मराठा शौर्य दिन : 'पानिपत'च्या युद्धभूमीवर 'जय भवानी, जय शिवाजी'चा गजर

मराठा शौर्य दिन : 'पानिपत'च्या युद्धभूमीवर 'जय भवानी, जय शिवाजी'चा गजर

पानिपत : 14 जानेवारी म्हणजे संक्रांत असं समीकरण असलं तरी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी या दिवसाची आणखी एक ओळख आहे. 14 जानेवारी 1761 याच दिवशी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शहा अब्दालीसारख्या परकीयाचं आक्रमण रोखण्यासाठी मराठ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती.

पानिपतमधल्या ऐतिहासिक काला आम युद्धभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठा शौर्य दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हरियाणामधले रोड मराठा आणि महाराष्ट्रातूनही आलेले शेकडो लोक जमा झाले होते.

पानिपतच्या युद्धानंतर काही मराठा सैन्य हे त्याच ठिकाणी स्थायिक झालं. हरियाणामध्ये त्यांची ओळख रोड मराठा अशी आहे. मराठा जागृती मंच हरियाणातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

पानिपतच्या युद्धासाठी कुरूक्षेत्रावरुन ज्या मार्गाने मराठा फौजा आलेल्या होत्या, त्या मार्गावर कुरुक्षेत्र ते पानिपत अशी बाईक रॅली काढत हरियाणातले शेकडो रोड मराठा युवक या युद्धस्थळावर जमा झाले होते.

शहीद स्मारकाशेजारी पणती लावून आपल्या पूर्वजांना नमन करण्यासाठी शेकडो महिलाही या ठिकाणी उपस्थित होत्या. जय शिवाजी, जय भवानीचा गजर करत आणि शिवरायांच्या पराक्रमाचा पोवाडा हरियाणवीमधून सादर करत हरियाणामधल्या या रोड मराठा समाजाने आपण स्थायिक जरी दूरवर असलो तरी नाळ मात्र मराठी अस्मितेशी जोडली असल्याचं दाखवून दिलं.

या कार्यक्रमासाठी नागपूरच्या भोसल्यांचे वंशज मुधोजीराजे भोसले, जिजाऊंच्या घराण्याचे वंशज बाबाराजे जाधव, इतिहासकार वसंतराव मोरे हेही आवर्जून उपस्थित होते. पानिपतला 250 वर्षे पूर्ण झाली त्यावेळी हरियाणामधले मराठी अधिकारी अजित जोशी यांच्या पुढाकाराने या शौर्य दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती.

India शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV