चलनात दोन हजाराच्या नोटांचा नव्याने पुरवठा बंद

नजीकच्या काळात पाचशे रुपयांच्या नोटांची छपाई पाचपटीने वाढवण्याची हमीसुद्धा सरकारने दिली.

चलनात दोन हजाराच्या नोटांचा नव्याने पुरवठा बंद

नवी दिल्ली : चलनात दोन हजार रुपयांच्या नोटांचा नव्याने पुरवठा करणं बंद केल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. याचा अर्थ, सध्या चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होणार नसून, केवळ नव्या नोटांची छपाई आणि वितरण थांबवल्याचं केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आलं. सोबतच नजीकच्या काळात पाचशे रुपयांच्या नोटांची छपाई पाचपटीने वाढवण्याची हमीसुद्धा सरकारने दिली.

बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील काही भागात एटीएममध्ये खडखडाट जाणवत आहे. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या स्थितीप्रमाणे अनेक भागात एटीएम 'कॅशलेस' झाल्याचं नागरिक सांगत आहेत. मात्र नोटाबंदीनंतर (8 नोव्हेंबर 2016) असलेल्या चलनाच्या तुलनेत सध्या बाजारात खूप जास्त नोटा असल्याचा दावा सरकारने केला आहे. नोटाबंदीच्या वेळी 17.5 लाख कोटींपेक्षा जास्त रोकड चलनात होती, तर सध्या 18 लाख कोटींच्या पार रक्कम चलनात आहे, असं सरकारने सांगितलं.

सध्या व्यवस्थेत 6.7 लाख कोटींपेक्षा जास्त रकमेच्या दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध आहेत. ही रक्कम आवश्यकतेपेक्षा जास्त आहे, म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून दोन हजाराच्या नव्या नोटांचा पुरवठा थांबवण्यात आला आहे, अशी माहिती आर्थिक विषयांचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी दिली. दोन हजाराच्या नोटांची साठवणूक होत असल्याची शक्यता गर्ग यांनी नाकारली नाही.
फक्त दोन हजारच नाही, तर चलनात आलेल्या इतर नोटाही बँकिंग व्यवस्थेत कमी प्रमाणात येत आहेत, असं गर्ग म्हणाले.

पाचशेच्या नोटांची छपाई पाचपट

सध्या दररोज पाचशे रुपयांच्या 500 कोटी रुपये किमतीच्या नोटा छापल्या जात आहेत. नोटांची ही छपाई क्षमता पाचपट करण्याची योजना असल्याचंही गर्ग यांनी सांगितलं. म्हणजेच पुढच्या काही दिवसात दररोज 2500 कोटी रुपये किमतीच्या पाचशेच्या नोटा छापल्या जातील. त्यामुळे दर महिन्याला 75 हजार कोटी रुपयांच्या पाचशेच्या नोटा व्यवस्थेत येतील.आधी सरासरी 19 ते 20 हजार कोटी रुपयांच्या रोकडीची मागणी देशभरात होत असे, तो आकडा आता 40 ते 45 हजार कोटींवर पोहचल्याची माहिती गर्ग यांनी दिली. एप्रिल महिन्यात 13 दिवसांतच 45 हजार कोटींची मागणी झाल्याचं त्यांनी सांगितलं. मागणीनुसार रिझर्व्ह बँकेने रोकड चलनात आणली असून, यापुढे ती होतच राहील.

नागरिक मोठ्या प्रमाणावर पैसे बँक/एटीएममधून काढत आहेत. बँकिंग क्षेत्रातले घोटाळे किंवा एफआरडीआय बिलाची तरतूद ही मोठ्या प्रमाणावर पैसे काढण्याची कारणं असल्याचा गर्ग यांनी इन्कार केला, मात्र कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांमुळे काही राज्यात हे प्रमाण वाढल्याचं ते म्हणतात.

विनाकारण बँकेतून पैसे काढू नका

सद्यस्थिती असामान्य नाही, कारण मागणीनुसार रोकडीचा पुरवठा होत आहे. त्याचप्रमाणे यापुढेही तसा पुरवठा होण्यात कोणतीही अडचण नाही, मात्र विनाकारण बँकेतून पैसे काढू नका, बँकिंग व्यवस्थेत कोणतीही अडचण नाही, असं आवाहन गर्ग यांनी केलं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: New Supply of Two Thousand rupees note stopped
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV