महाबळेश्वरच्या हॉटेलमधील डीजेच्या आवाजानं उद्धव ठाकरे संतापले!

7 डिसेंबरची महाबळेश्वरची रम्य संध्याकाळ... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय महाबळेश्वरमधल्या अविनाश भोसले यांच्या विश्रामगृहावर विश्राम करत होते. तितक्यात शेजारच्या कीज रिसॉर्टमधून सुरु झाला डीजेचा आवाज. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी उद्धव ठाकरेंची शांतता भंग पावली.

महाबळेश्वरच्या हॉटेलमधील डीजेच्या आवाजानं उद्धव ठाकरे संतापले!

महाबळेश्वर : सर्वसाधारणपणे 10 नंतरही डीजे आणि बँडबाजा सुरु राहिला आणि आपण तक्रार केली. तर सुमारे तासाभरानंतर पोलीस येतात. पण महाबळेश्वरमध्ये 3 आठवड्यांपूर्वी प्रशासनाच्या कार्यतत्परतेचा नमुना बघायला मिळाला. तिथे प्रशासनाने डीजे वाजवणाऱ्या हॉटेललाच टाळं ठोकलं. या संपूर्ण प्रकारावर ‘माझा’चा स्पेशल रिपोर्ट.

7 डिसेंबरची महाबळेश्वरची रम्य संध्याकाळ... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय महाबळेश्वरमधल्या अविनाश भोसले यांच्या विश्रामगृहावर विश्राम करत होते. तितक्यात शेजारच्या कीज रिसॉर्टमधून सुरु झाला डीजेचा आवाज.

कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी उद्धव ठाकरेंची शांतता भंग पावली. महाबळेश्वरसारख्या इको सेन्सिटीव्ह झोनमधली शांतता भंग होतेच कशी? असा प्रश्न त्यांना पडला आणि एका जबाबदार नागरिकाचं कर्तव्य उद्धव ठाकरे यांनी बजावलं.

त्यांनी हॉटेलमधला डीजे बंद करण्याची विनंती केली. पण त्यानंतरही डीजे बंद न झाल्यानं उद्धव ठाकरे संतापले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी थेट पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना फोन केला. पक्षप्रमुखांचा आदेश शिरसावंद्य मानून कदमांनी अधिकाऱ्यांना पाचारण केलं. अधिकाऱ्यांनी या हॉटेलवर पर्यावरणाच्या नियमांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर तात्काळ या हॉटेलची वीज कापली, पाणी तोडलं आणि अख्ख्या हॉटेलला सील ठोकलं. दरम्यान, याबाबत रामदास कदम यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

आता वादाचा मुद्दा इतकाच... की हे सगळं फक्त उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून झालं का? अर्थात याबद्दल कुणी चकार शब्दही काढणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

या संपूर्ण प्रकरणी हॉटेलनं पर्यावरण खात्याची लेखी माफी मागितली. हात जोडून विनवणीही केली. कारण या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 300 कर्मचारी आणि त्यांच्या 1200 पोटांची अवस्था बिकट झाली होती.

आपल्या आनंदामुळे दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या हॉटेलविरोधात उद्धव ठाकरे यांनी उचललेल्या आवाजाचं कौतुकच करायला हवं. फक्त हा नियम सगळ्यांनाच लागेल याचीही खात्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी म्हणून घ्यावी. वेळी अवेळी निघणाऱ्या मिरवणुका, रात्री-अपरात्री होणारी कार्यकर्त्यांची आतषबाजी, सभांमध्ये मोडल्या जाणाऱ्या डेसिबल्सच्या मर्यादा याही पाळल्या जाव्यात... इतकंच...

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: After the complaint of Uddhav Thackeray the hotel was sealed?
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV