2019 च्या निवडणुकीत मोदी आणि प्रशांत किशोर पुन्हा एकत्र?

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, दोघांचीही नुकतीच भेट असून, आगामी लोकसभा निवडणुकीतील किशोर यांच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

2019 च्या निवडणुकीत मोदी आणि प्रशांत किशोर पुन्हा एकत्र?

 

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर आणि पंतप्रधान मोदी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण, हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, दोघांचीही नुकतीच भेट असून, आगामी लोकसभा निवडणुकीतील किशोर यांच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर टीम मोदीमध्ये सहभागी झाल्यास, निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान मोदींच्या रथाचे सारथ्य प्रशांत किशोर करु शकतात.

गेल्या काही वर्षांत प्रशांत किशोर यांची  राजकीय वर्तुळात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 2012 ची गुजरात विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विजयात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरु झाली. पण काही कारणांमुळे या मोदी आणि किशोर यांच्यात अंतर वाढले.

पण आता हे दोन्ही दिग्गज पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण, सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत किशोर आणि नरेंद्र मोदी गेल्या सहा महिन्यांपासून संपर्कात आहेत. दोन्ही दिग्गजांमध्ये थेट संवाद सुरु असून, यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर मोदी टीममध्ये सहभागी झाल्यास, त्यांच्यावर काय जबाबदारी असेल, यावर चर्चा झाल्याचे समजते.

विशेष म्हणजे, प्रशांत किशोर आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची देखील भेट झाल्याचे वृत्त आहे. वास्तविक, मोदी आणि किशोर यांच्यात मतभेद होण्यापाठीमागे अमित शाह कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. पण आता शाह आणि किशोर यांच्यातील मतभेद दूर झाले असून, ते लवकरच मोदी टीममध्ये सहभागी होण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, मोदी आणि किशोर यांची भेट झाली असली, तरी दोघांमधील बैठकीत अंतिम निर्णय झालेला नाही.

सध्या मोदींची देशभरातच नव्हे, तर आंतराष्ट्रीय स्तरावरही ताकद चांगलीच वाढली आहे. तसेच भाजपदेखील देशातला सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तर दुसरीकडे प्रशांत किशोर यांचीही राजकीय क्षेत्रात चांगलीच ओळख वाढली आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांसाठी रणनिती आखून त्या पक्षाने विजय मिळवून दिला आहे.

यापूर्वी प्रशांत किशोर यांनी 2015 मधील बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी काम करत होते. तर गेल्या वर्षी झालेल्या पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासाठी रणनिती तयार केली होती. त्यातून काँग्रेसला चांगला फायदा झाला होता.

यानंतर उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठीही काँग्रेसची प्रचाराची धूरा किशोर यांच्याकडे होती. पण काँग्रेसने समाजवादी पक्षाशी हातमिळवणी केल्याने, किशोर यांच्या रणनितीवर पाणी फेरले गेले. नुकतेच त्यांनी आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेससाठी काम केलं होतं.

त्यामुळे किशोर यांनी जर पुन्हा भाजपसाठी घरवापसी केली. तर पंतप्रधान मोदींच्या निवडणूक प्रचाराची धूरा त्यांच्या खांद्यावर येईल, हे निश्चित मानले जात आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: PM Modi’s 2019 election bid may see the return of election strategist Prashant Kishor to his side
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV