'या' 12 जागांमुळे काँग्रेस सत्तेपासून दूर

गुजरातमध्ये 12 जागांवर 3 हजारहून कमी मतांनी भाजपने विजय मिळवला. या जागांवर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे इथे काँग्रेसने आणखी थोडी मेहनत घेतली असती, तर त्या जागा पदरात पाडून घेता आल्या असत्या आणि सत्तेच्या जवळ जाता आलं असतं.

'या' 12 जागांमुळे काँग्रेस सत्तेपासून दूर

गांधीनगर : गुजरातमध्ये भाजपच्या 22 वर्षांच्या सत्तेला काँग्रेसने तोडीस तोड आव्हान दिलं. 115 जागांवरुन भाजपला दोन आकडी जागांवर म्हणजे 99 जागांवर खेचण्यात काँग्रेसला यश आलं. मात्र सत्तेची चावी काही हातात घेता आली नाही. काँग्रेसच्या जागांची गाडी 80 वरच थांबली. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 12 जागा कमी पडल्या. मात्र, गुजरातमध्ये 12 जागांवर 3 हजारहून कमी मतांनी भाजपने विजय मिळवला. या जागांवर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे इथे काँग्रेसने आणखी थोडी मेहनत घेतली असती, तर त्या जागा पदरात पाडून घेता आल्या असत्या आणि सत्ता काबीज करता आली असती.

कोणत्या 12 जागांवर काँग्रेसचा निसटता पराभव झाला?

1. गोध्रा -  गोध्रा हत्याकांडानंतर प्रकाशझोतात आलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचा अगदी निसटता पराभव झाला आहे. केवळ 258 मतांनी या जागेवर भाजपच्या सी. के. राऊलजी यांचा काँग्रेसच्या राजेंद्रसिंह परमार यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, सी. के. राऊलजी हे आधी काँग्रेसमध्येच होते. मात्र, या विधानसभेआधी ते भाजपच्या गोटात सामिल झाले. राऊलजी यांना रोखण्यात काँग्रेसला यश आले असते, तर गोध्राची जागा काँग्रेसच्या खात्यात असती.

2. धोलका - या जागेवर भाजपच्या भूपेंद्रसिंह मनुभा चुडासमा यांनी काँग्रेसच्या अश्विनभाई राठोड यांचा पराभव केला. मात्र भाजपच्या विजयी उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा केवळ 327 जास्त मतं जास्त मिळवली आहेत.

3. बोटाद - भाजपचे सौरभ पटेल यांनी या जागेवर बाजी मारली. काँग्रेसच्या धीरजलाल कठथीया यांचा पराभव केला आहे. दोघांच्या मतांमधील फरक केवळ 906 एवढा आहे. या मतदारसंघातून एकूण 17 अपक्ष उमेदवार उभे राहिले होते. त्यांचा फटका काँग्रेसला बसला.

4. विजापूर - पाटीदार समाजाचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. विजापुरात भाजपचे रमणभाई पटेल यांनी काँग्रेसच्या नाथाभाई पटेल यांचा 1164 मतांनी पराभव केला.

5. हिमतनगर - भाजपच्या राजेंद्रसिंह चावडा यांनी काँग्रेसच्या कमलेशभाई पटेल यांचा 1712 मतांनी पराभव केला. इथे काँग्रेसने मेहनत घेतली असता, विजय मिळवता आला असता.

6. गारियाधार - केशुभाई नाकराणी या भाजप उमेदवाराने काँग्रेसच्या परेशभाई खेनी यांचा केवळ 1876 मतांनी पराभव केला.

7. उमरेठ - भाजपच्या गोविंदभाई परमार यांनी काँग्रेसच्या कपीलाबेन चावडा यांचा 1883 मतांनी पराभव केला. इथेही काँग्रेसने फार लक्ष न दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे जागा हातून निसटली.

8. राजकोट ग्रामीण - या जागेवर केवळ 2179 मतांनी भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. भाजपच्या लाखाभाई सागठीयांना 92 हजार 114, तर काँग्रेसच्या वश्रामभाई सागठीयांना 89 हजार 935 मतं मिळाली.

9. खंभात - भाजपच्या महेशकुमार रावल यांनी काँग्रेसच्या खुशमनभाई पटेल यांना 2 हजार 318 मतांनी पराभूत केले.

10. वागरा - 2 हजार 628 मतांनी भाजपच्या अरुणसिंह रणा यांनी काँग्रेसच्या सुलेमानभाई पटेल यांचा पराभव केला.

11. फतेहपुरा - भाजपच्या रमेशभाई कटारा यांनी काँग्रेसच्या रघूभाई मच्छर यांचा 2 हजार 711 मतांनी पराभव केला.

12. विसनगर - ऋषिकेश पटेल हे भाजपचे उमेदवार 2 हजार 869 मतांनी विजयी झाले. इथे काँग्रेसच्या महेंद्रकुमार पटेल पराभूत झाले.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 12 seats where congress lost with less margin
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV