विजय रुपाणी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

एखाद्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला इतर राज्यांमधील 18 मुख्यमंत्री उपस्थित राहण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे 18 मुख्यमंत्री या सोहळ्याला हजर होते.

विजय रुपाणी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

गांधीनगर : गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये रुपाणी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

विजय रुपाणी यांच्यासह एकूण 20 जणांना राज्यपाल ओ. पी. कोहली यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. विजय रुपाणी मुख्यमंत्री, तर 9 आमदार कॅबिनेट आणि 10 आमदार राज्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले.

विजय रुपाणी हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

गुजरातमध्ये मंत्र्यांच्या संख्येची मर्यादा किती आहे?

2003 मध्ये झालेल्या 91 व्या घटनादुरुस्तीनुसार, मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ही एकूण विधानसभा सदस्य संख्येच्या 15 टक्के असणं बंधनकारक आहे. या घटनादुरुस्तीची 1 जानेवारी 2004 पासून अंमलबजावणीला सुरुवात झाली.

गुजरातमध्ये एकूण विधानसभा सदस्यांची संख्या 182 आहे. म्हणजेच, गुजरातमध्ये जास्तीत जास्त 27 आमदार मंत्रिमंडळात समाविष्ट करता होऊ शकतात.

आज एकूण 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आगामी काळात कधी पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास आणखी 7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.

विजय रुपाणींची राजकीय कारकीर्द

विजय रुपाणी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे निकटवर्ती मानले जातात. स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणूनही गुजरातच्या राजकारणात त्यांची ओळख आहे.

राजकोट पश्चिम या मतदारसंघाचं विजय रुपाणी प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार विजय रुपाणी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून सार्वजनिक आयुष्यात प्रवेश केला. पुढे ते राजकारणाकडे वळले.

गुजरात प्रदेश भाजपचे ते अध्यक्षही होते. 2006 ते 2012 या काळात ते भाजपकडून राज्यसभेत खासदार होते.

नव्या मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य

विजय रुपाणी मंत्रिमंडळात पाटीदार (6), ओबीसी (6), सवर्ण (4), दलित (1), जैन (1) आमदारांचा समावेश आहे.

सर्वाधिक मंत्रिपदं ही कच्छ आणि सौराष्ट्र भागाला मिळाली आहेत. एकूण 7 मंत्रिपदं या भागाच्या वाट्याला आली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अहमदाबाद आणि उत्तर गुजरातचा भाग आहे. या भागांच्या पदरात 6 मंत्रिपदं पडली आहेत.

vijay rupani 1

शपथविधीला कोण कोण उपस्थित होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, निवडणुकीआधी काँग्रेसला राम राम ठोकणारे शंकर सिंह वाघेला, गूजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, केशूभाई पटेल इत्यादी उपस्थित होते.

विशेष म्हणजे, एखाद्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला इतर राज्यांमधील 18 मुख्यमंत्री उपस्थित राहण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे 18 मुख्यमंत्री या सोहळ्याला हजर होते.

देशभरातून आलेले 200 साधू-संतही विजय रुपाणींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

गुजरातमध्ये भाजपची सत्ता, काँग्रेस दुसऱ्या स्थानावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या तुफान प्रचारामुळे प्रतिष्ठेची बनलेली गुजरात विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर गुजारात विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आली आहे. मात्र काँग्रेसनेही भाजपला दोन अंकी संख्येवर खेचण्यात यश मिळवले.

गुजरातमध्ये सध्याचे पक्षीय बलाबल (एकूण जागा -182)

भाजप (99) +अपक्ष (1) = 100
काँग्रेस (77) + बीटीपी (2) + अपक्ष (2) = 81
राष्ट्रवादी काँग्रेस – 1

सहाव्यांदा विजय, पण 16 जागा कमी

गुजरातमध्ये भाजपने सलग सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपला 16 जागा कमी मिळाल्या आहेत. भाजपने 2012 मध्ये 115 जागा मिळवल्या होत्या. तर दुसरीकडे विरोधकांच्या जागांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. 2012 मध्ये काँग्रेसला 61 जागा मिळाल्या होत्या, मात्र यंदा 77 जागा मिळवण्यात काँग्रेसला यश आलं आहे. स्थानिक पक्षांसोबत हातमिळवणी करत काँग्रेसच्या जागा 81 वर पोहोचल्या आहेत.

गुजरातच्या नवे मंत्रिमंडळ

विजय रुपाणी (मुख्यमंत्री)

कॅबिनेट मंत्री :

नितीन पटेल (उपमुख्यमंत्री)

भूपेंद्रसिंह चुडासमा

रणछोडभाई फाल्दू

कौशिक पटेल

सौरभ पटेल

गणपतभाई वसावा

जयेश राधडिया

दिलीप ठाकोर

ईश्वरभाई परमार

राज्यमंत्री :

प्रदीपसिंह जाडेजा

परबतभाई पटेल

जयद्रथसिंह परमार

रमनलाल पाटकर

पुरुषोत्तम सोळंकी

ईश्वरसिंह पटेल

वासनभाई अहीर

किशोर कनानी

बचूभाई खबाड

विभावरी दवे

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Vijay Rupani sworn in as Gujarat Chief Minister latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV