8 महिन्यांच्या चिमुरडीवरील बलात्काराची सुप्रीम कोर्टाकडून दखल

'सध्या बाळाची प्रकृती हे आमचं प्राधान्य आहे' असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.

8 महिन्यांच्या चिमुरडीवरील बलात्काराची सुप्रीम कोर्टाकडून दखल

नवी दिल्ली : दिल्लीत आठ महिन्यांच्या चिमुरडीवर तिच्या चुलतभावाने केलेल्या बलात्कार प्रकरणाची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. पीडितेला शक्य तितके चांगले उपचार देण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत.

'एम्स'च्या दोन डॉक्टरांनी तातडीने विशेष रुग्णवाहिकेने उत्तर दिल्लीत चिमुरडी दाखल असलेलं रुग्णालय गाठावं आणि तिची तपासणी करावी. पीडित बाळाला 'एम्स'मध्ये आणणं शक्य असल्यास, डॉक्टरांनी त्यांच्या देखरेखीत विशेष रुग्णवाहिकेनेच आणावं' असं सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितलं. गुरुवारपर्यंत वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

पीडित बाळावरील उपचार आणि कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याबाबत एका वकिलाने याचिका दाखल केली आहे. 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 'सध्या बाळाची प्रकृती हे आमचं प्राधान्य आहे' असं यावर कोर्टाने स्पष्ट केलं.

दिल्लीत चुलत भावाकडून 8 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार


प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने आजच सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. याचिका दाखल करणाऱ्या वकिलाचा चिमुरडीशी काहीही संबंध नाही. विशेष म्हणजे, तिच्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, याचीही त्यांना कल्पना नव्हती.

काय आहे प्रकरण?

दिल्लीच्या शकूरबस्ती परिसरात रविवारी आठ महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाला. पोलिसांनी चिमुकलीच्या 28 वर्षांच्या चुलत भावाला सोमवारी रात्री उशिरा अटक केली. आरोपीविरोधात आयपीसीच्या कलमांअंतर्गत आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत सुभाष पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे.

चिमुकलीची आई रविवारी रात्री कामावरुन घरी परतल्यानंतर तिला या घटनेबाबत समजलं. जखमी अवस्थेत मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात असून ती व्हेटिंलेटरवर आहे. मुलीचं कुटुंब शकूरपूर वस्तीत राहतं. वडील मजुरी करतात तर आई इतरांच्या घरात धुण्या-भांड्यांचं काम करते.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीची आई रविवारी सकाळी तिला नातेवाईकांकडे ठेवून कामाला गेली. काही वेळाने मुलीचे वडीलही कामासाठी निघाले. संध्याकाळी आई कामावरुन परतली असता, मुलगी रडत होती, आणि तिच्या गुप्तांगांमधून रक्तस्राव सुरु होता.

तिच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने आरोपी तिला वरच्या मजल्यावर घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केले. आरोपीने चिमुकलीचं तोंड दाबून ठेवलं होतं, जेणेकरुन तिच्या रडण्याचा-ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये, असं पोलिसांनी सांगितलं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 8 month old baby rape case : Supreme Court sends 2 AIIMS doctor team to supervise latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV