उन्नाव गँगरेप प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला अटक

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयने पहाटे साडेचार वाजता राहत्या घरातून अटक केली

उन्नाव गँगरेप प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला अटक

लखनौ : उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपी असलेला भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयच्या पथकाने अटक केली आहे. लखनौच्या इंदिरा नगर भागातील राहत्या घरातून नाट्यमय पद्धतीने सेंगरच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अटकेनंतरही सेंगरची दबंगगिरी सुरुच असल्याचं पाहायला मिळालं.

कुलदीप सिंह सेंगर विरोधात रविवारी रात्री अडीच वाजता एफआयआर दाखल करण्यात आला होता. पॉक्सो कायद्याअंतर्गतही त्याच्याविरोधात केस दाखल करण्यात आली आहे. सध्या त्याची रवानगी सीबीआयच्या लखनौतील मुख्यालयात करण्यात आली आहे.

कशी झाली अटक?

सीबीआयच्या पथकाने काल (गुरुवार) रात्री 9 वाजता कारवाईला सुरुवात केली. सीबीआयचे एसपी राघवेंद्र वत्स आणि लखनौचे एसएसपी दीपक कुमार यांचं पथक सेंगरच्या अटकेबाबत विचारमंथन करत होतं.

सेंगर आणि त्याच्या सर्व निकटवर्तीयांचे मोबाईल नंबर बंद असल्यामुळे त्यांना ट्रेस करणं अवघड जात होतं. सीबीआय आणि लखनौ पोलिसांची टीम रात्री 11 वाजता आमदार महाशयांच्या सरकारी निवासस्थानी पोहचली, मात्र तिथे तो नव्हताच. इतरांकडे त्याची चौकशी करुनही हाती कोणतीच माहिती लागली नाही.

सेंगरच्या पत्नीवर उपचार सुरु असलेलं रुग्णालय पोलिसांनी गाठलं. तिथेही पोलिसांच्या हाती कोणतीच माहिती लागली नाही. त्यानंतर एक पथक बसप आमदार अनिल सिंह यांच्या विक्रम खंड गोमती नगरमधील निवासस्थानी पोहचली. मात्र तिथेही पोलिसांच्या पदरी निराशाच आली.
लखनौमध्ये गँगरेप पीडितेच्या वडिलांचा पोलिस कोठडीत मृत्यू

त्यानंतर पोलिसांनी सेंगरचे नातेवाईक शैलेंद्र सिंह शैलू यांच्या घरी कूच केली, मात्र तिथेही आमदाराचा थांगपत्ता लागला नाही. अखेर सीबीआय आणि लखनौ पोलिसांची टीम रात्री दोन वाजताच्या सुमारास लखनौ एसएसपीच्या कार्यालयात परतली.

आमदार सेंगर इंदिरा नगर भागातील घरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पहाटे साडेचार वाजता सीबीआय आणि लखनौ पोलिस तिथे पोहचली आणि त्यांनी कुलदीप सिंह सेंगरला घरातून अटक केली. सेंगरला घेऊन पोलिस सीबीआयच्या मुख्यालयात आली.

आपल्याविरोधात मोठी कारवाई होऊ शकते, याचा अंदाज सेंगरला आधीपासूनच होता. म्हणूनच त्याने स्वतःचा आणि निकटवर्तीयांचा फोन बंद ठेवला होता. त्याने पत्नीला केलेला शेवटचा फोनही व्हॉट्सअॅप कॉल होता.

गँगरेप पीडितेच्या तक्रारीनंतर बुधवारी अलाहाबाद हायकोर्टाने स्वतःच या प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणी गुरुवारी सुनावणी करण्यात आली. तुम्ही आमदाराला एका तासात अटक करणार की नाही? असा सवालही कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला विचारला होता. मात्र आपल्याकडे आमदाराविरोधात पुरावे नसल्याचं उत्तर सरकारने दिलं. सुनावणी पूर्ण झाल्यावर आज (शुक्रवारी) दुपारी निकाल देण्यात येईल.

कोणत्या प्रकरणी केस दाखल?

गँगरेप पीडितेच्या तक्रारीनंतर उन्नावच्या माखी पोलिस ठाण्यात आमदार कुलदीप सिंह सेंगरविरोधात केस दाखल करण्यात आली. कलम 363, 366, 376 ,506 आणि पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण सीबीआयला ट्रान्सफर करण्यात आल्याने अटकेबाबत तेच निर्णय घेतील, असं उत्तर प्रदेशच्या डीजीपींनी गुरुवारी सांगितलं होतं.

उन्नाव आणि कठुआ बलात्काराच्या निषेधार्थ काँग्रेसने राजधानी दिल्लीत इंडिया गेटपर्यंत कँडल मार्च काढला. काँग्रेसच्या कार्यालयातून रात्री 11 वाजता हा मार्च काढण्यात आला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.

काय आहे प्रकरण?

भाजपचे उन्नावमधील आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांच्या भावाने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

खटला मागे न घेतल्यामुळे 3 एप्रिल रोजी आमदाराच्या भावाने पीडितेच्या वडिलांना बेदम मारहाण केली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेले वडील सुरेंद्र सिंह यांच्यावरच गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांना तुरुंगात पाठवलं. मात्र जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी सुरेंद्र सिंह यांना मृत घोषित करण्यात आलं.

आमदाराच्या भावाने केलेल्या मारहाणीत सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. आमदाराच्या दबावामुळे वर्षभरापासून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

न्याय न मिळाल्यामुळे रविवारी पीडितेचं कुटुंब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्मदहन करण्यासाठी गेलं होतं. त्यानंतर बलात्कार पीडितेने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Unnao Gang rape : BJP MLA Kuldeep Singh Sengar arrested latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV