नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांची ‘तारिणी’वर स्वार होऊन उद्यापासून जगभ्रमंती

आयएनएसव्ही तारिणीवरील चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर स्वाती पी, लेफ्टनंट ऐश्वर्या बोद्दापती, लेफ्टनंट विजया देवी , लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.

नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांची ‘तारिणी’वर स्वार होऊन उद्यापासून जगभ्रमंती

गोवा : नाविका सागर परिक्रमा’ या उपक्रमांतर्गत नौदलच्या महिला अधिकाऱ्यांचा चमू भारतीय बनावटीच्या आयएनएसव्ही ‘तारिणी’ या नौकेने उद्या जगप्रवासाला रवाना होणार आहे. भारतात महिला कर्मचाऱ्यांसह सुरु होणारा हा प्रवास पहिल्यांदाच होत आहे. ही मोहीम 10 सप्टेंबर 2017 रोजी सुरु होत आहे.

‘आयएनएसव्ही तारिणी’ ही ‘आयएनएसव्ही म्हादई’ची पुढील आवृत्ती आहे. भारत सरकारचा ‘नारी शक्ती’ला असलेला भक्कम पाठिंबा लक्षात घेता हा प्रकल्प सागरी नौकानयन उपक्रमांच्या प्रचारासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या नौकेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत.

Tarini 1

पहिला भारतीय वैयक्तिक जागतिक जलप्रवास 19 ऑगस्ट 2009 ते 19 मे 2010 या काळात आयएनएसव्ही म्हादईसोबत निवृत्त कॅप्टन दिलीप दोंदे यांनी केला होता. तसेच पहिला भारतीय विनाथांबा वैयक्तिक जगप्रवास कमांडर अभिलाष टॉमी यांनी 1 नोव्हेंबर 2012 ते 31 मार्च 2013 या कालावधीत केला होता.

आयएनएसव्ही तारिणीवरील चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर स्वाती पी, लेफ्टनंट ऐश्वर्या बोद्दापती, लेफ्टनंट विजया देवी , लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.

या जलप्रवासाकरिता सर्व महिला कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्यांनी आयएसएनव्ही म्हादई आणि आयएसएनव्ही तारिणी मधून आतापर्यंत सुमारे 20 हजार सागरी मैलाचा जलप्रवास केला आहे. ज्यामध्ये 2016 व 2017 मधील दोन मोहिमा आणि डिसेंबर 2016 मधील गोवा ते केप टाऊन या जलप्रवासाचा समावेश आहे.

आयएसएनव्ही तारिणी, या 55 फुट नौकेची बांधणी गोव्यातील मेसर्स एक्वारीअस शिपयार्ड प्रा. लि. या कंपनीने केली आहे. 18 फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय नौदलात या नौकेचा समावेश करण्यात आला. आतापर्यंत या नौकेने सुमारे 8000 सागरी मैल प्रवास केला आहे. नाविका सागर परिक्रमा पाच टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे. कॅप्टन दिलीप दोंदे यांच्याप्रमाणेच रसद व गरजेनुसार नौका दुरुस्तीसाठी चार बंदरांवर ही नौका विसावा घेणार आहे.

असा असेल प्रवास :

  • गोवा ते फ्रेमेंटल (ऑस्ट्रेलिया) हा प्रवास 10 सप्टेंबर 17 ते 12 ऑक्टोबर 17 दरम्यान होणार आहे.

  • फ्रेमेंटल (ऑस्ट्रेलिया) ते लेटलटन (न्यूझीलंड) हा दुसऱ्या टप्प्यातील प्रवास 25 ऑक्टोबर 17 ते 16 नोव्हेंबर 17 दरम्यान पूर्ण केला जाणार आहे.

  • लेटलटन (न्यूझीलंड) ते पोर्ट स्टॅन्ली (फॉकलंड्स)हा तिसऱ्या टप्प्यातील प्रवास 23 नोव्हेंबर 17 ते 28 डिसेंबर 17 दरम्यान पूर्ण केला जाणार आहे.

  • पोर्ट स्टॅन्ले (फॉकलंड्स)  ते केप टाउन (दक्षिण आफ्रिका) हा चौथ्या टप्प्यातील प्रवास 10 जानेवारी 18 ते 8 फेब्रुवारी 18 दरम्यान होणार आहे.

  • केप टाउन (दक्षिण आफ्रिका) येथून  गोव्याला परतीचा प्रवास  21 फेब्रुवारी 18ला सुरु होणार असून  4 एप्रिल 18 रोजी हा चमू गोव्यात पोचणार आहे.


या मोहिमेला ‘नाविका सागर परिक्रमा’ हे  नाव देण्यामागे देशातील महिला सशक्तीकरणाला मजबूती देणे आणि भारतीय नौसेनेतर्फे सागरी नौकानयनाचा प्रसार करणे हा उद्देश आहे. ही मोहिम देशातील तरुणांना समुद्राचे ज्ञान घेण्यास आणि साहस तसेच परस्पर सदभाव वाढवण्यास प्रेरित करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ज्यामागे महिलांच्या कार्यक्षमतेला पूर्ण वाव देण्यासाठी महिला सशक्तीकरणाचे राष्ट्रीय धोरण अंगीकारताना या मोहिमेने जागतिक पातळीवर ‘नारी शक्ती’चे प्रदर्शन करणे हा हेतू आहे. यामुळे आव्हानात्मक वातावरणातील महिलांच्या सहभागाची दृश्यमानता वाढवून भारतातील स्त्रियांप्रती सामाजिक दृष्टिकोन आणि मानसिकता बदलण्यास मदत होणार आहे.

त्याशिवाय  स्त्रियांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या पर्यावरण अनुकूल गैर-परंपरागत पुनर्निर्मित ऊर्जा संसाधनांचा वापर करण्यास ही मोहीम प्रोत्साहन देणारी ठरणार आहे. हे अभियान स्त्रियांच्या उदरनिर्वाहासाठी ऊर्जेचा अनुकूलन स्रोत ठरेल यात शंका नाही.

स्वदेशी बनावटीच्या आयएसएनव्ही तारिणी मार्फत ‘मेक इन इंडिया’चे प्रदर्शन करणे, हा देखील या मोहिमेचा उद्देश आहे.

संशोधन व विकास संस्थांमार्फत केल्या जाणाऱ्या भविष्यकालीन अंदाजाच्या विश्लेषणासाठी दैनंदिन हवामानशास्त्र, महासागर, लाटांसंबंधी माहिती एकत्र करून त्याचे अद्यतन मोहिमेवरील कर्मचारी, अधिकारी करणार आहेत.

चालक दल उच्च महासागरांवर समुद्री प्रदूषणाची पाहणी करुन त्याची माहिती संकलित करणार आहेत. महासागरातील नौकानयन आणि साहसी मोहिमांना चालना देणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्यामुळे विविध बंदरांवरील मुक्कामांदरम्यान स्थानिक पीआयओशी (भारतीय वंशाचे लोक) नौकेवरील अधिकारी वर्ग संवाद साधून हे संबध अधिक विकसित करणार आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV