भारतीय महिला क्रिकेट : दर्जात्मक सुधारणांची गरज

Siddhesh Kanse’s blog on Women Cricket in India

फोटो : बीसीसीआय

पूर्वी मुली क्रिकेटची बॅट घेऊन मैदानात खेळताना दिसल्या की बघ्यांसाठी मोठा चर्चेचा विषय व्हायचा. क्रिकेट हा केवळ पुरूषी खेळ अशी सर्वसाधारण धारणा. परंतु आजच्या घडीला मुलीही क्रिकेटकडे करीयर म्हणून पाहू लागल्या आहेत. क्रिकेटच्या नेट्समध्ये आता सर्रास मुलांसोबत मुलीही प्रॅक्टीस करताना दिसतायत. याचं मुख्य कारण वाढतं क्रिकेट, नुकत्याच झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेतील भारतीय महिलांची दैदिप्यमान कामगिरी आणि महिला क्रिकेटला आज मिळत असलेल ग्लॅमर. परंतु हे ग्लॅमर टिकवून ठेवायचं असेल तर भारतीय महिला क्रिकेटचा दर्जा सुधारण्याची आज गरज आहे.

मिताली राजच्या वुमेन्स ब्रिगेडनं यावर्षीच्या महिला विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत दुसऱ्यांदा प्रवेश केला. 2005 च्या विश्वचषकानंतर पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्याची संधी भारतापुढं चालून आली होती. पण दुर्दैवानं याहीवेळी भारतीय महिलांना उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं. खरतर या स्पर्धेत भारताची कामगिरी उल्लेखनिय होती. सुरूवातीचे चारही सामने जिंकून महिला ब्रिगेडने आपला दबदबा निर्माण केला होता. त्यानंतर न्यूझीलंडला हरवून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात हरमनप्रीत कौरच्या वादळी खेळीनं भारतानं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. यावेळी सर्व भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या कारण अंतिम स्पर्धेत आव्हान होत ते इंग्लंडचं आणि इंग्लंडला सलामीच्याच सामन्यात टीम इंडियानं नमवलं होतं. पण या निर्णायक सामन्यात मोक्याच्या क्षणी भारतीय महिला फलंदाजांनी हाराकीरी केली आणि भारताचं पहिल्या विश्वविजेतेपदाचं स्वप्न केवऴ 9 धावांनी दूर राहिलं.

अंतिम सामन्यात भारतीय महिलांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली असली तरी 2005 च्या तुलनेत यावर्षीच्या महिला विश्वचषक स्पर्धेन भारतात महिला क्रिकेटला एक नव वलय मिळवून दिलं. उपविजेत्या भारतीय संघावर बक्षिसांची खैरात करण्यात आली. सर्व खेळाडूंना वेगळी ओळख मिळाली. एकूणच या विश्वचषकानंतर भारतीय महिला क्रिकेटमध्ये सकारात्मक वारं वाहू लागल. एका अर्थानं भारतातील महिला क्रिकेटच्या दृष्टीनं ही खूप मोठी गोष्ट आहे पण या विश्वचषकाच्या अनुषंगानं तुलनात्मकदृष्ट्या विचार करता विश्वचषक विजेत्या इंग्लंड तसेच ऑस्ट्रेलितील महिला क्रिकेट आणि भारतीय महिला क्रिकेटमध्ये फार मोठी विषमता दिसून येते.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधील महिला क्रिकेट अतिशय वरच्या दर्जाचं आहे. याचीच परिणिती म्हणून 11वन डे विश्वचषक स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाने तब्बल 6 वेळा, इंग्लंडने 4 वेळा आणि न्यूझीलंडने एकदा विश्वविजेतेपदावर नाव कोरलय. टी-20 तही ऑस्ट्रेलियाने 5 पैकी 3 वेळा विश्वचषक उंचावलाय तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी एकदा विजेतेपद मिळवलय. यात भारताची पाटी मात्र अद्यापही कोरीच आहे. या आकडेवारीवरून महिला क्रिकेट विश्वात इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचीच मक्तेदारी आहे हे सिद्ध होत. फक्त समाधान एवढच की महिला वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट्स हे दोन्ही विक्रम भारतीय महिलांच्या नावावर आहेत. भारताची कर्णधार मिताली राजनं 186 सामन्यांमध्ये 6190 धावा कुटल्या आहेत. तर वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीनं 164 सामन्यात 195 फलंदाजांना माघारी धाडलंय.

खरंतर 2008 साली भारतात इंडियन प्रिमियर लीग सुरू झाली. अनेक स्थानिक क्रिकेटपटूंना या स्पर्धेनं व्यासपीठ मिळवून दिलं. गेली 10 वर्ष ही स्पर्धा यशस्वीपणे अखंड सुरू आहे. इतकच नव्हे तर इतर स्पर्धांपेक्षा आयपीएलनं लोकप्रियतेचा उच्चांक गाठलाय. या आयपीएलच्याच धर्तीवर बीसीसीआयनं महिला क्रिकेटपटूंसाठीही अशा प्रकारच्या स्पर्धेच आयोजन करणं अपेक्षित होत पण अजून तरी त्यादृष्टीनं कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत. याउलट ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये आयपीएलचं अनुकरण करून बीग बॅश टी-20, नॅटवेस्ट टी-20 स्पर्धा सुरू करण्यात आल्या. ऑस्ट्रेलियात 2011 साली पहिली बीग बॅश लीग टी-20 स्पर्धा खेळवण्यात आली. त्यानंतर 2014 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियानं महिलांसाठी टी-20 लीगची घोषणा केली. आणि 2015 ला पहिली वुमन्स बीग बॅश टी-20 लीग संपन्न झाली. इंग्लंडमध्येही 2014 ला नॅटवेस्ट टी-20 लीगचं बीगुल वाजल आणि जून 2015 ला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं वुमन्स सुपर क्रिकेट लीग सुरू केली. भारतात आयपीएला आज 10 वर्ष झालीत तरी बीसीसीआयनं वुमन्स आयपीएलची घोषणा अद्यापही केलेली नाही. पण भारतीय महिला खेळाडूंना देशाबाहेरील व्यावसाईक स्पर्धांमध्ये खेळण्याची मुभा मात्र बीसीसीआयनं दिली आहे. त्यामुळे 2016 च्या बीग बॅश लीगमध्ये भारताच्या हरमनप्रित कौरनं सिडनी थंडरचं तर स्मृती मानधनानं ब्रिस्बेन हीट संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

इंग्लंडधील विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय महिला क्रिकेटला सुगीचे दिवस आले आहेत हे जरी खरं असलं तरी स्थानिक पातळीवर मुलींसाठी क्रिकेट क्लब स्थापन करणं, अव्वल दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणं तसच देशभरात महिला क्रिकेटला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धांच्या आयोजनाला प्राधान्य देणं आज गरजेच आहे.  वुमन्स आयपीएलसारख्या स्पर्धांना चालना दिल्यास तळागाळातील मुलींना क्रिकेटच्या या प्रवाहात येता येईल. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मोठमोठ्या खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली खेळता येईल. त्यामुळे या स्पर्धांच्या माध्यमातून अशा खेळांडूंच्या खेळाचा स्तर नक्कीच उंचावला जाईल. आणि त्यातूनच भविष्यातील मिताली राज, झुलन गोस्वामी भारतीय महिला क्रिकेटला मिळतील.

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Siddhesh Kanse’s blog on Women Cricket in India
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: