कठुआ बलात्कार: आजपासून कोर्टात सुनावणी

जानेवारी 2018 मध्ये 8 वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.

कठुआ बलात्कार: आजपासून कोर्टात सुनावणी

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील कठुआ बलात्कारप्रकरणी आज स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींना न्यायालयात हजर करुन या सुनावणीला सुरुवात होईल.

जानेवारी 2018 मध्ये 8 वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.

दरम्यान या प्रकरणाची सुप्रीम कोर्टानं दखल घेतल्यानंतर आता पीडितेच्या वकिलांना धमकावण्यात येत आहे. पीडितेच्या बाजूनं केस लढणाऱ्या दीपिका सिंह राजावत यांना आरोपींच्या समर्थकांकडून धमकावण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या राज्यात व्हावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहेत.

जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार, हत्या प्रकरण

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आठव्या आरोपीविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर आता सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

10 जानेवारीला मुलगी खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीने अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर तिची हत्या केली.

शोधाशोध करुन थकल्यावर 12 जानेवारीला तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली.

17 जानेवारीला जंगलात तिचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याचा मुलगा विशालला अटक करण्यात आली.

संजी रामला मदत करणं आणि चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.

देशाच्या मुलींना न्याय मिळेल, आरोपींना सोडणार नाही : मोदी


सुप्रीम कोर्टाकडून दखल

जम्मू-काश्मीरच्या कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे. याप्रकरणी स्वत: सुप्रीम कोर्टाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. तसंच  सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीरमधील बार असोसिएशनला देखील नोटीस बजावली आहे.

पीडितेच्या वकिलांना कोर्टात येण्यापासून रोखणाऱ्या वकिलांविरोधात सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त करत बार असोसिएशनला नोटीस बजावली आहे. 19 एप्रिलपर्यंत या नोटीशीचं उत्तर सुप्रीम कोर्टाने मागितलं आहे.

कठुला गँगरेप आणि हत्येप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करुन घेण्यात यावी अशी मागणी सुप्रीम कोर्टातील वकिलांच्या एका समूहाने सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती  ए. एम. खानविलकर आणि डी. वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाकडे केली होती. वकिलांच्या या मागणीनंतर सुप्रीम कोर्टानेही सुमोटो याचिका दाखल करुन घेतली.

वकिलांचा आरोपींना पाठिंबा
धक्कादायक म्हणजे, जम्मू बार असोसिएशनने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कारवाईविरोधातच निदर्शनं केली. या बार असोसिएशनने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी केली.

चित्रपट, क्रीडासह अनेक क्षेत्रातील दिग्गज आक्रमक
प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, संजय दत्त, सोनम कपूर, रेणुका शहाणे, फरहान अख्तर, जावेद अख्तर, रितेश देशमुख, टेनिस स्टार सानिया मिर्झा, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांसह अनेक दिग्गजांनी ट्वीटरवरुन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

न्याय मिळेल : मेहबूबा मुफ्ती
“चिमुकलीला न्याय मिळवून देण्याच्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही. शिवाय, काही लोक किंवा गटांची बेजबाबदार वक्तव्य आणि कृती कायद्याच्या मार्गात अडथळा ठरणार नाही, याची खबरदारी घेऊ. योग्य ती कारवाई केली जाईल. वेगाने तपास करुन, न्याय दिला जाईल.”, असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीटद्वारे सांगितले.

संबंधित बातम्या

काश्मिरात चिमुकलीची बलात्कार करुन हत्या

कठुआ बलात्कार : फाशीसाठी पॉक्सोमध्ये बदल करणार : मेनका गांधी 


भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, असिफाच्या बलात्कारामागे पाकचा हात


देशाच्या मुलींना न्याय मिळेल, आरोपींना सोडणार नाही : मोदीभारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: kathua rape case hearing today
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV