बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने राजकारण तापलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदार संघातील बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाने राजकारण चांगलंच तापलं आहे.

बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने राजकारण तापलं

अलाहबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदार संघातील बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाने राजकारण चांगलंच तापलं आहे. कारण, याप्रकरणी आता विरोधकांनी एकत्र येऊन उत्तर प्रदेशमधील योगी सरकारसह मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे.

आज अलाहाबादमध्ये भाजप खासदार श्यामचरण गुप्ता यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तसेच योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळून जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चाकडून सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. विद्यापीठ कॅम्पसमधील मोर्चात जवळपास एक हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

का सुरु आहे आंदोलन?

बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या एका मुलीसोबत गुरुवार 21 सप्टेंबर रोजी छेडछाडीची घटना घडली. या छेडछाडीविरोधात बीएचयूमधील विद्यार्थीनींनी तीन दिवसांपासून आंदोलन सुरु होतं. आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींचा आरोप आहे की, त्यांच्या वसतीगृहाबाहेर काही मुलं उभे राहून, वस्तीगृहाच्या खिडक्यांवर दगडफेक करतात. तसेच दगडफेकीतील काही दगडांसोबत पत्रंही पाठवतात.

शिवाय,वसतीगृहातील विद्यार्थिनींकडे पाहून अश्लिल चाळेही या मुलांकडून केले जातात. याला विरोध केल्यास विद्यार्थिनींसोबत दमदाटी केली जाते.

BHU-protest

शनिवारी रात्री नेमकं काय झालं?

या विरोधात वसतीगृहातील विद्यार्थीनींनी एकत्रित येऊन, शनिवारी रात्री 11 वाजता कुलगुरुंच्या निवासस्थानाबाहेर धरणं आंदोलन सुरु केलं. पण आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींवर पोलिसांनीच लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये काही पत्रकार देखील जखमी झाले. तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असल्याचं बोललं जात आहे.

पोलिसांच्या लाठीचार्जमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये दगडफेक आणि जाळपोळ सुरु केली. यात तिथं उभ्या केलेल्या एका दुचाकीला पेटवण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केल्याने, विद्यापीठ प्रशासनाने रात्री 3.30 वाजता पोलीस महानिरिक्षक, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची कुलगुरु गिरीश चंद्र त्रिपाठी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली. यानंतर या घटनेचा सखोल तपास करुन, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं.

आंदोलनात बाहेरच्या व्यक्तींचा सहभाग, कुलगुरुंचा आरोप

या संपूर्ण प्रकरणावर एबीपी न्यूजशी बोलताना, कुलगुरु गिरीश त्रिपाठी यांनी सांगितलं की, “या आंदोलनात बाहेरच्या काही व्यक्ती सहभागी असून, ते विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. या आंदोलनात विद्यापीठातील विद्यार्थ्यांपेक्षा बाहेरच्या व्यक्ती सर्वात जास्त संख्येनं आहेत.” तसेच 21 सप्टेंबर रोजी एका विद्यार्थिनीशी छेडछाडीची तक्रार आपल्याकडे आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

विद्यापीठात 1500 पोलीस तैनात

दरम्यान, बनारस हिंदू विद्यापीठात सध्या 1500 च्या आसपास पोलिसांसह जवान तैनात आहेत. तर 25 सप्टेंबर पर्यंत विद्यापीठाशी संलग्नित क़ॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनीही या प्रकरणाची दखल घेऊन, याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून मागवली आहे.

संबंधित बातम्या

बीएचयूमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV