या एका केसमुळे न्यायमूर्तींच्या असंतोषाचा कडेलोट झाला

या सगळ्याची ठिणगी उडण्यास कारण ठरलं ते सीबीआयचे स्पेशल जज बी एच लोया यांच्या मृत्यू प्रकरणाचा खटला.

या एका केसमुळे न्यायमूर्तींच्या असंतोषाचा कडेलोट झाला

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टातल्या न्यायमूर्तींच्या जाहीर पत्रकार परिषदेने आज संपूर्ण देशाला एक मोठा धक्का दिला. गेल्या दोन महिन्यांमधे खटल्यांच्या वाटपावरुन असंतोष होता हे खरं असलं तरी या सगळ्याची ठिणगी उडण्यास कारण ठरलं ते सीबीआयचे स्पेशल जज बी एच लोया यांच्या मृत्यू प्रकरणाचा खटला.

पत्रकार परिषदेतही जस्टिस गोगोई यांनी पत्रकारांना तुमचा आजचा मुद्दा हा लोया यांच्या प्रकरणाशी निगडीत आहे का, असं विचारल्यावर त्यांनी होय असं सांगत होकारार्थी मान डोलावली होती. मुळात या प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टात असं काय झालं की प्रकरण इतकं टोकाला जावं याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

काल महाराष्ट्रातले एकच पत्रकार बंधुराज लोणे यांनी त्यांच्या वकील आश्विनी शिनॉय यांच्या वतीने लोयांच्या मृत्यूप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी करत याचिका दाखल केलेली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात मेन्शन झाल्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या पीठाने या प्रकरणावर सुनावणी करण्यास होकार दिला. त्यावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीही सुरु झाली.

त्यावर महाराष्ट्र सरकारला उत्तर देण्याबाबत नोटीसही बजावण्यात आलीय. पण इतक्या महत्वाचं हे प्रकरण सरन्यायाधीशांनी सोपवलं ते तुलनेने ज्युनियर पीठाकडे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती मोहन एम शांतनागौदार यांच्या पीठाकडे हे प्रकरण दिल्याचं आज सकाळी उघड झालं.

त्यानंतर वरिष्ठता डावलण्यात आलेल्या या चारही न्यायमूर्तींनी सरन्यायाधीश दीपक मिश्रांची सकाळी भेट घेतली. इतक्या महत्वाचं प्रकरण हे ज्युनियर पीठाकडे जाणं ठीक नसल्याचं सांगत त्यांनी नाराजी उघड केली. सरन्यायाधीशांच्या प्रतिसादाने समाधान न झाल्याने अखेर त्यांनी मीडियासमोर जाण्याचा मार्ग स्वीकारला.

लोयांच्या मृत्यूप्रकरणाबद्दलचं हे प्रकरण इतक्या ज्युनियर पीठाकडे सोपवल्याबद्दल सुप्रीम कोर्टातल्या अनेक वकीलांनीही आश्चर्य व्यक्त केलं. इतक्या संख्येने ज्येष्ठ न्यायमूर्तींना वगळून या ज्युनियर नावांवर शिक्कामोर्तब व्हावं, या गोष्टी पद्धतीला धरुन नसल्याचंही अनेकांनी सांगितलं. खटल्यांचं वाटप करतानाचा हा प्रकार पहिल्यांदाच होत नव्हता. याच्या आधीही गेल्या दोन महिन्यांपासून असे प्रकार होतच होते.

चल्लमेश्वर या वरिष्ठतेने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यायमूर्तींनी ओडिशातल्या मेडिकल कॉलेजमधल्या केसमध्ये ( ज्यात खालच्या कोर्टातल्या न्यायाधीशांनीच पैसे खाल्ल्याचा आरोप होता.) त्यात पाच वरिष्ठ न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशीचा आदेश दिला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी सरन्यायाधीशांनी आपल्या मर्जीतल्या पाच न्यायमूर्तींची नेमणूक करुन हा आदेश फिरवला होता.

अशा पद्धतीने खटल्यांचं वाटप करताना सरन्यायाधीश ज्येष्ठ न्यायमूर्तींना डावलत महत्वाच्या केसेस आपल्या मर्जीतल्या न्यायमूर्तींना देत असल्याचा आरोप आहे. आज जज लोया यांच्या मृत्यूप्रकरणाने या सगळ्या असंतोषाचा कडेलोट झाला आणि न्यायमूर्तींनी जाहीर पत्रकार परिषदेचा मार्ग स्वीकारला.

संबंधित बातम्या :

सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता

सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?

सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील

न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: a case which was reason for
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV