विक्री घटली, स्वाभिमानी संजय कौल यांनी अॅपल इंडियाचं पद सोडलं!

अपेक्षित व्यवसाय न झाल्याने संजय कौल यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे.

विक्री घटली, स्वाभिमानी संजय कौल यांनी अॅपल इंडियाचं पद सोडलं!

नवी दिल्ली: भारतीय टेलिकॉम जगतात मोठी घडामोड घडली आहे. अॅपल इंडियाचे सेल्स हेड अर्थात विक्री प्रमुख संजय कौल यांनी राजीनामा दिला आहे. संजय कौल यांनी तात्काळ पद सोडलं. अपेक्षित व्यवसाय न झाल्याने संजय कौल यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे.

नुकतंच अॅपल इंडियाने 2016-17 मध्ये कंपनीची वाढ गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत बरीच घटल्याचं म्हटलं होतं. कंपनीच्या या वक्तव्यानंतर लगेचच कौल यांनी राजीनामा दिला आहे.

मायकल कुलॉम यांची नियुक्ती

दरम्यान, अॅपलने मायकल कुलॉम यांना संजय कौल यांच्या जागी नियुक्त केलं आहे. फ्रेंच नागरिक असलेले मायकल कुलॉम हे सध्या अॅपलचे दक्षिण आशिया विभागाचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.

मायकल कुलॉम हे या कंपनीत गेल्या 15 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी दक्षिण आशियामध्ये अॅपलची मोठी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत, कंपनीचा भारतातील व्यवसाय वाढवण्याचा मानस अॅपलचा असेल.

आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये अॅपल इंडियाची विक्री 1.8 अब्ज डॉलर म्हणजेच 11 हजार 600 कोटी रुपयांवर पोहोचली. खरंतर ही 17 टक्के वाढ आहे. मात्र कंपनीला सरासरी 40 टक्के वाढ अपेक्षित होती, मात्र ती साध्य होऊ शकलं नाही.

अॅपलला भारतात iPhone 8 आणि iPhone 8 Plus यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तो मिळाला नाही. तसंच नोटाबंदीमुळेही विक्रीवर परिणाम झाला. त्यातच सरकारने आयात शुल्क वाढवलं. अशा विविध कारणांमुळे कंपनीला अपेक्षित व्यवसायाचा टप्पा गाठता आला  नाही, त्यामुळे कंपनीने भारतातील व्यवसाय घटल्याचं म्हटलं होतं.

भारतातच आयफोन बनवावे लागणार

दरम्यान, सरकारने परदेशातून आयात होणाऱ्या मोबाईल्स किंवा गॅझेट्सवरील सीमा शुल्क 10 ते 15 टक्क्यांनी वाढवलं आहे. तज्ज्ञांच्या मते, सरकारच्या या निर्णयामुळे अॅपलला भारतातच स्मार्टफोन बनवावे लागतील.

अॅपलला भारतात सॅमसंग, शाओमी यासह अन्य कंपन्यांशी स्पर्धा करायची असेल, तर त्यांना भारतातच मोबाईल बनवण्याशिवाय पर्याय नसेल.

सध्या अॅपल 88 टक्के स्मार्टफोन्स हे आयात करुन भारतात विकतात. भारतात केवळ आयफोन SE ची निर्मिती बंगळुरुतील प्लांटमध्ये केली जाते.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Apple’s India Head of Sales Sanjay Kaul resign
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV