चंद्राबाबूंचा उद्धव ठाकरेंना फोन, एनडीए सोडण्यावर चर्चा?

या दोन्ही नेत्यांमध्ये एनडीएची साथ सोडण्याबाबत काही महत्त्वाची चर्चा झाल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

चंद्राबाबूंचा उद्धव ठाकरेंना फोन, एनडीए सोडण्यावर चर्चा?

अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलं आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये एनडीएची साथ सोडण्याबाबत काही महत्त्वाची चर्चा झाल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना चंद्राबाबू नायडू यांना एनडीएत जितकं महत्त्व दिलं जात होतं, तेवढं महत्त्व दिलं जात नसल्याने ते सध्या नाराज आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एनडीची साथ सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच, या अर्थसंकल्पातही आंध्र प्रदेशकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही, अशी त्यांची भावना आहे.

उद्धव ठाकरेंनीही काही दिवसांपूर्वी यापुढे स्वबळावर निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं होतं. शिवाय राज्यात असो किंवा केंद्रात, प्रत्येक मुद्द्यावर भाजप, विशेषत: मोदी आणि अमित शाहांना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून लक्ष्य केलं जातं.

उद्धव ठाकरेंची ही नाराजी ओळखूनच चंद्राबाबूंनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपवर नाराज असलेले हे दोन्ही पक्ष एनडीएची साथ सोडणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीडीपी आणि चंद्राबाबूंचं महत्त्व

चंद्राबाबू नायडू हे तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वात एनडीएच्या स्थापनेपासून टीडीपी एनडीएत आहे. 2014 साली त्यांनी भाजपसोबत निवडणूक लढवत विभाजीत आंध्र प्रदेशमध्ये एकहाती सत्ता मिळवली. ते 1994 ते 2004 असं सलग दहा वर्षे संयुक्त आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 2004 ते 2014 या काळात त्यांच्याकडे आंध्र प्रदेश विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी होती. 2014 साली सत्ता मिळवत ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

टीडीपी हा दक्षिण भारतातील महत्त्वाचा पक्ष आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत सध्या 175 पैकी 125 जागा टीडीपीकडे आहेत, तर भाजपच्या केवळ 4 जागा आहेत. विरोधी पक्षात असलेल्या वायएसआर काँग्रेसच्या 46 जागा आहेत. टीडीपीची एकहाती सत्ता असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये भाजपसाठी चंद्राबाबूंची नाराजी हा मोठा धक्का आहे. कारण, 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशच्या 25 लोकसभेच्या जागांपैकी 17 जागांवर टीडीपीने विजय मिळवला होता.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: chandrababu naidu calls up uddhav thackeray over dispute in NDA
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV