अर्जुन खोतकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, आमदारकी शाबूत

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय दिला होता, त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

अर्जुन खोतकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, आमदारकी शाबूत

नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अर्जुन खोतकर यांचं मंत्रिपद आणि आमदारकी तूर्तास शाबूत राहिलं आहे. शिवाय, खोतकरांचा मतदानाचा अधिकारही अबाधित राहिला आहे. कारण मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय दिला होता, त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

प्रकरण काय आहे?

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांचा उमेदवारी अर्ज विहित वेळेनंतर भरण्यात आला, असा आक्षेप काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी घेतला होता. त्यावरील सुनावणीवेळी औरंगाबाद खंडपीठाने खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय दिला होता. मात्र, सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. आता सुप्रीम कोर्टाने औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती देत खोतकरांना दिलासा दिला आहे.

अर्जुन खोतकर हे 2014 मध्ये जालना विधानसभा मतदारसंघातून केवळ 286 मतांनी विजयी झाले होते.

कोण आहेत अर्जुन खोतकर?

- अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे नेते असून, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून आमदार आहेत. जालना मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात.
- 1990, 1995, 2004 आणि 2014 असे एकूण चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. 1999 साली ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते.
- सध्या खोतकर हे महाराष्ट्र सरकारमध्ये वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास या मंत्रालयांचे राज्यमंत्री आहेत.
-आपल्या आक्रमक आणि मुद्देसूद भाषणासाठी अर्जुन खोतकर ओळखले जातात. शिवसेनेची आक्रमकता त्यांच्या वक्तृत्त्वशैलीतून ठळकपणे दिसून येते.

2014 ची जालना विधानसभेची निवडणूक

जालना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून अर्जुन खोतकर, काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल, भाजपकडून अरविंद चव्हाण, बसपाकडून अब्दुल रशीद अशा महत्त्वाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली.

शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 296 मतांनी विजय मिळवला. त्यांना 45078 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला होता. गोरंट्याल यांना 44782 मतं मिळाली होती.

भाजपचे अरविंद चव्हाण 37,591 मते मिळाली, तर बसपा उमेदवार अब्दुल रशीद यांनी 36,350 मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले.

संबंधित बातम्या :


अर्जुन खोतकरांच्या आमदारकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी


तांत्रिक मुद्द्यावरुन आमदारकी रद्द: अर्जुन खोतकर


राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Arjun Khotkar gets big relief from Supreme Court
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV