राजीनामा दिलेल्या न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप

न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांच्यावर निकालासाठी दबाव होता का? त्यांनी दबावातून राजीनामा दिला का?

राजीनामा दिलेल्या न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप

हैदराबाद: हैदराबादमधील मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणात स्वामी असीमानंद यांची निर्दोष मुक्तता करणारे न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी, निकाल दिल्यानंतर काही तासातच न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या या झटपट राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले.

न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांच्यावर निकालासाठी दबाव होता का? त्यांनी दबावातून राजीनामा दिला का? अशी कुजबूज देशभर सुरु झाली.

न्यायाधीश रेड्डी यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण काय, याची पडताळणी करण्यासाठी एबीपी माझाने हैदराबाद गाठलं.

न्यायाधीश रेड्डींवर भ्रष्टाचाराचे आरोप

न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी राजीनाम्यासाठी वैयक्तिक कारण दिलं. रेड्डी हे दोन महिन्यांनी निवृत्त होणार होते. मात्र त्यापूर्वीच, तेही असीमानंद यांच्या निकालानंतर त्यांनी राजीनामा दिल्याने, उलटसुलट चर्चा सुरु झाली.

मात्र न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांची  न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली हायकोर्टाच्या दक्षता विभागाकडून चौकशी सुरु आहे.

न्यायाधीश रेड्डींविरोधात तक्रार

न्यायाधीश रेड्डी यांच्याविरोधात कृष्णा रेड्डी नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. कृष्णा यांनी न्यायाधीश रेड्डींवर भ्रष्टाचाराचे आरोप करत, त्यांच्यावर 12 डिसेंबर 2017 रोजी हायकोर्टात तक्रार दाखल केली.

आरोपीला जामीन देण्यासाठी लाच?

न्यायाधीश रेड्डी यांनी टी पी रेड्डी नावाच्या आरोपीला पैसे घेऊन जामीन दिल्याचा आरोप, कृष्णा रेड्डी यांनी केला आहे.

टी पी रेड्डीवर 300 कोटीच्या जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी सत्र न्यायालायने तीन वेळा त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. हायकोर्टानेही गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली.

अशावेळी टी पी रेड्डीने जामीनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल करणं अपेक्षित होतं, मात्र टी पी रेड्डीने पुन्हा त्याच कोर्टात जामीनासाठी अर्ज केला, ज्या कोर्टाने तीन वेळा जामीन अर्ज फेटाळला होता. 

जज सुट्टीवर, रेड्डी ड्युटीवर

टी पी रेड्डीने सत्र न्यायालयात पुन्हा जामीनासाठी अर्ज केला. मात्र त्यावेळी पूर्णवेळ न्यायाधीश दोन दिवसांच्या सुट्टीवर होते. तेव्हा कोर्टाचा कार्यभार दोन दिवसांसाठी न्यायाधीश रवींद्र रेड्डींकडे होता.

त्यावेळी न्यायाधीश रेड्डींनी सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्णत: न ऐकता, दोनच दिवसाच्या सुनावणीत टी पी रेड्डीला जामीन दिल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे.

न्यायाधीशांविरोधात हायकोर्टात तक्रार

या प्रकारानंतर तक्रारदार कृष्णा रेड्डी यांनी न्यायाधीश रेड्डींवर भ्रष्टाचाराचा आरोप करत, हायकोर्टात तक्रार केली. त्यावेळी हायकोर्टाने त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं.

या तक्रारीनंतरच हायकोर्टाचा दक्षता विभाग चौकशी करत आहे.

याचिकाकर्त्याचे वकील श्रीरंगा राव यांनी आरोप केला आहे की, न्यायाधीश रेड्डी यांनी त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईला घाबरुन किंवा हायकोर्टाच्या आदेशाने निवृत्तीच्या दोन महिन्यापूर्वीच राजीनामा दिला.

न्यायमूर्तींची भ्रष्टाचाराविरोधात कारवाई

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश रमेश रंगनाथन हे भ्रष्ट न्यायाधीशांविरोधात सातत्याने कारवाई करत आहेत. काही दिवसांपूर्वीच न्यायाधीश एस मधू, न्यायाधीश एम गांधी आणि एस राधाकृष्ण मूर्ती या तीन न्यायाधीशांविरोधात हायकोर्टाच्या आदेशाने लाचलुचपतीचा गुन्हा दाखल करत, अटक केली आहे.

वकील रंगा राव यांच्या दाव्यानुसार, न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांच्याविरोधात सुरु असलेली चौकशी लवकरच पूर्ण होणार होती. त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचाही आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार हे जवळपास निश्चित होतं. त्याच भीतीने त्यांनी राजीनामा दिला.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Hyderabad Mecca Masjid blast case: Judge Ravindra Reddi resignation story
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV