उत्तर प्रदेश मनपा निवडणुकीत भाजपचा विजय, काँग्रेस आणि सपाला दणका

उत्तर प्रदेशमधील महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. 16 पैकी एकूण 14 महापालिकांमध्ये भाजपाचा महापौर विराजमान होणार हे आता स्पष्ट झालं आहे.

उत्तर प्रदेश मनपा निवडणुकीत भाजपचा विजय, काँग्रेस आणि सपाला दणका

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. 16 पैकी एकूण 14 महापालिकांमध्ये भाजपाचा महापौर विराजमान होणार हे आता स्पष्ट झालं आहे. तर पैकी एका ठिकाणी बसपा, तर एके ठिकाणी समाजवादी समर्थित उमेदवाराचा विजय झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला असून, महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही. विशेष म्हणजे, राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघात काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे.

काँग्रेसची दयनीय अवस्था झालेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रभागातही भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 68 मधून अपक्ष उमेदवार नादिरा खातून यांनी भाजपच्या माया त्रिपाठींचा पराभव केला.

भाजपने कानपूर, झांसी, मेरठ, वाराणसी, लखनऊ, आग्रा, गोरखपूर-मुरादाबाद, अलीगढ आदी महापालिकांमध्ये आपला झेंडा फडकवला आहे. तर बरेलीमध्ये बसपा, आणि गाझीयाबादमध्ये समाजवादी पक्षाने समर्थन दिलेला अपक्ष उमेदवार महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाला आहे.

नगरसेवक निवडीमध्येही भाजपनेच बाजी मारली आहे. भाजपचे एकूण 552, काँग्रेसचे 96, समाजवादी पक्षाचे 186, बसपाचे 137, आणि अपक्ष 214 नगरसेवक निवडणून आले आहेत.

निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन, “जे लोक गुजरात विधानसभा निवडणुकीत मोठ-मोठ्या बाता मारत आहेत. त्यांना मनपा निवडणुकीत खातं देखील उघडता आलं नाही,” अशी टीका केली आहे.

उत्तर प्रदेशमधील भाजपच्या विजयामुळे गुजरातमध्ये काँग्रेसच्या अडचणी वाढल्या असल्याचे मत सर्वच राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार अरविंद मोहन यांनी उत्तर प्रदेशमधील मनपा निवडणूक निकालाचे विश्लेषण करताना, “अमेठीमधील काँग्रेसचा पराभव अतिशय दुर्दैवी आहे,” असं म्हटलं आहे. तसेच “या विजयापूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसचं पारडं जड वाटत होतं. पण निवडणूक निकालानंतर काँग्रेसला पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांचा सामना करताना अडचणींचा सामना करावा लागेल,” असं म्हटलं आहे.

एबीपी न्यूजचे कार्यकारी संपादक राजकीशोर यांनी निकालाचं विश्लेषण करताना “मनपा निवडणूक निकालामुळे राहुल गांधींच्या काँग्रेस अध्यक्ष बनण्यात काहीही अडचण येणार नसल्याचं म्हटलं आहे. गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल,” असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

तर निवडणूक सेफॉलॉजिस्ट यशवंत देशमुख यांनीही अमेठीमधील काँग्रेसचा पराभव सर्वात मोठी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. कारण, अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण हाच बालेकिल्ला काँग्रेसच्या हातातून जाणं याची अपेक्षा स्वत: पक्ष नेतृत्वानेही केली नसेल असं म्हटलं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: election results of mayors and corp-orators in up mnc
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV