डेबिट कार्डने खरेदी महागणार, एमडीआरचे नवे दर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डेबिट कार्डवर मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजेच एमडीआर या नव्या व्यवस्थेची घोषणा केली आहे. ही व्यवस्था 1 जानेवारी 2018 पासून लागू होईल.

डेबिट कार्डने खरेदी महागणार, एमडीआरचे नवे दर

नवी दिल्ली : नव्या वर्षात तुमचा डेबिट कार्डचा व्यवहार महागण्याची शक्यता आहे. डेबिट कार्डने एक हजार रुपयांपर्यंतची खरेदी महाग, तर दोन किंवा त्यापेक्षा अधिकची खरेदी स्वस्त होऊ शकते. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डेबिट कार्डवर मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजेच एमडीआर या नव्या व्यवस्थेची घोषणा केली आहे. ही व्यवस्था 1 जानेवारी 2018 पासून लागू होईल.

एमडीआर अर्थात मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजे काय?

एमडीआरला ट्रान्झॅक्शन फी असंही म्हटलं जातं. ही रक्कम कार्ड जारी करणारी संस्था वसूल करते. मोठे मॉल, दुकान आणि हॉटेल हा चार्ज स्वतः भरतात. तर छोटे दुकानदार हा पैसा ग्राहकांकडून वसूल करतात. एमडीआरमध्ये बँक किंवा वित्तीय संस्था मिळालेल्या रकमेपैकी काही पैसा छोट्या दुकानदारांना देतात. त्यामुळे याला मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजे व्यवसायिकांना देण्यात येणाऱ्या रकमेतील कपात असं म्हटलं जातं.

नव्या व्यवस्थेत देवाण-घेवाणीच्या रकमेऐवजी एकूण व्यवसाय एमडीआरसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. शिवाय पॉईंट ऑफ सेल्स म्हणजे पॉस आणि क्यूआर कोडच्या व्यवहारासाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये व्यवसायिकांना दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. प्रत्येक समुहासाठी दर वेगळे असतील.

त्यानुसार,

  • छोटे व्यवसायिक, म्हणजे गेल्या वर्षात ज्यांची वार्षिक उलाढाल एकूण 20 लाख रुपयांपर्यंत होती, त्यांच्यासाठी स्वाईप मशिनचा (पॉस) एमडीआर दर 0.4 टक्क्यांपर्यंत असू शकतो. म्हणजेच एक हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीवर 4 रुपयांचा एमडीआर असेल. मात्र एका व्यवहारावर एमडीआर जास्तीत जास्त 200 रुपये असू शकतो.

  • छोट्या व्यवसायिकाकडे क्यूआर कोडची व्यवस्था असेल तर एमडीआर दर 0.3 टक्के असेल. म्हणजे एक हजार रुपयांच्या व्यवहारावर 3 रुपये एमडीआर द्यावा लागेल. एमडीआरची जास्तीत जास्त मर्यादा 200 रुपये ठेवण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही कितीही खरेदी केली तरी त्यावर 200 रुपयांपेक्षा जास्त एमडीआर वसूल करता येणार नाही.

  • 20 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यवसायिकांसाठी एमडीआरचा दर 0.9 टक्क्यांपर्यंत असू शकतो. म्हणजेच एक हजार रुपयांच्या व्यवहारावर 9 रुपये एमडीआर लागेल. क्यूआरकोडसाठी एमडीआरचा दर 0.8 टक्के आहे, म्हणजे एक हजार रुपयांवर 8 रुपये लागतील. एमडीआर वसूल करण्याची कमाल मर्यादा 1000 रुपये ठेवण्यात आली आहे.


ऑनलाईन व्यवहारांसाठीही हेच दर

सध्या एक हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर एमडीआर 0.25 टक्के आहे. म्हणजे जास्तीत जास्त अडीच रुपये. मात्र एक हजार रुपयांपेक्षा जास्त आणि 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर एमडीआर 0.5 टक्के आहे. म्हणजेच 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर एमडीआर 10 रुपयांपर्यंत असेल.

मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, हे दोन्हीही दर सर्व प्रकारच्या श्रेणीतील व्यवसायिकांसाठी समान असतील. 2 हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या व्यवहारांवर एमडीआरची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. शिवाय सध्या एमडीआरची कोणतीही उच्च मर्यादा नाही.

एकूणच तुम्ही डेबिट कार्डने एक हजार रुपयांपर्यंत खरेदी केली तर एमडीआरचा दर अडीच रुपयांहून चार ते नऊ रुपयांवर जाईल. तर दोन हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीवर एमडीआरचा दर 10 रुपयांऐवजी चार ते 9 रुपयांवर येईल.

डेबिट कार्ड विरुद्ध क्रेडिट कार्ड

डेबिट कार्डने केलेला व्यवहार हा थेट तुमच्या खात्याशी संबंधित असतो. म्हणजे तुमच्या खात्यात पैसे असतील तेवढीच खरेदी तुम्ही करु शकता. त्यामुळे या व्यवहारासाठी ट्रान्झॅक्शन फी नियमित करण्यात आली आहे. तर क्रेडिट कार्डने केलेला खर्च परत देण्यासाठी तुम्हाला 45 दिवसांचा कालावधी देण्यात येतो. त्यामुळे क्रेडिट कार्डच्या व्यवहाराची मर्यादा 2 ते अडीच टक्क्यांपर्यंत असते.

मोठे हॉटेल, दुकान, मॉल आणि शो रुम या ठिकाणी कार्डने व्यवहार केल्यास तुम्हाला अतिरिक्त चार्ज द्यावा लागत नाही. कारण हे व्यवसायिक त्यांच्या मार्जिनमधून हा चार्ज देतात. कारण त्यांचा रोखीच्या व्यवहारांवर होणारा खर्च वाचतो.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: RBI announced merchant discount policy for debit card transactions
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV