पीएनबी घोटाळा : अकरा हजार कोटी परत कसे मिळणार?

या सर्व प्रकारानंतर आता हा गेलेला पैसा परत मिळणार कसा, हा मोठा प्रश्न आहे.

पीएनबी घोटाळा : अकरा हजार कोटी परत कसे मिळणार?

मुंबई : बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक मानल्या जात असलेल्या घोटाळ्यात पंजाब नॅशनल बँक अडकली आहे. एक हजार 771 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 11 हजार 360 कोटींचा हा घोटाळा असल्याचं समोर आलं आहे. या सर्व प्रकारानंतर आता हा गेलेला पैसा परत मिळणार कसा, हा मोठा प्रश्न आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी तपास यंत्रणा आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पैसे दिले नाही, तर हा पैसा बुडेल, असं बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे बैठकीत सांगितलं. म्हणजे नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून वसुली झाली नाही, तर सरकारी बँकेतील देशातील जनतेचा हा पैसा बुडाल्यात जमा आहे.

नीरव मोदीकडून अकरा हजार कोटींची वसुली होईल?

बँकेला झालेल्या नुकसानीची भरपाई कशी केली जाईल, याबाबत एबीपी न्यूजने बँकिंग सचिव राजीव कुमार यांच्याशी बातचीत केली. नीरव मोदीकडे एवढी संपत्ती आहे, की पैशांची वसुली करण्यास काहीही अडचण येणार नाही, असा दावा राजीव कुमार यांनी केला.

संसदीय स्थायी समितीच्या बैठकीतही राजीव कुमार यांनी हेच उत्तर दिलं. बैठकीतील खासदारांनी हा प्रश्न विचारला होता. एकीकडे राजीव कुमार यांचं उत्तर देणं सुरु होतं, तर दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने नीरव मोदीच्या देशभरातील ज्वेलरी शॉपवर छापेमारी सुरु केली आहे. 5100 कोटी रुपयांचे हिरे आणि सोनंही जप्त करण्यात आलं आहे.

परदेशात पळालेल्या आरोपींना भारतात आणता येईल?

घोटाळ्यात सहभागी असलेले दोन अधिकारी सोडले तर उर्वरित सर्व जण परदेशात पसार झाले आहेत. या घोटाळ्यातील सर्वात कमजोर बाजू म्हणजे या घोटाळ्यातील आरोपीही इतर घोटाळ्यातील आरोपींप्रमाणेच मोठे उद्योगपती आहेत. हे आरोपी स्वतःहून भारतात परतले नाही, तर उद्योगपती विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांच्याप्रमाणेच त्यांना परत आणण्यासाठी भारताला मोठी कायदेशीर लढाई लढावी लागेल.

नीरव मोदी कोण आहे?

नीरव मोदी भारतातील मोठे हिरे व्यापारी आहेत. त्यांना भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. 48 वर्षीय नीरव मोदी फोर्ब्जच्या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.

नीरव मोदी यांची फाईव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे. त्यांनी 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत.

नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. नीरव मोदींचे वडीलही हिरे व्यापारी आहेत. नीरव मोदींनी सुरुवातीचं शिक्षण अमेरिकेत घेतलं. अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर व्यवसाय सुरु केला.

संबंधित बातम्या :

नीरव मोदीच्या संपत्तीवर ईडीची टाच, 5 हजार कोटींचे हिरे जप्त


PNB घोटाळा : दोषी कर्मचारी निलंबित, एमडी मेहतांची माहिती


PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय?

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: can PNB Recover 11 crore rupees of scam from cheaters
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV