गुजरात निवडणूक 2017 : तारखा जाहीर, दोन टप्प्यात मतदान

Gujarat Elections Dates : गुजरातमध्ये एकूण 4 कोटी 33 लाख मतदार असून 50 हजार 128 केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. सर्व केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे.

गुजरात निवडणूक 2017 : तारखा जाहीर, दोन टप्प्यात मतदान

नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दोन टप्प्यात गुजरातच्या निवडणुका पार पडणार आहेत. 89 विधानसभा मतदारसंघात 9 डिसेंबर आणि 93 मतदारसंघात 14 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 18 डिसेंबर रोजी निकाल लागेल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन तारखांची घोषणा केली. गुजरातमध्ये या क्षणापासून आचारसंहिता लागू झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ए के ज्योती यांनी सांगितलं. 182 सदस्य संख्या असणाऱ्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 22 जानेवारीला संपणार आहे.

गुजरातमध्ये एकूण 4 कोटी 33 लाख मतदार असून 50 हजार 128 केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. त्यापैकी 102 पोलिंग बुथवर महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाईल. सर्व केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय मतदान केंद्रांवर व्हिडीओ रेकॉर्डिंगही होणार आहे.

तसंच गुजरातमध्ये प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत कमाल 28 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा निश्चित केल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.

तारखेवरुन वाद
यंदा गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांवरुन सातत्याने वाद सुरु झाला होता. निवडणूक आयोगाने यापूर्वी 12 ऑक्टोबरला हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मात्र त्यावेळी गुजरात निवडणुकीच्याही तारखा जाहीर होतील अशी अपेक्षा होती, मात्र ती झाली नाही.

हिमाचल प्रदेशमध्ये 9 नोव्हेंबरला मतदान आहे. तर प्रचंड विरोधानंतर निवडणूक आयोगाने गुजरात निवडणूक 18 डिसेंबरपूर्वीच पार पडेल, असं जाहीर केलं होतं.

पंतप्रधान, भाजपची प्रतिष्ठा पणाला
निवडणूक आयोगाने गुजरातच्या निवडणुका हिमाचल प्रदेशच्या निवडणूक कार्यक्रमासोबत जाहीर न केल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणांगणांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीही ताकदीने उतरल्याने भाजपसाठी ही निवडणूक आणखीनच प्रतिष्ठेची बनली आहे.

हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी 9 नोव्हेंबर 2017 रोजी मतदान होणार असून मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे.

गुजरातचं रण का महत्त्वाचं?
गुजरात निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. कारण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथे काँग्रेसने आव्हान दिलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी महिनाभरात तब्बल पाच वेळा गुजरात दौरा केला.

गुजरात निवडणुकीला 2019 च्या लोकसभेची सेमीफायनल मानलं जात आहे. मोदी लाट आहे की नाही हे या निवडणुकीतून समोर येणार आहे.

दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या निवडणुकीत जोर लावला आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा उभारी येण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.

गुजरात विधानसभेची 2012 ची स्थिती काय?
गुजरात विधानसभेसाठी 2012 मध्ये 182 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपने 115, काँग्रेस 61 आणि अन्य 6 जागा जिंकल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीत सर्व जागा भाजपला
लोकसभेसाठी 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपने सर्वच्या सर्व म्हणजे 26 जागा जिंकल्या होत्या.

निवडणूकपूर्व सर्व्हे
सत्ताधारी भाजपाविरुद्ध वारे वाहत असल्याने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र आज तक, इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाच्या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकारच सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या पोलमध्ये 182 सदस्य असलेल्या गुजरातच्या विधानसभेमध्ये भाजपला 115 ते 125 जागा तर काँग्रेसला केवळ 57 ते 65 जागा मिळतील, असं नमूद करण्यात आलं आहे.

गेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला सध्या नोटाबंदी आणि जीएसटीमुळे विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गुजरातची जनता कोणाला मत देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.


संबंधित बातम्या


गुजरात निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार


गुजरात सर्व्हे : हार्दिक पटेल काँग्रेससोबत, तरीही भाजप नंबर वन


सर्व्हे : मोदींच्या गुजरातचीच जीएसटी आणि नोटाबंदीवर नाराजी


हिमाचल सर्व्हे : भाजप बहुमताकडे, काँग्रेस सत्ता गमावणार?


हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर


हिमाचल सर्व्हे : भाजप बहुमताकडे, काँग्रेस सत्ता गमावणार?


मोदीजी, पैशांनी गुजरातचा आवाज विकत घेता येणार नाही : राहुल गांधी


नरेंद्र पटेलांपाठोपाठ निखिल सवानींचाही भाजपला राम राम


भाजपमध्ये येण्यासाठी मला एक कोटींची ऑफर : नरेंद्र पटेल

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Gujarat Elections Dates, Gujarat Elections Schedules, Gujarat News
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV