांच्या वस्तीकडं निघाल्या.

चालताना मथुरेचं सगळं लक्ष साडीत गुतलेलं तर रुख्माईच्या डोक्यात प्रश्नांचं वारूळ तयार झालेलं, त्यातनं हजारो मुंग्या बाहेर येऊन तिला जणू डसत होत्या. दोघी झपाझपा पावलं टाकीत होत्या. इतक्यात मागून धुराळा वारयावर उडत आला अन गुरांचा गल्का कानी येऊ लागला. संपत मान्याची गुरं उधळली होती. त्याचा वावभर शिंगाचा वळू गावभर प्रसिद्ध होता. एक नंबरचा खुन्शी होता तो. तो वळू पुढं सैरभैर धावत होता, त्याच्या मागं बैलं, म्हशी, वासरं पळत सुटली होती. मागं संपतचा तरुण पोरगा हातात चाबूक धरून पळत होता पण त्याचा वेग गुरांच्या पेक्षा कमी होता. हा गल्का बघून रुख्माई अन मथुरा पार भेदरून गेल्या. याच्या पुढं पळण्याइतका जोर त्या दोघीत खचितच नव्हता. मथुरेने पुढे होत आधी आपल्या सासूला चिचंच्या पट्टीच्या कडंला ओढलं, घाबरलेली म्हातारी खाली पडली. तिच्या घशाला कोरड पडलेली. तिच्या डोळ्यात आता संपत मानेचा बेफाम सुटलेला वळू स्पष्ट दिसत होता. अचानक ती हातापायाला झटके देऊ लागली. "मथुरेss साडी, साडीss" असे तिच्या तोंडून शब्द अर्धवट बाहेर पडले आणि तोवर तो उन्मत्त वळू त्यांच्याजवळ पोहोचला. सासूच्या अंगावर त्याचं पाय पडू नये म्हणुन मथुरा तिच्या अंगावर पालथी झोपली. धाड धाड पाय आपटत तो वळू तिच्याजवळून गेला. सुदैवाने त्याचा पाय त्यांच्या अंगावर पडला नाही. पण एक आक्रीत झालं त्याच्या मागच्या पायात मथुरेच्या साडीचा पदर अडकला. मथुरा लांबपर्यंत खेचली गेली. तिला मागच्या गुरांनी तुडवलं. आपल्या सुनेला फरफटत जाताना पाहून रुख्माई भानावर आली. मोठ्यानं ओरडण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिच्या कंठातून आवाज फुटत नव्हता.

काही वेळात गुरांच्या पायाचा आवाज कमी झाला पण सगळीकडं नुस्ती धूळधाण उडाली होती. धुळभरल्या वाऱ्यासंगं उडत आलेले मथुरेच्या अंगातील साडीचे चिंध्या चिंध्या झालेले हिरवे तुकडे भेदरलेल्या रुख्माईच्या मांडीवर येऊन पडले, तिने त्या तुकडयांकडे पाहिले अन दातखीळ बसावी तशी गप झाली. मथुरेच्या कन्हण्याचा आवाज येऊ लागला तशी त्या तुकडयांनी ती कपाळ बडवून घेऊ लागली. तिच्या हातापायाला आकडी आली, एक आर्त किंकाळी साऱ्या रानात घुमली आणि झटक्यात रुख्माई जाग्यावर थंड झाली. तिच्या मुठी वळलेल्या हातात ते हिरव्या रंगाच्या चिंध्या कसनुशाच दिसत होत्या...

समीर गायकवाड यांचे याआधीचे ब्लॉग :

रेड लाईट डायरीज - शांतव्वा....

रेड लाईट डायरीज – ‘धाड’!

गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध)

गणेशोत्सवातल्या आम्ही… (पूर्वार्ध)

उतराई ऋणाची…

स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव…

गीता दत्त – शापित स्वरागिनी

Blog शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV