गुजरातमध्ये सत्ता राखली, हिमाचलमध्ये सत्ता बदलली!

दोन्ही राज्यात भाजपने कमळ फुलवलं आहे. गुजरातमध्ये भाजपने सत्ता टिकवली, तर हिमाचलमध्ये काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली.

गुजरातमध्ये सत्ता राखली, हिमाचलमध्ये सत्ता बदलली!

नवी दिल्ली: देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणूक आणि दुर्लक्षित असलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला आहे. दोन्ही राज्यात भाजपने कमळ फुलवलं आहे. गुजरातमध्ये भाजपने सत्ता टिकवली, तर हिमाचलमध्ये काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली.

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला, मात्र काँग्रेस त्यांचा चांगलाच घाम काढला. गुजरातमध्ये 182 पैकी दीडशे जागा जिंकू असं छातीठोकपणे सांगणाऱ्या, भाजप अध्यक्ष अमित शाह यांना शंभर जागांवरच विजय मिळवता आला.

गुजरातमध्ये भाजपला 99, काँग्रेस 77, राष्ट्रवादी काँग्रेस 1, अपक्ष 3 आणि इतर पक्षांनी 2 जागा मिळवल्या.

गुजरात विधानसभेतील पक्षीय बलाबल

  • भाजप - 99

  • काँग्रेस - 77

  • राष्ट्रवादी काँग्रेस - 1

  • भारतीय ट्रायबल पार्टी - 2

  • अपक्ष - 3


एकूण - 182

 मोदींच्या शुभेच्छा

गुजरात आणि हिमाचलमधल्या भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटरव्दारे शुभेच्छा दिल्या.

जीता विकास, जीता गुजरात। जय जय गरवी गुजरात! , असं ट्विट मोदींनी केलं.

https://twitter.com/narendramodi/status/942696151785992193

आम्ही पुरुन उरलो

दरम्यान, काँग्रेसनं जातीयवाद आणि वंशवादाचा प्रचार केला मात्र याला आम्ही पुरुन उरलो अशी प्रतिक्रिया भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिली.

काँग्रेसची टक्कर

गुजरातमध्ये भाजपचा विजय झाला असला तरी, राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने चांगली कामगिरी केल्यानं काँग्रेसमध्ये नवी उर्जा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय.

पराभव स्वीकारतो

गुजरात आणि हिमाचलमध्ये झालेला पराभव मी स्वीकारतो आणि दोन्ही राज्यातील सरकारचं अभिनंदन करतो, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या जनतेच्या आभार, असं राहुल गांधी म्हणाले.

https://twitter.com/OfficeOfRG/status/942709778836471808

हार्दिक-जिग्नेश-अल्पेश

पाटीदार आंदोलन उभं करणाऱ्या आणि त्याचं नेतृत्त्व करणाऱ्या 24 वर्षीय हार्दिक पटेलची प्रतिष्ठा पणाला लागली होती. हार्दिकने स्वत: निवडणूक लढवली नाही, पण काँग्रेसचं जोरदार समर्थन केलं. काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानंतर गुजरातची लढाई अतिशय रंजक बनली.

याशिवाय गुजरातमधून जगासमोर आलेला आणखी एक मोठा आणि महत्त्वाचा चेहरा म्हणजे जिग्नेश मेवाणी. जिग्नेश काँग्रेसमध्ये सामील झालेला नाही, पण यंदाची विधानसभा निवडणूक बनासकाठा जिल्ह्याच्या बडगाव मतदारसंघातून लढला आणि 18,150 मतांच्या फरकाने जिंकली.

अल्पेश ठाकोरने गुजरातमध्ये मागासवर्गीयांचं एक मोठं आंदोलन छेडलं. 39 वर्षीय अल्पेशने ओबीसीमध्ये पाटीदारांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध केला आणि ओबीसी एकता मंचाची स्थापना केली. अल्पेश सोबत आल्याने गुजरातमध्ये भाजप सरकारविरोधात ओबीसी-दलित राजकारण उभं करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी अल्पेश काँग्रेसमध्ये सामील झाला. त्याने काँग्रेसच्या तिकीटावर राधनपूरमधून विधानसभा निवडणूक जिंकली.

भाजपचा जल्लोष

गुजरातमध्ये भाजपने विजय संपादन केल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके फोडून, एकमेकांना मिठाई भरवून भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. काही ठिकाणी ढोल ताश्यांवर महिला कार्यकर्त्यांनी ठेकाही धरला. दिल्ली, वाराणसी, भोपाळ, शिमला, रायपूर, कानपूर, मुंबई अशा विविध भागात भाजपच्या विजयाचा उत्साह ओसंडून वाहत असलेला पाहायला मिळाला.

हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल

गुजरात निवडणुकीमुळे दुर्लक्षित असलेल्या हिमाचल प्रदेशात भाजपने काँग्रेसची सत्ता हिसकावली आहे.

68 जागांच्या हिमाचल प्रदेश विधानसभेत भाजपने 44 जागांवर विजय मिळवला. तर सत्ताधारी काँग्रेस 21 जागांवर अडखळली.

काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्याचं आव्हान होतं.  तर भाजप नेते प्रेम कुमार धुमल यांनी वीरभद्र सिंह यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती.

पक्षीय बलाबल

  • भाजप - 44

  • काँग्रेस - 21

  • इतर - 3


संबंधित बातम्या

गुजरात विधानसभा निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE

मोदींना आव्हान देणाऱ्या या तीन तरुण नेत्यांचं आता काय होणार?

गुजरातचा निकाल, कोण - काय म्हणालं?

हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम सिंह धूमल पराभूत

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Gujarat assembly elections 2017 results, Himachal Pradesh assembly elections 2017 results
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV