लहानपणी मीपण 'अॅडल्ट सिनेमा' पाहायचो : पर्रिकर

आम्ही फक्त चित्रपटच नाही पाहायचो, तर अॅडल्ट मूव्हीजही बघायचो, असं मिष्किल उत्तर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलं.

लहानपणी मीपण 'अॅडल्ट सिनेमा' पाहायचो : पर्रिकर

पणजी : लहानपणी मीसुद्धा चोरुन अॅडल्ट सिनेमे पाहायचो, अशी आठवण गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितली. मंगळवारी बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पर्रिकरांनी लहानग्यांना आपले अनुभव आणि किस्से सांगितले.

पर्रिकर काल शालेय विद्यार्थ्यांशी गप्पा मारत होते, त्यावेळी एका विद्यार्थ्याने 'तुम्ही तरुणपणी कोणते चित्रपट पाहायचात?' असा प्रश्न विचारला. 'आम्ही फक्त चित्रपटच नाही पाहायचो, तर अॅडल्ट मूव्हीजही बघायचो' असं मिष्किल उत्तर पर्रिकरांनी दिलं.

'तुम्ही आता ज्या गोष्टी उघडपणे टीव्हीवर पाहू शकता, त्या तेव्हा अॅडल्ट सिनेमामध्ये दाखवल्या जायच्या' असं पर्रिकर म्हणाले.

'त्यावेळी एक प्रसिद्ध अॅडल्ट सिनेमा होता. मी तेव्हा 18 वर्षांचा झालो होतो. मी आणि माझा भाऊ तो सिनेमा पाहायला थिएटरला गेलो. इंटरव्हलमध्ये दिवे लागले, तेव्हा आमचे शेजारीच माझ्या बाजूच्या सीटवर बसल्याचं माझ्या लक्षात आलं. हे शेजारी रोज माझ्या आईशी गप्पा मारायचे. त्यामुळे मी भावाला म्हटलं- आपण मेलोय.' असा किस्सा पर्रिकरांनी सांगितला.

'आम्ही चित्रपट अर्धवट सोडून लगेच सिनेमा हॉलमधून धूम ठोकली. जाता-जाताच घरी काय सांगायचं हे मी मनाशी ठरवलं' असं पुढे पर्रिकर खट्याळपणे म्हणाले.

'घरी जाऊन मी आईला साळसूदपणे म्हटलं, आम्ही एका सिनेमाला गेलो होतो. पण तो इतका वल्गर असेल माहित नव्हतं. त्यामुळे आम्ही मध्यंतरातच पळून आलो. बोलता-बोलता आपले शेजारी पण त्या सिनेमाला आले होते, असं मी बोलून गेलो. आणि गप्प बसलो' असं पर्रिकर सांगतात.

'दुसऱ्याच दिवशी आमचे शेजारी आईला भेटायला आले आणि म्हणाले, तुमचा मनोहर आणि अवधूत (भाऊ) अॅडल्ट मूव्हीला गेले होते. त्यावर आईनेच त्यांची फिरकी घेतली. आई म्हणाली, मला तर माहित आहे, ते गेले होते. पण तुम्ही तिथे कशाला गेला होतात?' पर्रिकरांनी हा किस्सा सांगताच हशा पिकला.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Goa CM Manohar Parrikar tells Students about watching Adult Movies in childhood on Children’s Day latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV