प्रेयसीला प्रियकराने पळवून नेलं, दीड वर्षांनी कारसह मृतदेह आढळले

अंबालामध्ये राष्ट्रीय महामार्गाजवळ खोदकाम करताना दलदलीत कार आढळली. त्यामध्ये अंजू आणि नरेश यांचे मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे

प्रेयसीला प्रियकराने पळवून नेलं, दीड वर्षांनी कारसह मृतदेह आढळले

चंदिगढ : कारमधून पळून गेलेल्या प्रियकर-प्रेयसीचा तब्बल दीड वर्षाने शोध लागला, मात्र दुर्दैवाने त्यावेळी दोघंही जिवंत नव्हते. हरियाणातील अंबालामध्ये राष्ट्रीय महामार्गाजवळ खोदकाम करताना दलदलीत एक कार आढळली असून यामध्ये नरेश आणि अंजू यांचे मृतदेह सापडले.

नरेश आणि अंजू या दोघांचीही वेगवेगळी लग्नं झाली होती. मात्र दोघांचेही प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे.  7 जुलै 2016 रोजी 46 वर्षांचा नरेश 38 वर्षांच्या अंजूला कारमध्ये बसवून पळवून घेऊन गेला. त्या दिवसापासून दोघं बेपत्ता होते. कुटुंबीयांनी शोध घेतला, पोलिसात तक्रारही नोंदवली. अखेर, दोघांनी आपला नवा संसार थाटला असेल, अशा विचाराने दोघांच्या कुटुंबीयांनी नाद सोडला.

शनिवारी अंबालामध्ये राष्ट्रीय महामार्गाजवळ खोदकाम करताना दलदलीत कार आढळली. त्यामध्ये अंजू आणि नरेश यांचे मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सोबतच अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत.

दोघांचे प्रेमसंबंध कुटुंबीयांना मान्य नसल्यामुळे काही गावकरी त्यांच्या मृत्यूचा संबंध ऑनर किलींगशी जोडत आहेत. पोलिसांनी मात्र हा अपघात असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

अंबाला-जगाधरी मार्गाचं चौपदरीकरण केलं जात आहे. हा आधी एकेरी मार्ग होता. रस्ता रुंदीकरणासाठी खोदकाम करताना दलदलीत कार सापडली. कारमध्ये दारु, पाण्याची बाटली, जग अशा काही वस्तू आढळल्या आहेत. गाडीची नंबरप्लेट आणि मृतदेहाच्या खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटवण्यात आली.

नरेशच्या मुलाने आपल्या वडिलांच्या वर्तनामुळे लाज वाटत असल्याचं सांगितलं. चार वर्षांपूर्वीच आपण त्यांच्याशी नातं तोडल्याचा दावा त्याने केला. मात्र वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी होकार दिला आहे. नरेश यांना चार मुलं आणि एक मुलगी आहे. त्यापैकी कोणाचंही लग्न झालेलं नाही. 46 वर्षीय नरेश शेती करत असत.

नरेश यांचं आपल्या घरी येणं-जाणं असल्याचा 38 वर्षीय अंजू यांच्या अल्पवयीन मुलीने सांगितलं. 7 जुलै 2016 च्या संध्याकाळी नरेश कार घेऊन घराच्या गल्लीजवळ आले. त्यावेळी आई कपडे धूत होती. नरेश सरळ घरात घुसले आणि आईला जबरदस्ती कारमध्ये बसवून निघून गेले, असं तिने सांगितलं.

अंजू यांच्या कुटुंबीयांनी कारचा पाठलागही केला, मात्र त्यांना कोणीही पकडू शकलं नाही. दोघांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. पोलिसातही त्याची तक्रार देण्यात आली.

अंजू यांचं वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे 18 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोन वर्षांपूर्वी अंजू यांच्या पतीला अपघात झाला होता. त्यामुळे मुलगाच त्यांचा कमवता आधार आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Haryana : Dead body of couple found one and half year after they went missing latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV