मुस्लिमांविषयीची वेदना नव्हे, सत्ता सुटल्याची व्यथा : 'सामना'

मुसलमान संकटात आहे ही त्यांची भावना होती तर उपराष्ट्रपतीपदाचा त्याग करून त्यांनी याआधीच ही भावना व्यक्त करायला हवी होती, असं म्हणत शिवसेनेनेही ‘सामना’तून हमीद अन्सारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुस्लिमांविषयीची वेदना नव्हे, सत्ता सुटल्याची व्यथा : 'सामना'

मुंबई : उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपताना हमीद अन्सारी यांनी देशातील मुस्लीमांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचं सांगून एका नव्या वादाला तोंड फोडलं. मुसलमान संकटात आहे ही त्यांची भावना होती तर उपराष्ट्रपतीपदाचा त्याग करून त्यांनी याआधीच ही भावना व्यक्त करायला हवी होती, असं म्हणत शिवसेनेनेही ‘सामना’तून हमीद अन्सारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘सामना’चा अग्रलेख

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे बंधू ब्रिगेडियर उस्मान अन्सारी हे पाकबरोबरच्या युद्धात १९४८ साली शहीद झाले आहेत. म्हणूनच हमीद अन्सारी यांच्याकडून मुसलमान व देशाला वेगळय़ा अपेक्षा होत्या. मुसलमान संकटात आहे ही त्यांची भावना होती तर उपराष्ट्रपतीपदाचा त्याग करून त्यांनी याआधीच ही भावना व्यक्त करायला हवी होती. एक दशक उपराष्ट्रपतीपद भोगल्यावर अन्सारी शेवटच्या दिवशी ‘जाता जाता’ हे सर्व बोलतात ही वेदना नसून सत्ता सुटल्याची व्यथा आहे.

पंतप्रधान मोदी हे अधूनमधून ‘मन की बात’ सांगत असतात. त्यापासून प्रेरणा घेत बहुधा (मावळते) उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी देखील ‘मन की बात’ मांडलेली दिसते. उपराष्ट्रपतीपदाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितले की, देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. अन्सारी हे गेले दशकभर देशाचे उपराष्ट्रपती होते व अत्यंत संयमी, ज्ञानी, राजकीय जाणकार म्हणून त्यांची ख्याती होती. ‘सेक्युलर’ म्हणजे निधर्मी अशी प्रतिमा त्यांनी शेवटपर्यंत जपली असताना शेवटच्या दिवशी त्यांच्या अंतरात्म्याचा असा स्फोट व्हावा याचे आश्चर्य वाटते. जमावाकडून एकट्या दुकट्या मुसलमानास पकडून मारहाण करण्याच्या घटना चिंताजनकच आहेत. गोरक्षणाच्या मुद्दय़ावरून काही मंडळींनी सुरू केलेला हिंसाचार धक्कादायक आहे व या घटनांचे समर्थन कोणीही केले नाही. अशा घटना व कृत्ये म्हणजे हिंदुत्व नाही किंवा हा हिंदू राष्ट्राचा गाभा नाही. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी या तथाकथित गोरक्षक दुकानदारीस झोडपून काढले आहे. मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व कालपर्यंत ज्यांची डोकी धर्मांधतेच्या वावटळीत भरकटली होती त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणून ‘वंदे मातरम्’ म्हणायला लावणे हेच खरे हिंदुत्व आहे. मुसलमानांना भडकवून व त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करून राजकीय मतलब आतापर्यंत साधला गेला, पण हे सर्व नव्या राजवटीत बंद झाल्याने अनेकांच्या हिरव्या लुंग्या फाटल्या आहेत. हमीद अन्सारी यांनी मुसलमानांच्या मनातील असुरक्षिततेची भावना व्यक्त केली, पण त्याच मुसलमानांच्या मनातील

धर्मांध भावना

व अराष्ट्रीय अंधश्रद्धेवरही प्रहार करायला हवा होता. मुसलमानांतील मोठा वर्ग ‘वंदे मातरम्’ म्हणायला तयार नाही. हा राष्ट्रगीत व मातृभूमीचा अपमान आहे. ‘‘देश सोडू, पण ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही’’ असे फूत्कार सोडणाऱया मुसलमान नेत्यांना हमीद अन्सारी यांनी फटकारले असते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढली असती. गोरक्षणाच्या निमित्ताने मुसलमानांवर होणारे हल्ले जितके भयंकर तितकेच भयंकर ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास नकार देणे आहे. ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास नकार देणाऱयांपासून हिंदूंच्याही मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशा राष्ट्रघातकी प्रवृत्तीपासून देशाला धोका आहे ही जनभावना आहे. खरे म्हणजे मुसलमानांनी त्यांच्या जबाबदारीचे भान ठेवले तर त्यांना या देशात कसलेच भय बाळगण्याचे कारण नाही. संपूर्ण जगात मुस्लिम सर्वात जास्त सुरक्षित असतील तर ते फक्त हिंदुस्थानात. बाजूच्या पाकिस्तानात इस्लामी राजवट असूनही मुसलमानांच्या जीवनाचा ‘नरक’ बनला आहे. इराक, बांगलादेश, अफगाणिस्तान, सीरियातील मुसलमान जनता अन्नपाण्यास मोताद बनली आहे. अमेरिकेतून मुसलमानांना घालवून देण्याची भाषा तेथील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. युरोपातील अनेक राष्ट्रे मुसलमानांना नजरेसमोर धरायला तयार नाहीत. मुसलमान व दहशतवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. हिंदुस्थानातील शाहरुख खानसारख्या अनेक लोकप्रिय मंडळींनादेखील अमेरिकेच्या विमानतळावर तासन्तास अडकवून ठेवले जाते आणि त्यांची झाडाझडती घेतली जाते. अमेरिकेसारख्या राष्ट्रालाही

मुसलमानांपासून धोका

व असुरक्षितता वाटत असेल तर त्यास जबाबदार कोण? हिंदुस्थानातील प्रत्येक दहशतवादी घटनेमध्ये पाकड्यांचा हात असला तरी त्या भयंकर स्फोटांना वाती लावण्याचे काम येथील माथेफिरू मुसलमानांनी केले. हे लोक मोजके असले तरी त्यामुळे संपूर्ण मुसलमान समाज बदनाम झाला व संशयाच्या फेऱ्यात कायमचा अडकून पडला आहे. समान नागरी कायदा, तीन तलाक हे विषय जसे देशासाठी महत्त्वाचे आहेत तसे मुसलमानांच्या सामाजिक व कौटुंबिक प्रगतीसाठीही तोलामोलाचे आहेत. मुसलमानांनी समान नागरी कायदा स्वीकारावा व ‘शरीयत’च्या गुलामी बेडय़ा झुगारून द्याव्यात असे सांगणारे हमीद अन्सारी आम्हाला हवे होते. पाकबरोबरच्या युद्धात शहीद झालेल्या अब्दुल हमीदचा आम्हाला गर्व आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे बंधू ब्रिगेडियर उस्मान अन्सारी हे पाकबरोबरच्या युद्धात १९४८ साली शहीद झाले आहेत. म्हणूनच हमीद अन्सारींकडून मुसलमान व देशाला वेगळय़ा अपेक्षा होत्या. मुसलमान संकटात आहे ही त्यांची भावना होती तर उपराष्ट्रपतीपदाचा त्याग करून त्यांनी याआधीच ही भावना व्यक्त करायला हवी होती. एक दशक उपराष्ट्रपतीपद भोगल्यावर अन्सारी शेवटच्या दिवशी ‘जाता जाता’ हे सर्व बोलतात ही वेदना नसून सत्ता सुटल्याची व्यथा आहे. अशा वक्तव्यांमुळे या देशातील मुसलमानांची जास्त पीछेहाट होते व त्यांच्या मागासलेपणात भर पडते. मात्र हे ‘सत्य’ अन्सारींसारख्या ज्येष्ठ मुस्लिम नेत्यांना कळूनही वळत नाही हीच येथील मुस्लिम समाजाची खरी शोकांतिका आहे.

हमीद अन्सारी काय म्हणाले?

“देशाच्या मुस्लीम समाजामध्ये आज असुरक्षितता आणि भीतीची भावना आहे. देशाच्या विविध भागांमधून मला अशा अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. भारतीय समाज वर्षानुवर्ष विविधतावादी आहे. पण आता हे वातावरण धोक्यात आहे. नागरिकांच्या भारतीयत्वावर प्रश्न उपस्थित करण्याची प्रवृती अतिशय चिंताजनक आहे.

तथाकथित गोरक्षकांचे हिंसक हल्ले, कथित घरवापसी, राष्ट्रवादाचा अतिरेकी, अंधश्रद्धेचा विरोध करणाऱ्यांची हत्या या घटना भारतीय मूल्यांना, संस्कृतीला मारक ठरत आहेत. आपल्याच नागरिकांसाठी कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्याची सरकारी अधिकाऱ्यांची क्षमताही वेगवेगळ्या स्तरावर कमी पडत आहे,” असं अन्सारी म्हणाले.

संबंधित बातम्या :


...तर अन्सारींनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता : शिवसेना


देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना : अन्सारी

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV